२० वर्ष - विस्थापित काश्मिरी हिंदू – भाग ४ (अंतिम)

आम्ही घर सोडताना माझ्या वडिलाचे श्री माटू नावाचे एक जवळचे मित्र भेटायला आले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. म्हणाले मी आज माझ्या मित्रासाठी काही करू शकत नाही. आम्हीच ठरवले होते की त्यांच्या कडे राहायचे नाही. आमच्या शेजारच्या वाखलू कुटुंबाला जेव्हा काश्मीर सोडून जायला सांगितले होते तेव्हा ते काश्मीर सोडून जाण्या ऐवजी त्यांचे राहते घर सोडून त्यांच्या आप्तेष्टांकडे राहायला लागले होते. पण काहीच दिवसात त्यांच्या आप्तेष्टांसकट त्या संपूर्ण कुटुंबासच प्राणास मुकावे लागले होते. माटू अंकलने आम्हाला जम्मू मधल्या मुठी नावाच्या विस्थापितांच्या शिबिरात जायचा सल्ला दिला. माटू अंकल म्हणाले, काय माहिती, काही दिवसांनी मला पण तेथेच जावे लागेल. आमच्याकडे खोऱ्यातले घर सोडून दुसरे कोठचेच राहण्याचे ठिकाण नव्हते. निघायच्या आधी घरात वडलांकरता एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझी आई जवळ जवळ बत्तीस वर्ष त्या घरात राहिली होती. मी वीस वर्ष. त्या घराची भिंतीदारे बोलायला लागली होती. आज तेच घर आम्ही सोडून चाललो होतो. त्याघरात परत जाऊ शकू का त्याला कायमचे मुकू हे माहीत नव्हते. घर परत बघायला मिळेल की नाही. मिळालेच तर किती वर्षाने आणि कोठच्या स्थितीत. काहीच कल्पना नव्हती. आईसाठी मी गरम गरम कहावा केला. आमचा तो तेथला शेवटचा कहावा. रोज सकाळी आईला बाहेरच्या खोलीत बसून कहावा प्यायची सवय होती. आईने व मी घराला न्याहाळले. आईला रडू आवरत नव्हते व माझ्या घशात हुंदक्याचा गोळा जमून दुखायला लागला होता. आम्ही एकमेकांच्या हातावर चमचाभर विरजलेले दही दिले. घराला कुलूप ठोकले व बाहेर पडलो. मला आईचे खूप वाईट वाटत होते. ती शिबिरात गेल्यावर स्वतःला कशी सावरेल ह्याची कल्पनाच करवत नव्हती. एक टॅक्सी करून थेट जम्मूला पोहोचलो.

आम्ही मुठी शिबिराच्या दाराशी येऊन धडकलो. एका जुन्या सरकारी गोदामाचे तात्पुरते शिबिर केले होते. आम्हाला एक खोली देण्यात आली. माझी आई एकटी होती म्हणून एक खोली तरी मिळाली. नाहीतर कुटूंबच्या कुटुंब ताडपत्रीच्या टेंट मध्ये राहताना मी बघितले. मला तशा परिस्थितीत सुद्धा आयएमएतल्या टेंट बांधायला शिकवायच्या कॅंपची आठवण आली. आम्ही आयएमएत होतो व सैन्यातली नोकरी करण्यासाठी आलो होतो. आम्हाला शिकवतात टेंट मध्ये राहायला ते युद्धजन्य परिस्थितीशी तोंड देण्यासाठी. वाईट ह्याचे वाटते की, येथे आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांचा प्रदेश सोडून कडाक्याच्या थंडीत टेंट मध्ये राहायला लागत होते. राज्यकर्त्यांना जर असे राहावे लागले असते तर ह्या प्रश्नाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात निश्चित बदल झाला असता. आपल्याच देशात आपणच पोरके. देव करो आणि येथे पदोपदी तुडवला जात होता तसा कोणाचा स्वाभिमान पायतळी तुडवला जाऊ नये. मी आईला सोडले. शिबिरातल्या खानावळीत कहावा घेतला व परत जायला निघालो. आजचा चवथा दिवस होता. पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. माझ्या डोळ्या पुढे आता पुढची आयएमएतली लढाई दिसत होती. आईला एवढेच सांगितले होते की मला जायला पाहिजे नाहीतर कोर्स बुडेल. काय सांगू अजून. आईचे दुःख काय कमी होते. त्या कॅंप मध्ये एकटे राहायचे. इतक्या वर्षाचे स्वतःचे घर एका दिवसात सोडून, आपल्या सगळ्या जवळच्यांना सोडून येथे परक्या जागेत नवीन घर तयार करायचे. एक प्रकारचा वनवासच हा. बरेच विस्थापित मनोरुग्ण झाले ते ह्याच परिस्थिती मुळे. माझी आई खोऱ्यात शिक्षिका होती त्यामुळे ती मूठी शिबिरातल्या शाळेत शिकवायला लागली. तिने स्वतःला सावरून घेतले. आई येणाऱ्या डिप्रेशनशी कामात मग्न होऊन लढू शकली. एका अर्थाने ते बरेच झाले नाहीतर मी एवढ्या लांबवर राहून काहीच करू शकलो नसतो. बाकीच्यांचे काय हाल झाले असेल ईश्वरच जाणे.

