आतले आणि बाहेरचे ....

दुपारची वेळ होती नुकतेच जेवण झाले होते लगेचच कामाला सुरवात नको म्हणून जरा बसलो होतो. काचेच्या केबीन मधून सहजंच बाहेर लक्ष गेले दूर एका कोपऱ्यात एक खुर्ची ठेवली होती धुळीने माखलेली जराशी जुनीच पण या खुर्चीला माझ्या मनात एक स्थान होते कारण हीच ती खुर्ची ज्यावर बसून मी माझा पहिला इंटरव्हू दिला होता मला अजूनही तो दिवस आठवतो - कंपनीचा मोठा लवाजमा बघूनच घाम फुटला होता, तेथे काम करणारे लोक व त्यांचा तो शास्त्र शुद्ध रीतीने चाललेला वावर जरा भलतेच वातावरण तयार करत होता. कदाचित प्रथमच असा प्रसंग आल्या कारणाने तेथील शिपायाशी देखील इंग्रजीतून बोलावे की हिंदीतून असे अनेक प्रश्न मला अजूनच अस्वस्थ करत होते. एवढ्या मोठ्या आय. टी. कंपनीत कामाला लागलो तर सर्वच साध्य होईल असे मला वाटत होते व समोरील काचेच्या आत बसलेले कर्मचारी पाहून त्यांचा भलताच हेवा वाटत होता. जणू काही मनातील अनेक संकल्पांची तो इंटरव्हुच दिशा ठरवणार होता.

पण आता परिस्थिती जरा वेगळी होती आता हे सर्व आठवले तरी मनात नकळत हसायला येते कारण खरोखरच गेल्या काही दिवसात बरेच काही बदलले होते बरीच स्वप्ने हळू हळू मार्गी लागत होती. काही दिवसापूर्वी नवल वाटणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा मी एक भाग झालेलो होतो आणि जे वातावरण गूढं वाटत होते ते जणू आता उमगू लागले होते. आज त्या जुन्या खुर्ची पाशी काही माझ्याच वयाचे तरुण बसले होते कदाचित इंटरव्हू करताच आले होते. मी माझे काम चालू केले त्यांच्या त्या घाबरलेल्या मुद्रेत मला माझा तो जुना दिवस आठवत होता मधूनच ते आम्हा आत बसलेल्या लोकांच्याकडे आशेने बघत होते मला सहजच माझा तो क्षण आठवला मीही असाच त्या खुर्ची तून आत बसलेल्या सुमित गोखले कडे बघत होतो, तोच सुमित गोखले आता माझा मित्र 'सुम्या' झाला होता पण त्या वेळेस त्याची प्रत्येक मुद्रा भलतीच वेगळी वाटत होती. मी माझे काम चालू केले तेवढ्यात परांजपेने मला आणि सतीशला प्रदीप बोलवत असल्याचे सांगितले. सतीश माझा सह कर्मचारी व प्रदीप माझा बॉस. आम्ही दोघे त्याच्या केबीन मध्ये गेलो. बाहेर बसलेले ते तरुण विद्यार्थी इंटरव्हू करताच आले असल्याचे कळले त्यातल्या त्यात आम्हा दोघांना कामातले बऱ्यापैकी माहीत झाले असल्याने तसेच गेले काही दिवस कामही कमी असल्याने तो आम्हाला नवीन कर्मचारी नियुक्ती साठी त्याच्या बरोबर बसवत असे पण आज त्याला वेळ नव्हता त्या मुळे आम्हालाच सर्वकाही सांभाळायचे होते. काही १० ते १५ लोक आले होते मी ५ जणांची जबाबदारी घेतली.

त्यांचा इंटरव्हू घेऊन त्यांचा रेटिंग रिपोर्ट प्रदीप कडे पाठवला आता त्या वरून प्रदीप पुढचा निर्णय घेणार होता. त्यामुळे मी माझ्या जागेवर पुन्हा येऊन बसलो. चहाची वेळ झाली असल्याने मी बाहेर आलो मी इंटरव्हू घेतलेले काही जण तेथेच उभे होते कदाचित प्रदीप अजून आला नव्हता त्यांनी मला इंटरव्हुचे काय झाल्याचे विचारले पण अजून मला काहीच माहीत नसल्याचे सांगून मी त्यांना बसायला सांगितले. त्यांच्याशीच काही गप्पा मारत असताना नकळत माझे लक्ष त्या कोपऱ्यातल्या खुर्ची कडे गेले पण आज ती मला जरा वेगळी वाटत होती माझ्या मनात त्या जुन्या भावाचा अभाव जाणवत होता कदाचित आज त्या बाहेरच्यांशी बोलताना मला आतली खुर्ची जास्त प्रिय वाटत होती. मी आत आलो प्रदीपने आम्हाला बोलावले होते. मला माहीत होते त्याला आमच्या त्या रेटिंग रिपोर्ट मध्ये काहीच रस नव्हता तो एक वेळ घालवायची सबब म्हणून त्या कडे पाहत होता आणि तसेही त्याकडे अजून १ महिना होता त्या मुळेच कदाचित लवकर नियुक्ती करून त्याला त्याचा त्रास वाढवायचा नव्हता आणि तेच मला पटत नव्हते. मनातून वाटत होते हे सर्वजण काही आशेने आले आहेत पण हा त्यांचा काहीही ठाव न घेता त्यांना नाकारत होता गेले कित्येक दिवस त्याचा हा खेळ चालला होता केवळ दोन जागांसाठी याने २०ते २५ लोक नाकारले होते. त्याचे कारणही तो " जितना टाइम ले सको उतना ले लो.. हमे कहा जल्दी पडी हे.. ये ही लोग कल हमारे सर पर नाचेंगे.. तो ठीक से चुनाव करना! " अश्या निर्लज्ज शब्दात आम्हाला सांगत असे त्या मुळे जरी कोणी त्या जागे साठी पात्र वाटला तरी अश्या गाढवा मुळे त्याचा काही फायदा नव्हता हे आम्हाला माहिती होते.

