समुद्रमंथन

          पुराणात समुद्रमंथनाची सुरस कथा वाचावयास मिळते. पुराणातल्या कथांना गर्भित संदर्भ असतो. त्या कथांवर चिंतन केलं तर त्यातून त्या गर्भित संदर्भांना असलेल्या छटा उलगडत जाऊ शकतात.
          मेरू म्हणजे मुख्य आधार. आपल्या पाठीच्या कण्याला मेरुदंड म्हणतात. सारं शरीर या मेरुदंडावर तोललेलं राहत. समुद्रमंथनासाठी मेरू पर्वताची रवी केली... सात्यकी सर्पाची दोरी केली. योगशास्त्र सांगते की, मेरुदंडाच्या तळाशी कुंडलिनी सर्पाकार वेटोळे घालून असते. ती जागृत होते तेव्हा ती मेरुदंडाच्या भंवती वेढे घालीत मंथन सुरू करते. मग ज्ञानरूपी नवनीत आपल्या मस्तकात अवतरतं.
          माणसाचं मन म्हणजे असीम सागरच. वृत्तींचे असंख्य तरंग या मनसागरात अविरत लहरत असतात. सत्याचा मागोवा घेणारी बुद्धी म्हणजे सात्यकी. आत्मा हा मेरू.
          समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली. मानवी देहातही आपापली प्रभा असलेली चौदा करणे आहेत. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त व अहंकार ही अंतःकरण चतुष्टय असलेली अंगे. या चौदा करणांचा आणि समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांचा संबंध असला पाहिजे. चिंतनातून उत्तर मिळेलही.
          बाकी रत्नांचा विचार बाजूला ठेवू. अमृत आणि हलाहल यांचं पाहा... असुर वृत्तींच्या आघातानं गात्रे विव्हल होतात. अंतःकरणाचा दाह सुरू होतो. वृत्ती दूषित होतात. मुखात कडू-तिखट रसाची वाणी संचार करू लागते. नेत्रात अंगार फुलतो. अशा अवस्थेत डोळ्यातून बाहेर येणाऱ्या अश्रूंना हलाहलाचा स्पर्श झालेला असतो. मग दाह, जळफळाट, तळमळ आणि शब्दांना शस्त्राची मारक धार! तिथं शांती-समाधानाला प्रवेश नाही.
          याउलट, पावित्र्य चित्तवृत्तींना पुलकित करतं. वृत्ती सात्त्विकतेनं उमलून येतात. गात्रे प्रसन्न होतात. मुखाला, वाणीला माधुर्य लाभतं. नेत्रात आनंदाश्रू दाटतात. त्यांना अमृताचा स्पर्श झालेला असतो.
          जागृत देवस्थानं, संतांचा वास असणारी देवळे-मठ, तीर्थक्षेत्रे ही सारी अमृताचा स्रोत असलेली ठिकाणं. तिथं मनात शांतीला धुमारे फुटतात. जीवनाला गती लाभते. सात्त्विकतेचा वसंत मनाच्या वनाला अनोखे रूप प्रदान करतो. तिथं भक्ताला अमृताचा लाभ होत असतो. म्हणूनच भक्ताला तिथं जावंसं वाटत राहतं. त्याची तृप्ती तृप्त होते नसते....
 ... आणि हृदयीचा भगवंत मग अनावृत होतो.