दही भात

  • ४००-४५० ग्रॅम तांदूळ
  • १ लिटर दही
  • अर्धा लिटर दूध
  • फोडणीचे साहित्य, कढिलिंब, भरलेल्या (कुटाच्या/सांडग्याच्या) मिरच्या
  • हवी असल्यास मुठभर उडदाची डाळ
४५ मिनिटे
१५-२०

मृदुलाताईंनी सहभोजनासाठी पदार्थ विचारले आहेत.  त्यापैकी काही देण्याचा विचार आहे.  आता दही भात देत आहे.  हा पदार्थ न्यायच्या दिवसाच्या आदल्या दिवशी करून ठेवल्यास अधिक चांगला.

तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मोकळा भात करा.  तो साधारण थंड झाला की परातीत किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढा.  त्यात दही आणि चवीला किंचित मीठ घालून मोकळ्या हाताने कालवा.  हाताने कालवल्याने दही सर्वत्र नीट लागते आणि शिते मोडत नाहीत.

या भातावर तुपाची फोडणी जास्त चविष्ट लागते.  अर्थात आहारनियंत्रणाकरता किंवा वैद्यकीय कारणाकरता तूप चालत नसेल तर यंत्रशुद्ध तेल (refined) वापरावे.  हिंग, जिरे (मोहरी नव्हे) घालून फोडणी करा.  त्यात कढीलिंब आणि कुटाच्या मिरच्या घाला. मिरच्या कुरकुरीत होऊ द्या. ती फोडणी कालवलेल्या भातामध्ये घाला.  आवडत असल्यास भातात किंचित साखर पण घालू शकता.  त्यामध्ये पाव लीटर दूध घाला.

कालवलेला भात शीतकपाटात ठेवा.  काही तास शीतकपाटात ठेवल्यावर त्यातले दूध जिरून भात आणखी फुगतो. आणि कोरडा होतो.  बाहेर घेऊन जायच्या वेळेला त्यात आणखी दूध घालून जसा हवा तसा सैल करून घ्या.

भातात खूप द्रव जिरतो/शोषला जातो.  त्यामुळे केंव्हा भात कालवला आहे आणि केंव्हा तो प्रत्यक्ष खाणार याच्या हिशोबाने त्यातल्या दुधाचे प्रमाण कमी-जास्त करावे.

हा भात १५-१६ जणांना सहज पुरेल.  जर दोन-तीन व्यक्ती हाच पदार्थ करणार असतील तर त्याप्रमाणे एकंदर तांदूळ घ्यावे.

अश्या भाताबरोबर कुठलेही लोणचे सुद्धा छान लागते.

 

यांतल्या फोडणीमध्ये आवडत असेल तर उडदाची डाळ चांगली लागते.  फोडणीमध्ये घालण्या आधी उडदाची डाळ २ तास भिजवून त्यातले पाणी निथळून घ्या.  तेला/तुपाची फोडणी झाल्या झाल्या त्यांत कधिलिंब आणि उडदाची डाळ घातली तर त्याचे तपमान एकदम कमी होते.  तेव्हा ती फोडणी विस्तवावर काही वेळ ठेऊन डाळ खरपूस होऊ द्या.

परंपरागत आणि गृहस्वामिनीचा दीर्घ अनुभव