पण असे का होत होते? काही दिवसांपूर्वी तोही त्यांच्यातलाच एक होता.. तो ही काही स्वप्ने घेऊन आला असेल आणि असेच काहीसे त्याच्या ही बरोबर झाले असते तर? माणूस आपला भूतकाळ का विसरतो... मला एकदमच वि. स. खांडेकरांची एक लघुकथा आठवली कथेचे नाव होते ' आतले आणि बाहेरचे'... या कथे नुसार एकदा लेखक गाडी पकडण्या साठी रेल्वे स्टेशनवर उभे असतात तुडुंब भरलेली ती गाडी येताना पाहून काहीच पर्याय नसलेले लेखक त्या गर्दीत चढाओढ करत दरवाज्यापाशी पोहोचतात पण दरवाज्यातला एक इसम काही करून त्यांना आत येऊन देत नाही तो त्यांच्या अंगाशी झटापट करू लागतो व आत जागा नसल्याचे जाहीर ओरडून सांगतो आणि त्यातच गाडी सुटते लेखक अर्धे गाडीत तर अर्धे बाहेर अश्या विलक्षण अवस्थेत असतात आपण पडू नये म्हणून ते त्या ईसमा कडे विनवणी करतात पण तो काही ऐकून घेत नाही शेवटी न राहून ते त्यांचा मोर्चा खिडकी पाशी नेतात व खिडकीतून आत घुसून कशीबशी जागा पकडतात आत आल्या बरोबर ते त्या ईसमा बरोबर कडाक्याचे भांडतात व शांत पणे गर्दीत उभे राहतात पण पुढच्या स्टेशनला अचानक लोकांचा नवा लोंढा अंगावर येतो त्याला वैतागून लेखक नकळत त्याला विरोध करू लागतात व लोकांना ढकलत त्याच ईसमा सोबत खांद्याला खांदा लावत आत जागा नसल्याचे जाहीर ओरडून सांगू लागतात नंतर स्टेशन वरून गाडी पुढे निघाल्या वर दोघे हस्तालोंदन करतात व पुन्हा पुढच्या स्टेशनवर लोकांना विरोध करायला सज्ज राहतात.

काहीसा असाच प्रकार येथे झाला होता फक्त इथे रेल्वे नसून ऑफिस होते व काही दिवसापूर्वी बाहेरचा असा कोणी आता आतला झाला होता आणि आता आपल्या जागे साठी बाहेरच्यांना विरोध करत होता. खरोखरच हा प्रकार फार विचित्र होता.. कितीही झाले तरी आपण हा भाव नकळत मनाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात जपत असतो. कदाचित म्हणूनच आठवण जागी करणारी बाहेरची ती खुर्ची आज मला अडगळ वाटत होती केवळ त्या आतल्या नव्या खुर्ची मुळे. या सर्व प्रकारात नकळत का होईना मी ही प्रदीपच्या खांद्याला खांदा लावत त्याला साथ दिली होती. कारण आजही प्रदीपने सर्व जणांना नाकारले होते. मला फार वाईट वाटले व चीडही आली पण माझ्या हातात काहीच नव्हते कारण 'Boss is always right' पण या तून एक मात्र शिकलो जीवनात आपण खूप काही मिळवावे पण विसरू नये तो आपला भूतकाळ, आपले जुने दिवस कारण आज अडगळ म्हणून वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीला त्या काळी कदाचित काही वेगळे महत्त्व असावे तसेच आज आतले म्हणून मिरवणारे आपण कोठेतरी बाहेरचे असतोच.

ती बाहेरची खुर्ची आता मी दुरुस्त केली आहे ती मी आता माझ्या केबीन मध्येच वापरतो कदाचित म्हणूनच मी पुन्हा एकदा जुन्या आठवणींचा अल्बम बघू शकतो---आतल्या ही आणि बाहेरच्या ही!!!.