४४. साधक, साधना आणि साध्य!

प्रथम आध्यात्मिक जगात साध्य काय आहे ते पाहू.

आध्यात्मिक अर्थानं साध्य म्हणजे स्वत:ची स्वत:शी भेट. मीटिंग वनसेल्फ!

अध्यात्म हा सर्वात मोठा पॅराडॉक्स आहे, पॅराडॉक्स म्हणजे संभ्रम नाही; पॅराडॉक्स म्हणजे विनोद कारण भेट व्हायला आपण स्वत:पासून दुरावलेलोच नाही!

पण हे सुरुवातीला लक्षात येत नाही, म्हणजे आपण जर स्वत:पासून दुरावलेलो नाही तर मग भेट कसली? असं तुम्ही सुरुवातीलाच म्हणू शकत नाही कारण तो तुमचा अनुभव नाही त्यामुळे हा पॅराडॉक्स आहे हे कळण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक प्रक्रिया काय आहे ते समजावून घ्यावंच लागतं.

काय उपयोग आहे या साध्याचा? तर, एकदा आपण स्वत:ला भेटलो की सगळे प्रश्न संपले, अक्षरशः: एका क्षणात सगळं जीवन आल्हाददायक होतं. जे जीवन उगीच ओढूनताणून जगत होतो ते स्वप्नवत वाटायला लागतं, नव्हे स्वप्नवत होतं! जे खरं वाटत होतं, सार्थ वाटत होतं, ज्यात बदल करावासा वाटत होता आणि बदल झाला की सुखाला पारावर राहणार नव्हता ते सगळं पिक्चर सारखं वाटायला लागतं. घडतंय सगळं, कळतंय सगळं पण होत काही नाही  अशी आपली स्थिती होते. वी रिमेन अनफेक्टेड बाय द इव्हेंटस ऑर द सिट्यूएशन!
_________________________________________

मुळात आध्यात्मिक साधनेचा हेतू एक भ्रम दूर करणं आहे, तो भ्रम इतकाच आहे की निराकार स्वत:ला आकार समजतोय, किंवा निराकाराला आपण आकार आहोत असा भास होतोय.

आता, भास कितीही सघन असला तरी त्यामुळे निराकाराचं आकारात रूपांतर होत नाही आणि त्यामुळे कोणतीही साधना आपल्याला स्वरूप उपलब्ध करून देऊ शकत नाही!

साधनेनं स्वरूप बदलू शकत नाही त्यामुळे प्राप्तही होऊ शकत नाही.

थोडक्यात, आपण निराकारच होतो, निराकारच आहोत आणि निराकारच असू शकतो या बोधाप्रत आणण्याचं काम साधना करते.

किंवा, द अदर वे, साधना आपल्याला आपण आकार आहोत हा वाटणारा भास दूर करते.

हे लिहिण्याचं कारण एवढंच की साधना निवडताना फार सजग असावं लागतं, जर साधनेचा हेतू आणि साध्य लक्षात घेतलं नाही तर साधना, भ्रम दूर करण्या ऐवजी सघन करत जाते!
____________________________________
साधनेची निवड हा अध्यात्मातला अत्यंत महत्त्वाचा भाग कसा आहे ते पाहू.

वेळ हा आपल्याला क्षणोक्षणी होणारा भास आहे कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे रात्र झाली किंवा दिवस उजाडला असं वाटतं. आता ही गोष्ट सर्वज्ञात आहे पण वेळ हा भास आहे हे आपण मंजूर करत नाही.
आता वेळ हा भास आहे हा उलगडा होण्यासाठी सूर्य सदैव प्रकाशमान आहे या गोष्टीचं स्मरण पुरेसं आहे. या उलगड्यानी वेळेचं मनावरचं दडपण शून्य होतं. अध्यात्मात सांगितलेली समयशून्यता सहज उपलब्ध होते, जीवनातली घाईगडबड एकदम कमी होते.

तुमच्या लक्षात येईल की कालरहितता साधण्यासाठी कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही, केवळ, अस्तित्वात वेळ नाही किंवा वेळ हा भास आहे हे स्मरण पुरेसं आहे.

या बोधाला आणखी एक पैलू आहे, ज्याला वेळ हा भास आहे हा बोध होतो तो स्वत:ही कालातीत होतो कारण ज्याला वेळ खरी वाटते तो स्वत:लाही कालबद्ध समजत असतो!

