चिंब होण्याच्याच इच्छेने जरी माणूस येतो
नेहमी आभाळ भरले की कुठे पाऊस येतो?
मी स्वतःसाठी जरा बाजूस पैसे काढले की,
जवळच्या नात्यात हटकुन सोहळा फडतूस येतो
मी सुगंधी मानतो माझ्याच डबक्यातील पाणी
अन्य जागी अत्तराचा वासही आंबूस येतो
वर्षभर शाळेस मी ढुंकूनही नाही बघत अन,
पोरगा नापास होता घालण्या धुडगूस येतो
फार पूर्वी ती म्हणाली तीच माझी पूर्व झाली
काय माहित, सूर्य आता कोणत्या बाजूस येतो?
-------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'