मी परत आयएमएत परतलो. माझ्या दिलेल्या सुट्टीच्या तब्बल २४ तास उशीरा. सकाळच्या पिटी परेडला हजर झालो. मला पिटी परेड मधून बाहेर काढून डि एस ने आपल्या ऑफिस मध्ये बोलावले. म्हणाला तू माझा दिलेला शब्द पाळला नाहीस. तुझे सैन्याच्या नियमांनुसार ओव्हर स्टेइंग ऑफ लिव्ह झाले आहे. उशिरा येणाऱ्याला आर्मी मध्ये कडक शिक्षा असते. तुझी केस आता माझ्या हातात नाही. तुला बटालियन कमांडर कडे जावे लागणार आहे. मी, डि एस गिलला मुठी कॅंप मध्ये आईला दाखल केले त्याची कागदपत्रे दाखवली. ती त्याने बघितली पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. आयएमए मधल्या नियमांनुसार उशीरा आलो हा गुन्हा हातून घडलाच होता व त्यासाठी काही अपील नव्हते. त्याच्या साठी होणारी शिक्षा भोगावीच लागणार होती. आपल्याकडे नियमांविरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे. नियम फक्त दुसऱ्यांसाठी असतात असे प्रत्येकाला वाटत राहते. आपल्यावर नियमा प्रमाणे वागण्याची वेळ येते तेव्हा कारणे सुचतात व सुचलेली कारणे किती उचित आहेत ह्याचे महत्त्व दुसऱ्याला पटवले जाते. मग नियमाचे उल्लंघन करायला आपण मोकळे होतो. गमतीची गोष्ट अशी की आपले काम झाल्या झाल्या आपण त्याच नियमाचे समर्थन करायला सुरवात करतो व दुसऱ्याने नियमाने कसे वागले पाहिजे ह्याचे धडे देण्यास लागतो. ही सवय बरोबर नाही ह्याची कल्पना आयएमए करून देते. नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळून यशस्वी होतो. जर नियमांचे उल्लंघन झाले तर त्याला असलेली शिक्षा भोगावीच लागते त्या विरुद्ध अर्ज करण्याचा काही फायदा होत नाही व अर्ज करण्याची सवय पण तितकीच वाईट आहे हे ही आयएमएत नियमांचे काटेकोर पालन करायला लावून उदाहरणाने शिकवले जाते.

कंपनी कमांडर कडे गेल्यावर त्याने मला सांगितले की माझ्या कडून चार दिवसाच्या सुट्टीचे उल्लंघन झाले आहे व आयएमएच्या नियमांनुसार शिक्षा होऊ शकते. आता निर्णय बटालियन कमांडर व उपकमांडंट ह्यांच्यावर अवलंबून आहे. जेव्हा कंपनी कमांडर मेजर शेखावतने उपकमांडंटचे नाव घेतले तेव्हाच मी समजून चुकलो की माझ्या रेलीगेशनचा किंवा मला काढून टाकण्याचा विचार चालला आहे. कारण रेलीगेशनचा निर्णय व आयएमएतून काढून टाकायचा निर्णय बटालीयन कमांडर व उपकमांडंट दोघे मिळून घेतात. बटालियन कमांडर माझ्यावर आधीच नाराज आहेत ह्याची कल्पना होतीच. उपकमांडंटचा निर्णय बराचसा बटालियन कमांडर च्या शिफारसीवर अवलंबून असतो.

संध्याकाळी मला हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडर कडे नेण्यात आले. शिक्षा होणाऱ्या जिसीला हॅकल ऑर्डर मध्ये जावे लागते. हॅकल ऑर्डर मध्ये आयएमएचा पोषाख घालायचा व बॅरे वर लागलेल्या आयएमएच्या बिल्ल्यावर लाल पिसांचा तुरा खोवायचा. ह्या पोषाखात जिसी एकदम रुबाबदार दिसतो. आयएमएत डोक्यावर घालतो त्या टोपीला बॅरे म्हणतात. बॅरेवर लावायचा पिसांचा तुरा आयएमएच्या शॉपिंगसेंटरवर मिळतो. प्रत्येक जिसीकडे तो असतो. जेव्हा शिक्षेसाठी जावे लागायचे त्या वेळेला हा तुरा खुपसावा लागायचा. असा तुरा खुपसलेला जिसी दिसला की समजावे की काहीतरी चूक जिसीच्या हातून झालेली आहे व तो कोणत्या शिक्षेसाठी तरी जात आहे नाहीतर शिक्षा सुनावणीसाठी तरी जात आहे. आयएमएतल्या शिक्षा सुद्धा अजब असायच्या. प्रामुख्याने बजरी ऑर्डर, २८ डेज, पट्टी परेड, हॅकल ऑर्डर, मंदिर दाये छोड, चिंडिट ऑर्डर अशा विचित्र नावांच्या त्या शिक्षा.

