लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्दल अनेक गमतीजमती माहिती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.
![]() |
असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावून येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते. नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंज्याला व एक थोडे वर-मागील बाजूला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे).
![]() |
पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असू शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरूनच ओळखत असू- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते.
![]() |
कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावरून उचलूनच आणावे लागे (किंवा एखादा दयाळू हवे तर एखादे पिल्लू घेऊन जा असे सांगे)- दुकानातून विकत आणणे वगैरे प्रकार अलीकडचे. मित्र-मित्र मिळून कुत्रा-शोध मोहिमेला जात असू. कुणाकडे तरी आधीच माहिती आलेली असे की, अमक्या-तमक्या गल्लीत कुत्र्याची पिल्ले बघितली. मग त्या पिल्लांच्या वर्णन करण्यात तो रमून जाई. त्यात अनेक बाता पण मारल्या जात. "त्याच्या कपाळावर टिळा आहे / ओम आहे", "काळे-पांढरे ठिपक्यावालं पिल्लू सरळ कानावालं आहे". कधी एकदा जाऊन ती पिल्ले डोळे भरून पाहतोय असे सगळ्यांना होई. पिल्ले शोधताना सतत मागील पायाकडे लक्ष ठेवून जास्तीत जास्त नखांचे कुत्रे मिळवण्यासाठी धडपड असे. असे कुत्रे मिळाले की, इतका आनंद होई की बस!
![]() |
एका स्नेह्यांकडे कुत्रे पाळले होते. ते त्यास कधीच बांधून ठेवत नसत. त्यामुळे ते जितके तास घरी असे त्यापेक्षा जास्त बाहेर असे. कधी-कधी २-३ दिवसांनी परत येई. त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे. अशाच एका भांडणातून ह्याला खोल जखमा झाल्या पण हे कुत्रे घरी न येता समोरील इमारतीच्या जिन्याखाली जाऊन बसले. असेच एक-दोन दिवस गेले, येणारे-जाणारे त्यास बाहेर बोलवत पण ते अंगावर येई. मग कुणीतरी त्याच्या मालकाला कळवले. ते तिथे गेले, त्यास बाहेर काढले, व जखमांना उपचार केले. डॉक्टर म्हणाले की, ह्याला आता अजिबात बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर.. म्हणून त्यास त्यांनी पहिल्यांदा बांधले. ते शांत राहीना; भुंकणे सतत चालू राहिल्यामुळे, त्यास त्यांनी नाईलाजाने सोडले. त्याच क्षणी त्याने भीतीवरून उडी मारली व पसार झाला. जे व्हायचे ते झालेच. परत त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला व पुन्हा त्यास अधिकच जखमी केले. पुन्हा हे महाशय त्याच जिन्याखाली लपले. आता मात्र तो फारच जखमी झाला होता व येणाऱ्या- जाणाऱ्यांवर भुंकतही होता. तेथील लोकांनी ताबडतोब मालकांना सांगितले. ते आले व त्याची अवस्था पाहून म्युनिसिपलतील फोन केला आणि त्यास घरी घेऊन आले. थोड्यावेळाने श्वानपथक आले. त्यांच्या पिंजरागाडीत आणखीही काही कुत्रे होती. ह्याला जणू काही पुढचे कळले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरून हात फिरवून घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जाताना भुंकलाही नाही. हा प्रसंग त्या गल्लीतील अनेकांनी पाहिला आहे व ते आजही ह्याची आठवण काढतात.
![]() |
कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्त्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पाहिली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षणयोग्य आहे असे मानतात. कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावून जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुद्दा अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावून जातो.