आता आपण कालरहित आहोत हे समजण्यासाठी तुम्ही कोणतीही साधना केलीत तर तुम्ही वेळेशी झुंजत राहाल आणि मग या आयुष्यात तुम्हाला तो बोध होणं शक्य नाही कारण वेळ होतच राहणार, फक्त वेळ हा भास आहे हा बोध होऊ शकतो, वेळ नाहीशी होत नाही.

मला एकानं अत्यंत निर्बुद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली होती तेव्हा मी म्हटलं होतं की अशा प्रश्नांना उत्तरं देण्यात माझा वेळ जातो. यावर त्यानं लिहिलं की वेळ हा भास आहे तर मग वेळ जातो असं तुम्ही कसं म्हणता?

आता वेळ जातो असं बोली भाषेत म्हणतात, खरं तर त्रास होतो असं म्हणायला हवं, पण त्रास होतो असं म्हटलं की सत्य गवसलेल्याला त्रास कसा होईल? हा पुन्हा प्रश्न!

तर सांगायची गोष्ट म्हणजे वेळ हा भास आहे हे उघड आहे आणि व्यक्त जगात वेळ सार्थ आहे हे ही तितकंच खरंय पण आपण कालबद्ध नाही हा बोध तुम्हाला वेळ उत्तम मॅनेज करायला मदत करतो हा त्या बोधाचा लाभ आहे, तुम्हाला वेळेचं टेन्शन येत नाही!

मुद्दा असा आहे की जीवनातलं वेळेचं प्रचंड दडपण घालवण्यासाठी तुम्ही साधना किंवा टाइम मॅनेजमेंट सारख्या उपाय योजना सुरू केल्यात तर वेळेचं दडपण जाणं तर दूरच पण वेळ अधिकाधिक खरी वाटायला लागेल!
___________________________________

आता मूळ भ्रमाकडे किंवा भासाकडे वळू.

निराकाराला आपण आकार आहोत असा होणारा भास म्हणजे अहंकार! हा अहंकार दूर करण्यासाठी अनेक क्लिष्ट आणि जाचक प्रक्रिया निर्माण झाल्यायेत. उदाहरण म्हणून आपण परिक्रमा ही अत्यंत खडतर साधना बघू.

निराकार निश्चल आहे, तो कुठेही जात येत नाही. या निश्चलाचं वर्णन अष्टावक्रानी त्याच्या संहितेत, ‘न क्वचित गंता न आगंता’ असं केलंय. आता या निश्चलाला भेटण्यासाठी आपण चालायला सुरुवात करणं हीच प्राथमिक चूक आहे.

या प्राथमिक चुकीतून पुढेपुढे किती गोंधळ होत जातो ते बघण्या सारखं आहे. पहिली गोष्ट, परिक्रमा ही अनेक वर्ष किंवा महिने चालणारी साधना आहे त्यामुळे परिक्रमेची सुरुवात आणि शेवट कालाचा भास सघन करते, म्हणजे सत्य किंवा स्वरूप जे आता, या क्षणी उपलब्ध आहे ते काही वर्षांनी किंवा महिन्यांनी, परिक्रमेची सांगता झाल्यावर मिळेल असा भ्रम निर्माण होतो.

आता जे परिक्रमेची सुरुवात होण्यापूर्वीच उपलब्ध आहे ते परिक्रमेची सांगता झाल्यावर कसं उपलब्ध होईल? म्हणजे ते परिक्रमेच्या सांगतेला उपलब्ध नाहीये असं नाही पण ज्यानं ते परिक्रमे नंतर उपलब्ध होईल या धारणेनं परिक्रमा सुरू केलीये त्याला ते सांगते नंतरही गवसणार नाही कारण शोध निश्चलाचा आहे हेच त्याच्या लक्षात आलेलं नाही! किंवा शोध निश्चलाचा आहे हे लक्षात न आल्यानंच तर त्यानं परिक्रमा सुरू केलीय!

पुढेपुढे तर आणखी मजा आहे. निश्चल, किंवा निराकार किंवा खुद्द आपण अजिबात हालत नाही, ज्यानं परिक्रमा केली जाते ते शरीर असतं पण परिक्रमेचा ध्यासच इतका प्रगाढ असतो की ती करणाऱ्याला आपणच परिक्रमा केली असं वाटायला लागतं! आता आजूबाजूचं पब्लिक पण इतकं भारी असतं की अश्या परिक्रमा करणाऱ्याला ते असं काही मानायला लागतं की परिक्रमा करणारा पुन्हा परिक्रमेचं अनुष्ठान करायला निघतो!