बजरी ऑर्डर मध्ये अंगावरच्या रुट मार्चच्या पॅक्स मध्ये सामाना ऐवजी टॉन्स नदीच्या किनाऱ्यावरली वाळू व गोटे भरावे लागायचे. मागे भदराज कॅंपच्या वेळेला वर्णन केलेला पंधरा किलो वजनाचा पॅक असे गोटे भरल्या मुळे चांगला तीस चाळीस किलो वजनाचा भरायचा. मग असा वाळूने म्हणजेच बजरीने भरलेला पॅक घेऊन उभे राहायचे किंवा काही अंतर चालावे लागायचे. ते शिक्षा देणाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असायचे. पाठीची अक्षरशः वाट लागायची त्या शिक्षेत. मणक्याला ते टॉन्स नदी मधले गोटे टोचत राहायचे. ह्याच पॅक मध्ये बजरी ऐवजी जर कॅंपचे सामान घातले तर त्याला चिंडीट ऑर्डर म्हणायचे. ह्या चिंडीट ऑर्डरचा पॅक जरा मोठा असायचा. कांबळे, मछरदाणी, खायचा डब्बा, दाढी करायचे सामान, विजेरी, खायचे सामान इत्यादी सगळ्या मिळून पन्नास गोष्टी भराव्या लागायच्या. तपासणी मध्ये एकही गोष्ट कमी आढळली की अजून शिक्षा वाढायची. दुसऱ्या महायुद्धात चिंडीट नावाची एक स्पेशल फोर्स ब्रिगेडियर विनगेटने तयार केली होती. ब्रह्मदेशातल्या मंदिराचा –चिंथे- नावाचा राखण करणारा देव आहे असे तेथील लोकांचे मानणे. त्यावरून त्या स्पेशल फोर्सला चिंडीट हे नाव पडले. स्पेशल फोर्सेसना ब्रह्मदेशातल्या इरावडी नदी पार करायला असे सामान घेऊन जावे लागले होते. त्या मुळे चिंडीट ऑर्डर मध्ये जंगलातून व नद्या नाले पार करण्यास उपयुक्त असे सामान बांधलेले असते. आयएमएत चिंडिट ऑर्डरचा अर्थ हे सगळे सामान मोठ्या पॅक मध्ये बांधायचे. ह्या शिक्षेने तसे सामान बांधण्याची सवय होते. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलायला दोन मिनिटे मिळायची. आयएमएतले पोषाख तरी किती प्रकारचे असत. एक पोषाख पिटी परेड साठी. ड्रिल साठी वेगळा. आयएमएतल्या क्लासेस साठी वेगळा. शस्त्रांचे शिक्षण (विपन ट्रेनिंग) साठी वेगळा, मुफ्ती ड्रेस जो संध्याकाळच्या जेवणासाठी असायचा तो वेगळा. असे ८ – ९ प्रकारचे पोषाख. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बाकीचे जिसी अभ्यासाला बसायचे त्या वेळेला ही पट्टी परेड चालायची. मंदिर दाये छोड ही गमतीदार शिक्षा असायची. डि एस एखादे लांबवर दिसणारे मंदिर, जिसीला बोटाने दाखवायचा व म्हणायचा त्या मंदिराला शिवून ये. मग जिसी दूरवर दिसणाऱ्या त्या मंदिराच्या दिशेने पळत जायचा व मंदिराची प्रदक्षिणा घालून यायचा. अगदी स्टिपल चेस मध्ये जसे पळावे लागते तसेच. कोठचे मंदिर दाखवायचे ते डि एसच्या मनावर अवलंबून असायचे. कधी कधी ते मंदिर दोन किलोमीटरवर असायचे कधी कधी डि एस खूप चिडला असेल तर पाच किलोमीटर दूर असलेल्या मंदिराकडे बोट दाखवायचा. ह्यात सगळ्यात सोपी शिक्षा हॅकल ऑर्डरच असायची. अजून एक शिक्षा होती जी सगळ्यात कठीण व कठोर अशी मानली जायची. त्यात ह्या शिक्षेस पात्र जिसी साठी वेगळे वेळापत्रक केलेले असायचे. त्यात आताच वर्णन केलेल्या सगळ्या शिक्षा दिवसभरात केव्हा ना केव्हा वेळापत्रकाप्रमाणे कराव्या लागायच्या. जिसी हे सगळे करता करता अगदी जेरीला यायचा. ह्या शिक्षे मध्ये जिसीचा दिवस सकाळी चार वाजता सुरू व्हायचा – सकाळी चार वाजता जिसी, ड्रिलस्क्वेअरवर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट करायचा. तशात आयएमएतली अंतरे एवढी लांब लांब असायची की ड्रिलस्क्वेअर दोन तीन किलोमीटर दूर असायचे. सायकल वरून जायला लागायचे. हे झाल्यावर मग जेवणा पर्यंत जिसीचा नेहमीचा ठरलेला दिनक्रम बाकीच्या आयएमएच्या वेळापत्रकाप्रमाणे चालायचा. दुपारी जेव्हा बाकीचे जिसी एक तासाची विश्रांती घ्यायचे त्या वेळात ही शिक्षा झालेला जिसी एक्स्ट्रॉ ड्रिल – ड्रिलच्या पोषाखात करायचा. परत दुपारी बाकीच्या जिसीज बरोबर गेम्स परेड चालायचीच. संध्याकाळी स्मॉलपॅक लाऊन व रायफल घेऊन बॅटल ऑर्डर मध्ये ५ किलोमीटरची दौड लागायची. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता परत ड्रिलस्क्वेअर वर हॅकल ऑर्डर मध्ये रिपोर्ट द्यावा लागायचा. संध्याकाळी बाकीच्या जिसीजना अभ्यासासाठी जेव्हा वेळ मिळायचा त्या वेळेला ह्या शिक्षेत जिसी रात्रीच्या चिंडीट ऑर्डरची तयारी करायचा. रात्री अकरा वाजता अशा जिसीला चिंडीट ऑर्डर मध्ये ड्रिल स्क्वेअरला रिपोर्ट करावे लागायचे. रात्री अकरा वाजता त्याच्या पॅक मधले सामान चेक व्हायचे. छोट्या छोट्या अशा पन्नास गोष्टी असायच्या आणि एकही गोष्ट ठेवायची राहिली की मग अशी शिक्षा अजून एका दिवसाने वाढायची. हा ह्या कठोर शिक्षेचा अजून एक नियम. असा हा खास वेळापत्रकाने बांधलेला ह्या कठोर शिक्षेचा एक दिवस. किती दिवस अशी शिक्षा झेलायची ते जिसीच्या चुकीवर अवलंबून असे. परेडला लेट आला तर साधारण तीन दिवस अशी शिक्षा मिळायची. पोषाख वाईट असेल तर एक दिवसाची ही कठोर शिक्षा मिळायची. गंमत अशी की शिक्षा करताना जर काही चूक झाली तर मागे सांगितल्या प्रमाणे शिक्षेत हळू हळू वाढ व्हायची. एका टर्म मध्ये जिसीला जर अशी कठोर शिक्षा मिळून अठ्ठावीस दिवसा पेक्षा जास्त दिवस झाले तर त्याचे आपोआप रेलीगेशन व्हायचे. सगळ्यात कठोर अशी ती शिक्षा असायची व साधारण जिसीला एका वेळेला दहा दिवसा पेक्षा जास्त ही शिक्षा मिळायची नाही. त्या मुळे ह्या कठोर शिक्षेचा हिशोब प्रत्येक जिसी ठेवायचा व आपले वर्तन सांभाळायचा.

