अग अग म्हशी !

पूर्वीच्या काली अनेक बाळंतपणाऩा तोंड देणारया स्त्रिया प्रत्येक वेळी आता पुन्हा नको ग बाई म्हणत पुन्हा पुन्हा त्या आपत्तीस तोंड देत, (अर्थात त्या बिचारया त्या आपतीला कारणीभूत नसत. ) तशीच काहीशी अवस्था माझी प्रत्येक अमेरिकेच्या खेपेनंतर होते म्हणजे प्रत्येक वेळी मी आता पुन्हा नाही म्हणतो आणि वर्षभरातच पुन्हा "अग अग म्हशी(अर्थात असे कुणाकडे पाहून म्हणायची काय बिशाद आहे! )म्हणत जायच्या तयारीला लागतो. यावेळी मात्र अगदी निक्षून मी तरी जाणार नाही असा कृतनिश्चय जाहीर केला त्याबरोबर "ठीक आहे तर मी एकटीच जाइन? " असा आमच्या झाशीच्या राणीने पुकारा केल्यावर मात्र "अब तेरा क्या होगा काल्या? "असे गब्बरने विचारल्यावर काल्याची जी स्थिती झाली तीच माझी झाली. अर्थात निश्चयाच्या महामेरूपुढे आम्हाला नेहमीप्रमाणे हार खावी लागली. आणि आम्ही आपले ट्रॅव्हल कंपनीला फोन करून तिकिट कुठले उपलब्ध आहे याचा शोध घेऊ लागलो. मात्र सध्या फारच गर्दी आहे कारण अमेरिकेहून आलेले सगळे लोक ऑगस्ट महिन्यातच परततात शिवाय सेप्टेंबरमध्ये शाळा कोलेजे उघड़त असल्याने विद्यार्थ्यांचीही गर्दी असते असे कळल्यावर कदाचित तिकिटच न मिळाल्याने जाणे रहित होईल अशी आशा वाटू लागली पण प्रवासी कंपनीलाही माझ्यापेक्षा सौ, चीच काळजी जास्त असल्याने त्यानी जमवाजमव करून आम्हाला १० ओगस्टच्या डेल्टा विमानकंपनीचे तिकिट उपलब्ध करून दिलच आणि मग रड़तराव घोड्यावर बसायला निघाले.

ठरल्याप्रमाणे नऊ ओगस्टला दुपारी चार वाजता आम्ही एडिसनला प्रयाण करण्यासाठी घरातून केके ट्रॅवेल्सच्या गाडीतून निघालो. यावेळी आम्चे चिरंजीव व सूनबाई आणि नातवंडेही घरात असल्याने गॅस, विजेचा मेनस्वीच व सगळ्यात शेवटी घराचे दार नीट बंद केले की नाही याविषयी दक्ष राहूनही शेवटी खरोखरच आपण बंद केले की नाही याविषयी एकमेकावर संशय व्यक्त करण्याचा त्रास वाचला. आणखी दोन प्रवासी आमच्याच गाडीतून मुंबई हवाई अड्डयावर यायचे होते त्या बाजूला गेल्यावर त्या घराकडे जाणारा रस्ता बंद होता असे कळले त्यामुळे चालकाला आजूबाजूच्या लोकांच्या शिव्या खात गाडी रस्त्यावर उभी करावी लागली. थोड्या वेळात त्या घरातील गृहस्थ कुठुनतरी येऊन उभे राहिले व त्यांच्या दिग्दर्शनाखाली गाडी घराजवळ नेता आली. सुदैवाने सामान बाहेर काढून प्रवासी ललना आपल्या छकुल्यासह बाहेरच उभी होती. आम्हाला दिग्दर्शन करणारे गृहस्थ तिचे सासरे असावेत तेही तिला व नातवाला सोडायला येणार होते. थोडावेळ निरोपसमारंभ होऊन गाडी रस्त्याला लागली.

आम्ही घरातून निघताना छत्री घ्यावी की नको या विषयावर चर्चा झालीच होती कारण पुण्यात मधूनमधून पाऊस चालू होता व मुंबईत असेलच असे वाटत होते. पण त्याचबरोबर एडिसनला मुलाकडे अनेक छत्र्या असताना आणखी एका छत्रीचे ओझे कशाला न्यायचे हा दुसराही विचार होता. छत्री घेण्याची कल्पना माझी होती पण तिचे ओझे होईल असे मलाच वाटत होते तरीही नेहमीप्रमाणे निर्णय घेण्याची प्रक्रिया दुसऱ्या पक्षाकडे पक्षी आमच्यातील अधिक व्यवहारचतुर व्यक्तीकडे सोपवण्याची प्रथा पाळून मी गप्प राहिलो. कोथरूड सोडल्यावर पाऊस पडू लागल्यावर मग मला छत्रीची आठवण झाली. व त्यावेळी छत्री घेतली नाही हे माहीत असूनसुद्धा जणू मला हे आताच लक्षात येतय अशा थाटात "शेवटी दोघांच्या ही छत्री घेण्याचे लक्षात राहिलेच नाही की " असे म्हणून मी दोषाच्या अर्ध्या वाट्यातून तरी मुक्तता मिळते का हे पाहिले पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण "तुम्ही म्हणत होता म्हणजे घेतलीच असणार म्हणून मी लक्ष दिले नाही " असा प्रतिसाद मिळाल्यावर वाल्याकोळ्याचीच गत माझी झाली. शिवाय कधी नव्हे ते एक काम तुमच्यावर सोपवले तर तेवढेही धड करता येत नाही ना? या मुद्रेने माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकण्यात आल्यावर बाहेर पडणारया पावसाच्या पाण्यात बुडून जायचेच काय तो मी बाकी राहीलो. चुल्लूभर पानीमे डूब मरना म्हणजे काय ते अशा वेळी कळते.

यानंतर मुंबई विमानपत्तनवर पाऊस आला आणि आमच्यावर भिजण्याची पाळी आली तर माझी काय दशा होईल याची कल्पनाही करण्याचे धाडस मी केले नाही कारण अशा कल्पना करणे हा माझ्या हातचा मळ आहे. आणि त्या कल्पनानी बेचैन होऊन उगीचच समोर आलेला गोड घासही कडू होऊन जातो. उदा. ऍम्स्टरडॅम ला पोचेपर्यंत आपल्याला पुढचे विमान पकड़ता येईल की नाही ही काळजी मला कुरतडत असते, (जणू काही विमान पकड़णे म्हणजे आगगाडीच पकड़णे आहे, ) तर तेथे चांगला तीन तास बसून कंटाळून विमानात चढल्यावर आता नेवार्क विमानतळावर आपल्या हाताच्या बोटांचे ठसे जुळतील की नाही की तेथूनच आपल्याला परत हाकलून देतील अशा चिंतेचा भुंगा मला कुरतडून टाकत असतो. कारण अशा गोष्टी आमच्या काही परिचितां (इतकेच काय पण जोर्ज फर्नांडिस, शाहरुख खान अशा महनीय व्यक्तींच्याही)बाबतीत घडलेल्या त्यानीच (म्ह. परिचितानी, फर्नांडिस व शाहरुख खान यानी नाही )केव्हातरी कानावर घातलेले असते.

गाडी जरा पुढे गेल्यावर चालकाने महामार्गावर आंदोलन चालू आहे आणि त्यात गोळी बार झाला चार लोक मेले असे सांगून आमच्या सगळ्यांची झोप उडवली. आता आपण मुंबईलाच पोचतो की नाही अशी सगळ्यांना भीती वाटू लागली सुदैवाने तसे काही झाले नाही. शीवच्यापुढ़े मुंबईची वाहतूक अतिशय संथ गतीने चालू झाली. आम्ही पहाटे एकच्या उड्डाणासाठी इतक्या लवकर म्हणजे दुपारी चार वाजता म्हणजे तब्बल नऊ तास अगोदर निघाल्याबद्दल आम्हाला हसणाऱ्या लोकानी(हो वाटेत आमच्या मेहुणीचा फोन आला होता आणि आम्ही इतक्या लवकर निघालयाबद्दल तिने आम्हाला अगदी वेड्यातच काढले होते) वाहतुकीचा तो वेग पाहून उलट आम्हाला शाबासकीच दिली असती. त्यामुळे आम्हाला विमानतळावर आत प्रवेश न मिळता काही काल बाहेरच थांबावे लागेल हा आमचा अंदाजही खोटा ठरला.

गाडीतून सामान काढून ढकल गाडी म्ह. ट्रॉली वर लादून थोडावेळ प्रतीक्षा कक्षात बसण्याचा विचार आम्ही करत होतो कारण मागील वेळेचा अनुभव तसा होता व पहाटे एकच्या उडदाणासाठी रात्री दहा वाजण्यापूर्वी आत सोडणार नाहीत असा सर्वांचा इशारा होता. आमच्या डेल्टा विमानकंपनीचे नाव कोणत्याच द्वारावर नव्हते पण विमानतळावर शिरताना रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर द्वार क्रमांक ८ असे लिहिलेले आमच्या बरोबरच्या तीक्ष्ण नजरानी पाहिले होते. आमच्या बरोबरच्या सहप्रवासिनीला लुफ्तांसा विमानाने जायचे होते व तिचा द्वार क्रमांक ६ होता पण त्याचबरोबर चालकाने ढकलगाड्या ८व्या द्वाराजवल आहेत हे हेरल्यामुळे गाडी त्या द्वारावर थांबवली व तातडीने जाऊन आमच्यासाठी दोन व आमच्या सहप्रवासिनीसाठी एक ढ. गाडी आणली व आमचे सामान केकेच्या गाडी बाहेर काढून त्यावर लादले.

आता आमचा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. ८ क्रमांकाच्या द्वारावर चौकशी करता डेल्टा विमानासेवेसाठी तेच द्वार होते असे द्वार पालानी सांगितले एवढेच नव्हे तर आतापासूनच आत सोडण्याचीही तयारी दाखवली त्यामुळे आमचा बरोबर आणलेले खाद्यपदार्थ खाऊन मग आत शिरण्याचा बेत बारगळला व आम्ही लगेचच पासपोर्ट व तिकिटे फडकवत आत शिरलो. मुंबई हवाई अड्डयात आमच्या पहिल्या म्हणजे २००२ च्या उड्डाणा नंतर बराच चांगला बदल होत जात आहे असे जाणवले यावेली तर प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोर स्वयंचलित दार आम्हास पाहून उघडताना पाहून खरोखरच दर्जा सुधारत असल्याची जाणीव झाली. आपोआप उघडलेल्या दरवाजातून सामानासह प्रवेश केल्यावर लगेचच डावीकडे डेल्टा विमानकंपनीचा फलक दिसला व तेथून आत शिरल्या वर तर आश्चर्याने आणखीनच थकक होण्याची पाळी आमच्यावर आली कारण एका सुटाबुटातील कर्मचाऱ्याने Welcome Mr.and Mrs. Kulkarni" असे आमचे स्वागत केले. आमची सौभाग्यवती तर आपली व आपल्या नवऱ्याची ख्याती इथपर्यंत पोचल्याचे पाहून इतकी प्रभावित झाली की थोडावेळ काय बोलावे तिला सुचेचना. खरतर ती घरात जा. जा. (जानकी जासूस) म्हणून प्रसि्द्ध होती कारण आमच्या मुलानी किंवा मीही एकादी गोष्ट कितीही तिला नकळत केलेली असली(मुलांच्या बाबतीत म्हणजे चोरून वस्तू खाणे किंवा माझ्या बाबतीत चुकून माकून मी तिच्या अनुपस्थितीत चहा करून घेण्याचा प्रयत्न केल्यास दुधाचे भांडे सांडून ते परत जसेच्या तसे ठेवण्याचा प्रयत्न करणे वगैरे) तरी ती त्यांची चोरी पकडायचीच अशी जिची ख्याती तिला इतके प्रभावित झालेले पाहून अर्थातच तो कर्मचारी प्रसन्न झालाच कारण तिने आपले आश्चर्य गुप्त न ठेवता " आपको कैसे पता चल गया " असा सवाल करून झाकली मूठ सव्वालाखाची ठेवण्याचे आपले नेहमीचे कसब दाखवले नाही मग तर आणखीच उत्तेजित होऊन त्या कर्मचाऱ्याने "फ्रॉम पुणे ' असे म्हणून तिला अधिकच चकित केले. तोपर्यंत त्याचा सहकारी पुढे आला व त्यानेही "अब्दुल्लाको सब जानकारी रखनी पड़ती है "असे म्हणून तिला आणखीच कोडयात टाकले. मग मात्र थोडावेळ जाऊ देऊन त्यानी शेरलोक होम्सप्रमाणेच "Its very simple तुमच्या बॅगेवर एवढ्या मोठ्या अक्षरात तुमचे नाव व पत्ता लिहिला आहे की फक्त अंधळ्याला किंवा निरक्षर माणसालाच काय ते तुम्ही कोण हे कळणार नाही " असे म्हणून तिला आपले गुपित उघड करीत जमिनीवर आणले.

तरी डेल्टा विमानकंपनीने इतर कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर आम्हाला प्रभावित केले यात वादच नाही, कारण त्यापुढे अब्दुल्लानेच प्रथेनुसार आम्ही कोणी इतरांचे सामान आपल्या बेगेत घेतले नाही ना व बेगा इतर कोणाच्या हवाली केल्या नव्हत्या ना हे आमच्या बेगेत बोंब वगैरे नाही याची खात्री करून घेण्यासाठी विचारले. इतर बऱ्याच कंपन्या आता एकच बॅग न्यायला मोकळीक देत असताना डेल्टा विमानसेवेत प्रत्येकी २३ किलो वजनाच्या २ बॅगा नेण्याची परवानगी अजूनही आहे हे विशेष आणि त्यावरही कड़ी म्हणजे आमची एक केबीन बॅगसुद्धा विमानात ती ठेवायला कदाचित अडचण होईळ म्हणून चेक इन बॅगा बरोबरच पाठवायचा सल्ला त्याने दिला, आम्हीही तो मानला, तोवर आमचे सामान विमानकर्मचारी एका कौंटरवर घेऊन गेलाही, तिकिट काढताना आम्हाला जे बैठक क्रमांक दिले होते तेच आम्हाला देण्यात आले. आरक्षण करताना आम्ही व्हील चेअर मागितली होती पण मला ते फारसे आवडत नव्हते म्हणून ती न घेण्याचा मी निर्णय घेतला होता पण कौंटरवरील युवतीने मात्र तुम्ही मागितली आहे तर घ्याच असा आग्रह धरला व मी आढ़ेवेढ़े घेतले तरी तिने बळेबळे मला खुर्चीत बसवलेच, नंतर मात्र ही गोष्ट फायदेशीर झाली असे दिसले कारण इमिग्रेशनसाठी बरीच मोठी रांग होती पण आमच्या खुर्चीचालकाने शिवाजीच्या मावळ्याच्या थाटात आम्हास एकदम रांगेच्या पुढे नेऊन इमिग्रेशानाधिकाऱ्याच्या पुढ्यातच नेऊन सोडेले. त्या माणसाने आमचे कागदपत्र पाहून उगीचच काहीतरी विचारायचे म्हणून मागच्या वेळी भारतात परत येताना कोणत्या विमानसेवेने व कोणत्या क्रमांकाच्या विमानाने आला होता असे विचारले अर्थात मला ते आठवत नव्हते व तसे मी कबूल केले व असे पूर्वी विचारत नव्हते असेही त्याला सांगितले तर आता त्याची आवश्यकता आहे म्हणून त्याने आम्हाला सोडून दिले.

त्यावेली पु. ल. देशपांडे यानी तिकिट जपून ठेवायला सांगणाऱ्या कंडकटरल़ा जे उत्तर दिले ते देण्याचा मोह मी टाळला कारण त्या अधिकारयाला तेवढी विनोदबुद्धी नसली तर उगीचच आम्हाला अडकवायचा. खुर्ची चालकाने मग आम्हास आमच्या जवळील सामान व आमची खुर्ची screening करण्याच्या रांगेत नेले तेथेही खुर्चीवर बसण्याचा फायदा मिळून आमच्याबरोबर असलेले खाद्यपेयही चाळणी तून सुखरूप आत पोचले व त्यापाठोपाठ आम्हीही, या वेळी आमच्या सामानातून वा आमच्या शारीरिक तपासणीतून काहीच निष्पन्न झाले नाही व त्यानंतर एकदम आमच्या प्रवेशद्वारा शीच चालकाने आम्हास नेऊन सोडले, त्यावेली १२ ही वाजले नव्हते त्यामुळे आम्हाला अगदी आरामात खाद्यपेयाचा समाचार घेता आला शिवाय खुर्चीचालक तुम्हाला आत सोडायला परत येतो असे सांगून गेला त्याने आणखी काही प्रवाशांचाही भार घेतला होता.. १-१० ची वेळ विमान सुटण्याची होती व तसे ते सुटलेही! आता जरा झोप घ्यावी असा विचार होता कारण दिवसभर झोप घेणे जमले नव्हते पण त्या आडवेळीसुद्धा डेल्टा विमानसेवा आपल्या आदरातिथ्यपरंपरेत खंड पडू द्यायला तयार नव्हती आणि त्यानी तशाही वेळी अगदी यथासांग आम्हाला शाकाहारी व इतरांना सामिष जेवणाचा घाट घातलाच त्यामुळे नुकताच घरातून आणलेल्या धपाटयां चा आस्वाद घेतला असून या जेवणास तोंड द्यावे लागलेच अर्थात मला जमला तेवढाच त्या भोजनास मी न्या दिला.

त्यानंतर मात्र मी थोडीफार झोप घेण्याचा प्रयत्न केला. नेवार्कच्या या प्रवासात एक थांबा ऍमस्टरडमचा होता. तेथे उतरण्या पूर्वीही पुन्हा एकदा खानपानाचा लाभ घ्यावा लागला. आरक्षणाच्या वेळी येथे अगदी मामूली थोड़ा वेळ थांबेल असे सांगितले गेले होते प्रत्यक्षात मात्र तेथे तब्बल तीन तासांचा मुक्काम होता. येथे आमचे विमानतळावर उतरण्याचे द्वार क्र. ६ व परत चढ़ावयाचे द्वार क्र. ३ यात अंतर अगदीच कमी असल्याने मी खुर्ची न घेता चालत जाणेच पसंत केले. तीन तास बाहेर बसल्यावर आत सोडल्यावर पुन्हा एकदा तपासणीला तोंड द्यावे लागले. खरे तर विमानतल सोडत नसताना अशी पुन्हा पुन्हा तपासणी करण्याचे कारण असते ते कळत नाही, अर्थात त्यांचीही काही कारणे असतील विमानतळ बराच मीठा आहे म्हणे पण त्याच्या विस्ताराची कल्पना येण्यासाठी फिरण्याचे बळ व कारण दोंहींचा अभाव असल्याने एवढ्या माहितीवरच समाधान मानावे लागले. विमानतळावर बराच वेळ बसल्यामुले की काय बरेच ताजेतवाने झाल्यामुळे पुढील वेळ बरा गेला त्यातही दोनदा खानपान झालेच. यावेळी बसल्यावर लगेचच अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागात द्यायचे फॉर्म्स दिले व ते नंतर चुका होतात म्हणून मी शांतपणे भरले. तरी एक चूक झाली होती पण मागच्या वेळी जेटच्या कर्मचा्रयाने एकादी चूक किंवा खाडाखोड चालते असे सांगितले होते म्हणून दुसरा फोर्म न घेता गप्प बसलो. पुढचा टप्पाही नऊ तासांचा होता व तोही शेवटीशेवटी घड्याल़ाकडे पाहत संपवला. म्हणजे तो संपला त्यासाठी आम्हाला बसून राहण्यापलिक्डे काही करावे लागले नाही.

आता मात्र खरच नेवार्क आल तेव्हा आता उतरायच. येथे मी काही चाकाची खुर्ची घ्यायची नाही असे ठरवले. इमिग्रेशनची राँग बरीच लांब असली तरी खूपच कौंटर्स असल्यामुळे फारसा वेळ लागला नाही. सुदैवाने आमचे बोटाचे ठसे जुलले. मात्र आम्ही सहा महीने राहणार म्हटल्यावर समोरील आफ्रोअमेरिकन युवतीने आमचे टिकिट पाहण्यास मागितले व आम्ही खरच पाच महिन्यातच परत जाणार आहोत हे पाहून सहा महिन्याचा शिक्का मारून दिला, आता एकच काम राहिले होते ते म्हणजे सामान ताब्यात घेणे व नंतर तपासणी फारशी न होता बाहेर पड़णे. त्यासाठी अगोदर ट्रॉली घेणे आलेच. दोन ट्रोल्या घेण्यासाठी सहा डॉलर्स आम्ही घट्ट मुठीत धरून ठेवले होते. तेथे पोचल्यावर आम्ही तीन डॉलर्स मशीनच्या आत सरकावले पण ट्रोली काही निघता निघेना तेव्हां तेथील माणसाने अजून दोन, अजून दोन असे म्हटले पण आमच्या डोक्यात तीनचा आकडा इतका घट्ट बसला होता की तो आम्ही पुन्हा पुन्हा तीच ट्रोली सोडवायचा प्रयत्न करू लागल्यावर त्याने त्या मशीनवर लावलेली पाटी दाखवली त्यावर एका ट्रॉलीला पाच डॉलर असे लिहिलेले पाहिल्यावर कुठे आमच्या हातून आणखी दोन डॉलर्स सुटले.

अमेरिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याचे कानावर आले होते पण ओबामाना इतके दात कोरून पोट भरावे लागेल असे वाटले नव्हते मग त्यावर मात म्हणून आम्ही एकाच ट्रोलीवर भागवून ओबामाचेच एक डोलरचे नुकसान करण्याचा निर्णय घेतला. सामानाचे पट्टे फिरत होते तेथे पोचलो पण डेल्टाचा पट्टा कोठेच दिसेना, तो पट्टा बराच दूर होता व विचारत विचारतच तिकडे पोचावे लागले सुदैवाने आमच्याच बगा आशाळभूतपणे आमची वाट पाहत त्यावर फिरत होत्या, त्यावर आपल्या छाव्याना पाहिल्यावर झडप टाकणाऱ्या वाघिणीच्या आवेशात सौ. ऩे झेप घेतली. सामान ताब्यात घेतले व अर्थातच एका ट्रोलीवर लादून मला एकट्यालाच ढकलावे लागले. कारण मी एक डॉलर वाचवला होता ना! पण फारसा त्रास न होता आम्हाला सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला बाहेर चिरंजीव आमची वाट पाहत उभा होतेच तेथून पुढे काय करायचे याविषयी विचार करण्याचे मी सोडून दिले.