देवासही पुरूनी उरतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
"तू टाळ माणसांना" बाळास श्वान सांगे
कुत्र्यासही अताशा कळतात माणसे ही
उबगून माणसांना मी वानप्रस्थ धरला
आठव बनून स्वप्नी दिसतात माणसे ही
कमऊन वाममार्गे ते दानशूर झाले
टकून कात पापे करतात माणसे ही
विक्री, खरीद, सौदे ही रीत जीवनाची
मंडीत नार तरणी विकतात माणसे ही
इस्टेट वारसांनी हिसकावली पित्याची
मरण्या अधीच पिंडा शिवतात माणसे ही
जाळून मारले पण शेजार गप्प होते
हातात बांगड्या का भरतात माणसे ही ?
नाविन्य काय उरले? जगण्यात माणसाच्या
घाण्या सभोवताली फिरतात माणसे ही
सत्रास संसदेच्या ऐकून श्वान म्हणते
"अपुलेच जात बंधू दिसतात माणसे ही"
"निशिकांत" दुर्बलांच्या जगण्यास अर्थ नसतो
मरण्या अधीच शतदा मरतात माणसे ही