गाळल्या घामास आता मूल्य नाही
कालच्या मूल्यास आता मूल्य नाही
तोकड्या कपड्यात सजते रूप हल्ली
अंगभर पदरास आता मूल्य नाही
कोवळ्या पानाफुलांचा बोलबाला
वाळल्या पानास आता मूल्य नाही
कोक, बर्गर अन पिझा पक्वान्न झाले
भाकरी पिठल्यास आता मूल्य नाही
मूल गाते "मस्त शीलाकी जवानी"
प्रार्थना, श्लोकास आता मूल्य नाही
उंच इमले त्यात छोटेसे खुराडे
ओसरी, वाड्यास आता मूल्य नाही
काय गजला ! अन सुरावट, मैफिली त्या !
जाहल्या इतिहास आता मूल्य नाही
सळसळाया लागले तारुण्य इतके
सुरकुत्यांना खास आता मूल्य नाही
कालचे "निशिकांत" होते कालसाठी
कालच्या जीर्णास आता मूल्य नाही
निशिकांत देशपांडे मो.नं. ;-- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा