मुक्तछंदी जगावे

नको शिस्त, मी मुक्तछंदी जगावे
वसे अंतरी ते जगाला दिसावे

कुठे ठाव आहे मनाचा मनाला ?
मनाने कुठेही असे का रमावे ?

कधी पाप झाले, रुतावे मनाला
पुरावे गुन्ह्याचे कशाला पुरावे ?

जरी काहुराला कुणाची न भीती
भिऊनी दिव्याने कशाला विझावे ?

चला कुंपणाला विचारू "गड्या तू
मळा राखुनी का उपाशी असावे" ?

उशापायथ्याला हवी संपदा का ?
खरे दु:ख साथी, मनी हे रुजावे

उखाणे नको स्पष्ट दे फैसला तू
जगी मी जगू की खुशीने मरावे

जरासे कुठे सावलीला बसाया,
उन्हाचा प्रवासी अधी मी असावे

मऊ पाश "निशिकांत"च्या भोवताली
गळावे, समाधान मागे उरावे

निशिकांत देशपांडे. मो.नं.--९८९०७ ९९०२३
दुवा क्र. १