रेलीगेशन होते की आपल्याला आयएमएतूनच काढून टाकले जाणार ह्या पैकी काय कानावर पडणार ह्या विचारात मी हॅकल ऑर्डर मध्ये बटालीयन कमांडरच्या ऑफिसच्या पोर्च मध्ये उभा होतो. माझा पोषाख ठीक आहे का हे कॅप्टन गिल स्वतः जातीने बघत होता. छान खोचलेला शर्ट, बेल्टच्या वर फक्त तीन बटणे दिसली पाहिजेत म्हणजे छान दिसतो पोषाख. तसा आहे ह्याची खात्री करत मला धीर देत होता कॅप्टन गिल. ड्रिलचे नाळ लावलेले पॉलीशने लख्ख चमकावलेले जोड्याचे पुढचे काळे टोक, मी माझ्या रुमालाने हलकेच साफ केले. हॅकल लावलेली बॅरे डोक्यावर चापून बसवली. बॅरेची कपाळावर बसणारी पट्टी आणि भुवया ह्यात तीन बोटांचे अंतर आहे हे सुनिश्चित करून मी तयारीत उभा राहिलो. तेवढ्यात सुभेदारमेजरचा खडा आवाज माझ्या कानावर आदळला. साऽऽऽव धान. जिसी सुनील गाडरू आगेसेऽऽऽऽऽऽ तेज चल. जसा मी बटालियन कमांडरच्या ऑफिसात टेबला पुढे संचलन करत पोहोचलो तसा मागून पुन्हा आवाज आला. जिसी सुनील गाडरूऽऽऽऽऽ......... थम १ २. मी सावधान मध्ये उभा राहिलो. सुभेदारमेजरचा पुन्हा आवाज जिसी सुनील गाडरू सॅल्यूट १ २. माझ्या बरोबर शेजारी उभ्या असलेला कॅप्टन गिलने पण बटालियन कमांडरला त्याच तालावर सॅल्यूट केला.

