आजी दर वर्षी स्वतः:चा मसाला तयार करते. उन्हात सगळं वाळवून, मसाल्यात किती
प्रमाणात काय काय घालायचं हे ठरवून मग चांगल्यातले चांगले पदार्थ गोळा
करून हा मसाला तयार होतो. सगळं गिरणीतून दळून येतं आणि कोरड्या, हवा-पाणी
लागणार नाही अशा बरणीत जपून ठेवलं जातं. वर्षभराचा मसाला उन्हाळ्यात तयार
केला की मग तो वर्षभर पुरवून वापरता येतो. बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांवर
आजीचा कधीच विश्वास नसतो, आणि खरंच बाजारचा मसाला आजीच्या मसाल्याइतका
मस्त होतच नाही. आजीचे कष्ट आणि प्रेम त्यात असतं म्हणून त्याला एक वेगळाच
स्वाद येतो. मेंदी जशी एका नव्या नवरीच्या हाताची शोभा आणि रंगत वाढवते,
तसंच हा मसाला स्वतः:चा रंग आणि स्वाद कित्येक भाज्यांना आणि आमट्यांना
देतो. मला तर वाटतं की मसाल्यात असणाऱ्या गोष्टींचं मोज-माप कोणालाच, अगदी
आजीला पण माहीत नसेल. तिच्या हाताला बरोबर कळत असेल काय आणि किती मसाल्यात
गेलं पाहिजे.
पण या मसाल्याशी अजून काहीतरी जुळलेलं आहे हे जाणवतं. या मसाल्याचा वास
घरची आठवण करून देतो. भारताबाहेर राहिल्यामुळे कदाचित मी या मसाल्याचं
जास्त कौतुक करत असेन, पण खरंच बरणी उघडली की मस्त वाटतं. त्या मंद वासाने
मन लगेच घरची आठवण करून देतं. जुन्या आठवणी परत नव्याने मनात डोकावून
जातात. आजीच्या स्वयंपाकघरातले ते सुगंध आणि तिने केलेले नवे नवे पदार्थ,
हे एका मजेत गेलेल्या बालपणाची कहाणी सांगतात. या वासामुळे ते आनंदात
घालवलेले क्षण परत जगता येतात. मग आपला स्वयंपाक झाला आणि तो चाखून बघितला
की कळतं आपली आमटी आजीसारखी नाही झाली. म्हणजे आजीने केलेला मसाला वापरून,
आजीसारखी आमटी करायचा प्रयत्न हा प्रयत्नच असतो. बरेच लोक म्हणतात की
आजीसारखी आमटी कोणीच करू शकत नाही, कारण त्यात आजीचं प्रेम असतं.
हे खरंच असावं. आजीचा मसाला वापरून, आजीसारखी आमटी करताना ती आजी करते
तितकी छान न होण्याला अजून काही कारणच नसावं. पण हे फक्त आजीचं प्रेमच
नसतं. या प्रेमामागे भरपूर काही लपलेलं असतं. कदाचित ते आपल्याला दिसत
नाही किंवा कळत नाही म्हणून आपण त्याला 'प्रेम' हा सोपा शब्द वापरून
व्यक्त करतो. या प्रेमाचा मी थोडा ऍनॅलिसिस करायचं ठरवलंय. म्हणजे आजीचा
मसाला आणि आजीची आमटी, आमच्यासारखे वेडे लेख लिहू शकतील, इतकी चांगली का
होते याची कारणं शोधायचा प्रयत्न आहे हा.
मसाला करण्यामागची पहिली भावना म्हणजे आपण बाजारातल्या मसाल्यापेक्षा
चांगला मसाला करू शकतो, हा विश्वास. आणि हा अंध विश्वास नसतो. कित्येक
वर्षांच्या सरावामुळे हा विश्वास निर्माण झाला असतो. आणि एकदा काहीतरी
चांगलं करून दाखवायचं ठरवलं की त्याला लागणारे कष्ट करायची ताकद आणि
उत्साह आपोआप येतो. कसलीही भेसळ न करता, चांगल्यातले चांगले पदार्थ वापरून
ही कलाकृती तयार होते. मसाल्याच्या बरण्या भरल्या की त्या चार-पाच घरी
वाटल्या जातात. आणि या सगळ्यातून आजीला काय मिळतं? घरच्या लोकांसाठी मसाला
असतो म्हणून आजी त्याचे पैसे घेत नाही. म्हणून इतके कष्ट करून, इतका वेळ
खर्च करून आजीला नक्की काय मिळतं? आणि जर इतकं सगळं करून तो मसाला फुकट
वाटायचा असेल, तर बाजारचा मसाला काय वाईट आहे?
जसं मसाल्यात जाणाऱ्या पदार्थांचे एक रहस्य आहे, तसं या प्रश्नांचं पण एक
रहस्य आहे. आजीला काय मिळतं याचं उत्तर सोपं आहे. आजीला आमचं प्रेम आणि
दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळतं. आज देवाच्या कृपेने आजीला
पैशाची काही कमी नाही, पण जरी असती तरी आजीने मसाला सगळ्यांना पैसे न
घेता दिला असता. चांगल्या गोष्टी फुकट मिळतात असं म्हणण्यापेक्षा चांगल्या
गोष्टींची किंमत पैशाने मोजता येत नाही. निरपेक्षपणे फक्त दुसऱ्यांच्या
आनंदासाठी काहीतरी करणं याचं समाधान, आम्ही आमटीचं कौतुक केल्यावर आजीच्या
चेहऱ्यावर दिसतं. तिचे कष्ट आणि कला सफल झाल्याचं, ते तिचं प्रमाणपत्र
असतं. चांगल्या गोष्टींची जाहिरात करावी लागत नाही, ती आपोआप होते. आधी मी
एकच बरणी आणायचो, आता मित्रांसाठी २-३ आणाव्या लागतात. आजी पैसे घेत नाही
म्हणून मित्रांनी तिला काहीतरी भेट म्हणून द्यायचं ठरवलं. मसाल्याचा वास
जितक्या वेळा येतो तितक्या वेळा आजीची प्रशंसा होते. आजी नुसता मसालाच
नाही तर अजून बरंच काही आमच्यासाठी प्रेमाने करत असते, मसाला हे एक उदाहरण
झालं. आणि सगळ्यांच्याच आज्या माझ्या आजीइतक्याच प्रेमळ आणि हुशार असतात.
मी मसाल्याबद्दल इतकी बडबड करण्याचं अजून एक कारण आहे. आजीला दुसऱ्यांसाठी
काहीतरी करून खूप आनंद मिळतो. आता आपल्या सगळ्यांना मसाला नाही करता
येणार, पण आपणसुद्धा दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करू शकतो. आणि आपण
लोकांना किती मदत करतो हे दाखवण्यासाठी करू नका, तुम्हाला ते करून आनंद
आणि समाधान मिळेल म्हणून करा. विश्वास नसेल बसत तर करून बघा. आपण काहीतरी
चांगलं करायला लागलो तर उत्साह आपोआप येतो, मदत मिळते आणि लोकांना पण
काहीतरी चांगलं करावंसं वाटतं. तुम्हाला जरी तुम्ही केलेलं छोटं वाटत असेल
तरी ते मनापासून करत राहा. मसाला जसा आमटीची चव वाढवतो तसं तुमच्या जीवनात
आनंद वाढत राहील.
-- मयुरेश कुलकर्णी