भास नुसता

दु:ख सरले, चल जगू मधुमास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता

लोक म्हणती काय याचे भय मनाला
जीव घेई कोंडलेला श्वास नुसता

गुंतले मन मोहजाली पण तरीही
दाखवाया घेतला सन्यास नुसता

धाडले वृद्धाश्रमी तिज तूच ना रे !
माय मरता क्षौर हा आभास आहे

राजपुत्राला फुकाचे लाख मुजरे
बाप पुप्ण्याईच पुंजी, खास नुसता

सर्व नाही या जगी लुटण्यास तुम्हा
सोड सुमने, लूट चोरा वास नुसता

काय ती अश्वासने अन भूल थापा
शुन्य करणी, भाषणी फर्मास नुसता

मातल्या सेना ब्रिगेडी का कळेना
मार्ग गांधीचा म्हणे बकवास नुसता !

काळजी :निशिकांत" विश्वाची पुरे रे
का उगा डोक्यास तुझिया त्रास नुसता?

निशिकांत देशपांडे  मों. नं.  ९८९०७ ९९०२३

E Mail :--   nishides1944@yahoo.com