सुभेदारमेजरने खड्या आवाजात माझा गुन्हा म्हणून दाखवला. नं ३८९७ जिसी सुनील गाडरू चार दिनकी छुट्टीपर गया था। छुट्टीके बाद एक दिन देरीसे उसने रिपोर्ट किया है। आर्मी एक्ट ३२ के मुताबिक जिसी सुनील गाडरू एक दिन बिना छुट्टी लिये छावनीसे बाहर था। सजा के लिये हाजिर है।

हे ऐकून बटालियन कमांडर करड्या आवाजात म्हणतो - जिसी सुनील गाडरू, यु वेअर एब्सेंट विदाऊट लिव फॉर वन डे. एज पर आर्मी एक्ट ३२ यु आर गिल्टी. डु यु प्लिड गिल्टी.

मी म्हणालो - येस सर.

बटालियन कमांडर - फॉर युअर एक्ट ऑफ धिस यु आर गिवन अ पनिशमेंट ऑफ २८ डेज. सुभेदारमेजर मार्च हीम ऑफ.

मला मागून सुभेदारमेजरचा आवाज आला. जिसी सुनील गाडरू सॅल्यूट १ २. पिछेऽऽऽऽ मुड......... जिसी सुनील गाडरू आगेसेऽऽऽऽऽऽ तेज चल. बाकीची कवायत एका यंत्रा सारखी मी करत होतो. लांबवर कोठे तरी अजून बटालियन कमांडरचा आवाज कानात घुमत होता. – २८ डेज. २८ दिवसांची कठोर शिक्षा. सगळ्यात कठोर वाटणारी ती शिक्षा ऐकून कोणा जिसी वर आभाळच कोसळले असते पण मला एकदम हुरूप आला. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझे रेलीगेशन सुद्धा झाले नव्हते मग आयएमएतून काढून टाकणे राहिले बाजूला. बटालियन कमांडरनेच माझी तशी शिफारिश केली असणार उपकमांडंट कडे. मनातल्या मनात मी बटालियन कमांडरला धन्यवाद दिला. माझ्या मित्रांना ही बातमी कधी सांगतो असे झाले. आईला ह्यातले काहीच माहीत नव्हते त्या मुळे सांगायचे असे काहीच नव्हते. आज रात्री शिक्षेवरून आल्यावर आईला पत्र लिहिणार होतो आमच्या नव्या पत्त्यावर – श्रीमती इंदूकुमारी गाडरू, नं २६७५, मूठी विस्थापित शिबिर, फेज २, जम्मू १८११२४. २० वर्षा नंतर –

आपणाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल की आज सुनील गाडरू आणि त्याचा परिवार कोठे आहे तर वाचा....

जिसी सुनील गाडरू आता कर्नल सुनील गाडरू झाला आहे. पुण्यात एक छोटा दोन खोल्यांचा ब्लॉक आहे. जेव्हा त्याची पोस्टिंग फील्ड मध्ये असते तेव्हा त्याची आई तिथे राहते. वडील परत कधी भेटलेच नाहीत. इतर वेळेला आई त्याच्या बरोबर राहते. गेल्या वीस वर्षात काश्मीर मधील घरात ते कधी गेले नाहीत. कमिशन मिळाल्यावर काश्मीर मध्ये त्याची पोस्टिंग दोनदा झाली. तरी सुद्धा. एकदा पोस्टिंगवर असताना हेलीकॉप्टर मधून त्याने त्याचे घर बघितले होते. दुसरेच कोणी तरी राहते त्यात आता. त्याचे काश्मीर सुटले पण त्या आठवणी व तो कडवटपणा गेला नाही. असेच काहीसे बाकीच्यांबरोबर झाले आहे. आता काश्मीर मध्ये काश्मिरी हिंदू नगण्य राहिले आहेत. त्यांची घरे, त्यांची स्थावर मिळकत, सारे फस्त झाले आहे. मागे राहिलेत फक्त कटू आठवणी, मानसिक क्लेश व मनोरुग्ण. जम्मू मध्ये आता आठ शिबिरे आहेत व दिल्ली मध्ये साधारण पंधरा जागी शिबिरांसारखे साधारण पस्तीस हजार काश्मिरी कुटुंब राहतात.

(राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो – ही आय एम ए वर आधारीत कथा लवकरच प्रसिद्ध करत आहे)

दुवा क्र. १(मराठी ब्लॉग)दुवा क्र. २