आता खरंतर परिक्रमा न करू शकणाऱ्यांना आपण ती करू शकत नाही याची खंत असते आणि म्हणून ते परिक्रमीला मानतात आणि परिक्रमीला निश्चल न गवसल्यानं तो ही नम्रपणे आपण अजून साधक असल्याचं त्यांना सांगतो पण त्यांना वाटतं याला म्हणतात निरहंकारिता!

वास्तविकात अहंकार दूर होणं म्हणजे आपण आकार आहोत हा भास दूर होणं आहे पण परिक्रमीची विनम्रता हेच अहंकार दूर झाल्याचं लक्षण इतरांनी ठरवून टाकल्यानं परिक्रमी आणखीच विनम्र होतो! ही प्रक्रिया मग परिक्रमा न करू शकणाऱ्यांची खंत आणि परिक्रमीची विनम्रता यामुळे अव्याहत चालू राहते!

यात पुन्हा परिक्रमीच्या अनुभवांची भर पडते, ते एक आणखी बघण्या सारखं आहे!

श्री निसर्गदत्त महाराजांनी म्हटलंय की ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे’ आता ही गोष्ट एकदम अफलातून आहे. सगळे अनुभव जरी आपल्याला येत असले तरी आपण, किंवा निराकार, किंवा आपलं स्वरूप त्या अनुभवांनी अनाबाधित राहतं. अनुभव स्मृतीत राहतो पण प्रत्येक अनुभवानंतर आपण जसेच्या तसे राहतो.

हे प्रत्येक साधकाला लक्षात घेण्यासारखं आहे कारण अनुभव कोणताही असो तो आध्यात्मिक नसतो, अध्यात्म हा अनुभवणाऱ्याचा शोध आहे, अनुभवाचा नाही कारण अनुभव अनेक आहेत पण अनुभवणारा एक आहे!
यामुळे सत्यप्राप्ती हा अनुभव नाही किंवा तो क्षणिक अनुभवासारखा वाटला तरी तो अनुभव नाही उलगडा आहे!

आता परिक्रमे सारख्या खडतर साधनेत काय वाट्टेल ते अनुभव येतात आणि परिक्रमीचे अनुभव हीच त्याच्या साधनेची फलश्रुती असते. हे अनुभव मग इतरांना गूढ आणि आध्यात्मिक वाटायला लागतात आणि ते पुन्हा त्या अनुभवांच्या जोरावर परिक्रमीला श्रेष्ठत्व बहाल करतात. परिक्रमी पुन्हा विनम्र होतो कारण त्याचं लक्ष अनुभवांवर असल्यामुळे त्यालाही वाटत असतं की अजून बरेच अनुभव यायचेत, आता कुठे सुरुवात आहे! तो पुन्हा नवनवीन अनुभवांच्या शोधार्थ निघतो आणि अनुभवणाऱ्याला, किंवा स्वत:ला विसरतो, त्याला वाटतं की हा अनुभव आला की झालं आता सत्य गवसलंच आणि त्याच्या लक्षातच येत नाही की कोणताही अनुभव आपल्याला स्वत:प्रत आणणार नाही कारण आपण स्वत:पासून कधी दुरावलेलोच नाही!
_________________________________

असो, तर साधना अशी निवडा की ज्यातून फक्त भासाचं निराकरण होईल आणि भास काय आहे? तर आपण स्वत:ला निराकार असताना आकार समजतोय!

सगळ्यात सोपी साधना म्हणजे बोध आहे, जस्ट अंडरस्टॅंडींग, हा लेख नुसता वाचून देखील तुम्हाला बोध होईल कारण स्वत:ला शोधायला कशाला प्रयास हवा?

अष्टावक्र संहितेवर भाष्य करताना ओशोंनी म्हटलंय, ‘समझकी कमी साधनासे पूरी करनी पडती है, अन्यथा बोध काफी है! ’
_________________________________________

या लेखाचा उद्देश खडतर किंवा वर्षानुवर्ष चालणारी साधना कशी स्वत:ला स्वत:ची भेट दुर्लभ करते हे सांगणं आहे. तिचा फायदा खडतर साधना करणाऱ्यांना तर होईलच पण अशी साधना न करता येण्याची खंत असलेल्यांना ही होईल.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १