अपूर्ण स्वप्ने उरी हजारो रडावयाची, हसावयाची
करावया पाठलाग त्यांचा हवी तयारी उडावयाची
सुडोल बांधा, सतेज कांती हवीहवीशी जगास साऱ्या
उगाच का जाहिरात करता उद्याच गोरे दिसावयाची ?
तणाव इतका प्रचंड आहे उदास सारे सभोवताली
अनेक करती उगाच धडपड क्लबात जाउन हसावयाची
चढाव गेला, उतार आला, तनामनाने विरक्त व्हावे
जडीबुटीने कधी उभारी मिळेल का वाढत्या वयाची ?
वृथाच लंबोदरास केल्या नमून मी सर्वदा विनवण्या
प्रसन्न नाही कधी, तरीही मलाच उर्मी पुजावयाची
नसून चणचण, असून अडचण,घरात माझी जयास वाटे
तयास सांगा मला न इच्छा अता जराही जगावयाची
दिवाळखोरी घरात येता, नवीच मजला खुषी मिळाली
यतीम झालो मला न आता जकात आहे भरावयाची
जमेल तैसे जगून झाले झकास सारे म्हणून हसतो
उगाच नाही मला कुणाची कधी शिकायत करावयाची
विचार दोलायमान माझे, समुद्र "निशिकांत"ला खुणावी
पुन्हा उसळली मनातली ती जुनीच आशा सरावयाची
निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३