आताच इतका लोकप्रिय कसा ?

'अंधा कानून'लाही गर्दी झाली ती अमिताभसाठी, पाहुणा कलाकार असूनही. 'चालबाज' ची पटकथा सफाईदार होती. श्री ची दुहेरी भूमिका म्हणजे मेजवानी होती.  'हम' मध्ये अँग्री ओल्ड मॅनचा बुलंद आविष्कार होता. गोविंदाच्या विनोदाची फोडणी होती. अनुपम खेरचा मतलबी खलनायक होता.
'कौन करे कुर्बानी' मध्ये धरमपाजी होते.'फरिश्ते' मध्ये तर त्याची भूमिका लहानच होती. 'दोस्ती दुश्मनी' मध्ये जीतेंद्र व ऋषी कपूर होते.
या सगळ्यात त्याचं गॉगल लावणं काढणं, यंत्राचा भाग हलतो तसा हात हलवणं,  हिंदीचा मद्रासी नमूना..हे होतंच.  महाराष्ट्राचं पब्लिक खास त्याच्यासाठी म्हणून थेटरात गेलं असावं, असं वाटत नाही. महाराष्ट्रासाठी तो 'शी.. काळुंद्रा' होता. ना तो मुलींचा आवडता, ना जंपिंग जॅक, ना ही मॅन, ना कमल हसनसारखं जागतिक अभिनय कौशल्य, ना अँग्री यंग मँन. 
एकेकाळी  बॉलीवूडच्या खिजगणतीतही नसणारा हा माणूस आज इतका लोकप्रिय कसा झाला ?   
'रोबोट' प्रदर्शित झाल्यानंतर काय अशी जादू झाली की, त्याच्या नावानं एस एम एस, फॉरवरडेड मेल्सचा पाऊस पडू लागला ?
वॉल्ट डिस्नेनेही हात जोडले असते, इतक्या अचाट कल्पनाशक्तीचे  विनोद  आताच का त्याच्यावर तयार होत आहेत?