गारव्याचा छंद मजला आज आहे लागला
चांदण्याचा नूर थोडा वेगळासा वाटला
भासही होता तिचा का वाढते धडकन अशी ?
पैंजणाच्या वाजण्याने जीव का झंकारला ?
तू कळी अन फूल तू ही आजचा मोसम तुझा
भोवती काटे असू दे काळ नाही चांगला
भेटण्या स्वप्नात तुजला झोप यावी लागते
पाहिल्या पासून तुज तो झोप हरवुन जागला
आरशा पासून सखये दूर तू थोडी रहा
वेगळा अंदाज त्याचा मज नशीला वाटला
शायरी करण्यास शायर अंगणी जमले तुझ्या
त्यातला हरएक शायर सिरफिरा वेडावला
सभ्य जो जो काल होता, काय जादू जाहली !
पीत नसता, पाहता तुज, तो नशेने ग्रासला
गूळ साखर पेरणे तुज बोलता जमते कसे ?
भोग आता मुंगळ्यांचा त्रास मागे लागला
काल ओझरतेच तिजला पाहिले "निशिकांत"ने
दरवळासंगे जगाया जीव का सोकावला?
निशिकांत देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा