करायला गेलो गणपती ----

"व्हेन इन रोम बिहेव लाइक रोमन" असे म्हणतात. पण आपण इंडियन मात्र कुठंही गेलो तरी आपला इंडियनपणा सोडत नाही. उलट दुसरीकडे गेल्यावर तर त्या पणाला आपण अधिकच जपतो.आणि अमेरिकेत तर आपला तो हक्कच आहे कारण कोलंबस जरी अमेरिकेला आला तरी आपण  इंडियातच आलो असेच तो अगदी मरेपर्यंत समजत होता.

त्यामुळे आमच्या घरातील गौरी गणपती व नवरात्र हे कुळाचार बंद पडता उपयोगाचे नाही असे हे घरातल्या (खरं तर पूर्वीचा कर्ता पुरुष हा वाक्प्रचार आता बदलायला हवा)(कुळाचार) कर्त्या स्त्रीने ठाम ठरवल्यावर व दोन मुलांना ते अमेरिकेत असोत वा जगाच्या पाठीवर कोठेही असोत प्रत्येकी एक कुळाचार चालू ठेवला पाहिजे असा दम भरल्यावर काय बिशाद आहे मुलांची आणि सुनांची त्यावर काही हरकत घेण्याची. बिचारे निमूटपणे आईची आज्ञा पाळतात, बापाचा आदर्श आहे ना त्यांच्यासमोर.! आणी ज्या सुनेकडे गौरीगणपतीच्या सणाची जबाबदारी तिने सोपवली होती तिलाच  तिने गणपती बनवावा लागेल असे बजावले होते. पहिल्या वर्षी दोन्ही सुनांनी गणपती बनवण्याचा प्रयत्न केला त्या परीक्षेत त्या पासही झाल्या. त्यामुळे त्यांनी हातानेच गणपती बनवावा व त्याचेच विसर्जन करावे व एक मोठा गणपती विसर्जन न करता घरात राहू द्यावा असे ठरले व या आदेशाचीच अंमलबजावणी दोन तीन वर्षे करण्यात आली.त्यासाठी भारतीय मातीच वापरण्याचा आग्रह असल्याने प्रत्येक वेळी अमेरिकेत जाताना इतर वस्तूंबरोबर मातीचीही एक पुरचुंडी असते.

आम्ही अमेरिकेत आल्यामुळे या वेळच्या गौरी गणपतीच्या सणाचा ताबा अर्थातच कर्त्या स्त्रीकडेच असणार होता त्यामुळे भारतातून निघतानाच इतर गोष्टींबरोबरच  अमेरिकेत गणेशमूर्ती बनवण्याची जय्यत तयारी तिने केली होती. निघतानाच पुण्यात गणपती बनवणाऱ्या काही लोकांना गाठून कोठल्या प्रकारची माती ते वापरतात याची केवळ माहितीच नव्हे तर साच्यातील गणपती बनवणाऱ्यांना तिने कसे पटवले कोणास माहीत पण एक साचाही तिने पैदा केला. मातीचेही दोन प्रकार एक लवकर घट्ट होणारी तर दुसरी जरा वेळ घेणारी तिने बरोबर घेतले. अशा जय्यत तयारीनिशी आल्या तिच्या जय्यत तयारीकडे पाहून व त्यातही गणपतीचा साचा आणला हे पाहून मलाही जरा या उत्सवात आपलाही हातभार लागावा अशी बुद्धी गणरायाने दिली  मला माझ्या बालपणीच्या कसबाची आठवण झाली व मी साच्यातील का होईना गणपती बनवण्याचा निश्चय जाहीर केला.

माझ्या या निर्णयावर कोणत्याच दिशेने कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने मी जरा बुचकळ्यात पडलो. कारण "राहू दे की उगीच कशाला त्रास करून घेता तुमची सूनबाईच करेल" असा अभिप्राय मुलाकडून किंवा "लहानपणी तुम्ही केलेले गणपती लावलिजाव असायचे असे तुमच्याच आईसाहेब म्हणायच्या ना ?" असा प्रतिसाद अपेक्षित दिशेने न आल्याने मी जरा हिरमुसलोही कारण नियोजित कार्याला विरोध झाल्यावर कार्यपूर्तीचा जो आनंद मिळतो तो काही औरच !.

सौ चा लावलिजाव हा शेरा खरं तर आमच्या मातोश्रींचा होता. आमच्या मातोश्रींचा सुनेवर इतका विश्वास की आमच्या लग्नानंतर तिने मी आता चुलीपाशी फिरकणारही नाही फक्त बाहेर बसून मुले सांभाळीन असे सांगितलेच  पण इतर स्त्रिया "मेरे बनेकी बात ना पूछो मेरा बना हरियाला है "असे आपल्या कुलदीपकाचे कौतुक करतात तर हिने मात्र कौतुकानेच  पण  आपल्या मुलाचे सगळे दोषसुद्धा किंवा मुख्यत्वे दोषच अगदी तिखटमीठ लावून सुनेच्या कानावर घातले. आणि त्यामुळे बायकोच्या कोणत्याही दोषावर बोलण्याचा कसला हक्क तर मला उरलाच नाही पण वेळोवेळी "हो माहीत आहे तुमच्या आईनेच सांगितले"असे म्हणून मला डिवचण्याची एकही संधी ती दवडत नसे. या बाबतीत तिची स्मरणशक्ती इतकी तीव्र की माझ्याच आईने मला सांगितलेल्या गोष्टीही माझ्यापेक्षा तीच अधिक अधिकारवाणीने सांगू लागली. त्यातच हा लावलिजाव गणपतीचा प्रकार

इतर मुलांप्रमाणे मीही गणपती बनवावा अशी आईची इच्छा असे या बाबतीत (केवळ माझे नावच श्याम म्हणून नाही ) तर अगदी खऱ्या अर्थाने ती श्यामची आई शोभत होती.त्यामुळे रडत खडत का होईना तिची ही इच्छा पुरी करण्याचे मी मनावर घेई.   श्रावण निम्मा संपला की या कामा मागे मला लागावे लागे.आमच्या गावाबाहेर एक माळ होता त्यावर शाडूच्या मातीचा एक बराच मोठा पट्टा होता. तेथे जाऊन शाडू आणणे हा या कार्यक्रमाचा पहिला भाग असे नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे गावाबाहेरचा तो रस्ता चिखलाने भरलेला तर असेच पण त्याचबरोबर शाडूचा पट्टा तर अगदी डिंक घातल्यासारखा चिकट असे त्यातून मातीचा गणपती तयार होईल इतक्या प्रमाणात शाडू गोळा करणे हे मोठ्या कसबाचेच काम असे. त्या चिखलातून चालून शाडू गोळा करून परत येईपर्यंत माझ्या अंगावर चढलेल्या शाडू व चिखलाच्या लेपामुळे माझाच जणू गणपती झालेला असे. शाडू घराच्या मागे व्यवस्थित ठेवल्यावर या कामातील पहिला हप्ता पार पडायचा.

यानंतरचा दुसरा हप्ता म्हणजे ती  मूर्ती तयार करण्यासाठी त्यात कापूस मिसळून ती माती कुटणे  हा भाग तितकाच महत्त्वाचा असे कारण मातीत कापूस जितका एकजीव होत असे तेवढीच मूर्ती एकसंघ होण्याची शक्यता वाढत असे. नाहीतर मूर्तीचे अवयव एकमेकांशी सहकार्य करीत नसत व त्यातल्या त्यात सोंड व हात मूळ शरीरापासून अलग होऊन पुन्हा त्यांना एकत्र आणणे अवघड होत असे.माती कुटण्याचा माझा आळस नेहमीच माझ्या मूर्तीच्या  कारागिरीत आडवा येत असे. आणी कितीही प्रयत्न केले तरी मूर्तीचे हात व सोंड अलग होऊन खाली लोळण घेत. आई माझ्या गणपतीला लावलिजाव गणपती म्हणे. कारण तुटलेले अवयव मी धातूच्या तारा वापरून जोडून ते पुन्हा एकमेकापासून फारकत घेणार नाहीत असा प्रयत्न मी करी व या प्रयत्नास दाद न देता ते पुन्हा पुन्हा खाली लोळण घेत.गणपती लावलिजाव असल्यामुळे त्याचे हात पाय विशेषतः सोंड कोणत्याही क्षणी शंकरांची वाट न पाहता आपोआपच तुटण्याची शक्यता जमेस धरून माझे वडील एक चांगली मूर्तीही विकत आणत व प्रतिस्थापना त्याच मूर्तीची करत.

अशा प्रकारे  माझ्या लावलिजाव गणपतीचीच प्रसिद्धी जास्त झालेली असल्यामुळे कदाचित माझा हा निर्णय नेहमीप्रमाणेच अल्पकालीनच ठरेल याची सर्वांनाच खात्री असावी. पण जेवण झाल्यावर खरोखरच मी साचा घेऊन बसल्यावर निमूटपणे सौभाग्यवतीने मातीचे तीन पुडे माझ्यासमोर आणून ठेवले. त्या सगळ्या मातीचे गणपती बनवले असते तर बहुतेक अख्ख्या अमेरिकेला नाहीतरी एडिसनला तरी गणपतींचा पुरवठा करण्याइतके गणपती तयार झाले असते. त्या पुड्यातील मातींचे वेगवेगळे प्रकार होते म्हणे. एक माती ताबडतोब घट्ट होत असे तर दुसरी घट्ट होण्यास बराच वेळ घेते तर तिसरी या दोहींच्या मिश्रणाने तयार झालेली कारण दोन्ही पुडकी फुटल्यामुळे त्यातून जी माती गळाली त्या दोन्हींच्या एकत्रीकरणाने हे पुडके बनले आहे अशी माहिती मला देण्यात आली. त्यामुळे त्यातील कोणती माती वापरावी हाच मला प्रश्न पडला. कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत गणपती वाळणे आवश्यक होते. शिवाय जिने हा सगळा प्रपंच केला होता तिच्याही लक्षात त्यातली कोणती माती लवकर घट्ट होते ही गोष्ट नव्हती.तेव्हा मी अंदाजाने एक पुडा वापरण्याचे ठरवले.

सौने आणलेला साचा रबरी होता व तो एका बाजूने पेटीसारखा उघडता येत होता. तो बंद करून माती अगदी सरसरीत पातळ करून त्यात खालच्या बाजूने ओतायची व त्यावर दाब देण्यासाठी त्याचबरोबर दिलेले लाकडी तुकडे त्यावर दाबून वरून घट्ट सुतळीने बांधून ठेवायचे की दोन तासात ती माती घट्ट होते व साचा उघडून गणपती बाहेर काढता येतो अशी माहिती मला देण्यात आली.   

माती अगदी पातळ करून ती साच्यात ओतण्याचीच आज्ञा श्रीमतीजींनी केली होती तरीही मातीच्या घट्ट होण्याच्या गुणधर्माविषयी मी जरा साशंक होतो त्यामुळे ती साच्यात भरणे शक्य व्हावे इतपतच पाणी त्यात टाकून  साच्याच्या खालच्या भागातून मी साच्यात भरून तो  अगदी शिगिशीग भरल्याची खात्री करून साच्यावरील लाकडी आवरणाचे तुकडे ठेवून सुतळीने ते घट्ट बांधून टाकले. बऱ्याच काळानंतर गणपतीच्या तयारीला हातभार लागल्याच्या आनंदात मी हातावरील मातीचा चिखल धुऊन टाकला. माती विकणाऱ्याने दीड ते दोन तासातच गणपती घट्ट होतो व बाहेर काढता येतो असे सांगितले होते. पण आम्ही उगीच घाई न करण्याचे ठरवून दुसऱ्या दिवशी सकाळीच काढून ताजा ताजा गणपतीच बसवायचा असे ठरवले. या गणपतीस फक्त कपाळावर कुंकुमतिलक तेवढाच काय तो लावायचा बाकी रंगाचे काही कारण नाही मातीचा शुभ्र वर्णच गणपतीस चांगला दिसतो असे अगोदरच ठरले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अर्थातच गणपतीदर्शनाची उत्कंठा होती. अशी उत्कंठा बरेच दिवसात अनुभवली नव्हती. अर्थात मी उठण्यापूर्वीच आमच्या अपयशावर शिक्का मोर्तब करायला श्रीमतीजी उठल्याच होत्या माझ्या अपयशाविषयी तिला इतकी खात्री कशी होती याचे मला नवल वाटले नाही कारण तिच्या मते अशी खात्री मला कोणतेही काम सांगताना तिला असेच. पण या वेळचे कारण मला नंतर कळले. ते म्हणजे यावेळी साचेवाल्याने जी माती दीड तासात वाळते अशी खात्री दिली होती त्या मातीचे पुडके मागेच राहिले आणि घट्ट न होणाऱ्या मातीचेच पुडके मला देण्यात आले होते असे नंतर तिच्याकडूनच कळले.त्यामुळे कोणीही गणपती केला असता तरी निर्णय हाच लागणार होता.मात्र सुरवातीला मातीचा गोंधळ झाल्याचे न सांगता तिने निर्विकार मुद्रेने माझा प्रयत्न फसल्याचे माझ्या कानावर घातले "म्हणजे झाले तरी काय ?" असे मी विचारल्यावर "गणपती चांगला झाला होता पण पुरेसा वाळला नाही त्यामुळे साच्यातून काढताना काही भाग आतच राहिला "असे उत्तर मिळाल्यावर आपली लावलिजाव गणपतीची परंपरा अखंड राहिल्याचे दुःख मला झाले व त्याचबरोबर आता गणपती कोणता बसवायचा हा प्रश्नही अनुत्तरित राहिला.

तरीही तिच्या मुद्रेवर कुठल्याही प्रकारचे चिंतेचे लक्षण दिसले नाही. त्यामुळे आश्चर्य वाटून मी विचारले "मग आता गणपती कोणता बसवायचा? की पुन्हा दुसऱ्यांदा दुसरी माती वापरून करायचा? ""त्याची काही आवश्यकता नाही. काल तुम्ही गणपती करायला घातला तेव्हाच एक स्टँड बाय गणपती सूनबाईला हाताने बनवायला सांगितला होता मी "असे उत्तर मिळाल्यावर आणी त्यावर सूनबाईने संगणकीय  भाषेत "एक बॅक अप गणपती तयार ठेवला होता"असे असे सांगितलेले ऐकल्यावर माझी काळजी मिटली.

एकूण काय तर "करायला गेला गणपती आणि झाला मारुती " अशी म्हण असली तरी माझ्या हातून मात्र गणपतीच काय पण मारुतीही झाला नाही इतकेच खरे !