मराठी उच्च शिक्षण समिती - "मुशिस"

पार्श्वभूमी

देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे.

चीन, जपान व कित्येक युरोपिअन देशांत सर्व प्रकारचे उच्च शिक्षण त्यांच्या त्यांच्या भाषांतून उपलब्ध आहे. त्या अनेक देशांच्या त्या त्या भाषा बोलणाऱ्या लोकांहूनही मराठी बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर इतकी वर्षे उलटूनही आपले उच्च शिक्षण इंग्रजीच्या दावणीलाच बांधलेले आहे.

ज्या देशांत त्यांच्या स्वभाषेत उच्च शिक्षण उपलब्ध असते, त्यांच्या भाषेचा त्यामुळे विकास होत राहतो. ते लोक इंग्रजी न शिकताही आपापला विकास करून घेऊ शकतात. त्यामुळे इंग्रजी शिक्षणात जे मनुष्यबळ आपण वाया घालवतो आहोत, ते त्यांच्या देशात त्यांच्याच विकासाकरता उपयोगात येते. त्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. तिथे, इतर देशांशी ज्यांची गाठ पडते अशा १०-१५% टक्के लोकांखेरीज जनसामान्यांना अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत नाही. आपल्याला अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागायची कारण इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते. आता ते राहिलेले नाही. तरीही आपली मनोवृत्ती गुलामगिरीस इतकी धार्जिणी झालेली आहे की, आपल्या भाषेचा, विभागाचा विकास हे मुख्य ध्येय राहिले नसून, इंग्रजी भाषा प्रथम अनिवार्यपणे शिकून घेऊन मग विश्वाच्या प्रांगणात उच्च शिक्षणाचा शोध आपण घेऊ लागतो. मातृभाषेत ते उपलब्ध नाही याची आपल्याला ना खंत असत, ना खेद.

शालांत परीक्षेपर्यंत अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत असल्याने काय बिघडते? शिकावी की आणखी एक भाषा, आपल्यालाच उपयोगी पडेल. असे लोक बोलतात. हो. शिकावी. पण परकी भाषा अनिवार्यपणे का शिकावी? तिला शेकडो इतर पर्याय का उपलब्ध नसावेत. निदान आपल्याच भारतातल्या १४ मान्यताप्राप्त भाषा, इंग्रजीला पर्यायी का नसाव्यात? ह्याचा विचार होण्याची गरज आहे. इंग्रजी हवी त्यास ती शिकण्याचा पर्याय अवश्य असावा, मात्र हल्लीप्रमाणे ती अनिवार्य नसावी हे निश्चित.

कारणे अनेक आहेत. दहावी, बारावीचा उत्तीर्णता-दर आपण दरसालच्या परीक्षांत पाहतो. तो सुमारे ५०% च्या आसपास असतो. त्यातील बव्हंशी विद्यार्थी इंग्रजीत नापास होतात. त्यातील कित्येकांना पुढे शिक्षणच घेता येत नाही. तदनंतर उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते. किंबहुना तिचा त्यांना फारसा उपयोग तर होत नाहीच, मात्र तिचा दुस्वास मात्र वाटू लागलेला असतो. प्रगत "इंडिया" आणि "नापास" भारतातील ही तफावत आपण हकनाकच वाढवत आहोत. हे शैक्षणिक धोरण मुळातच चुकीचे आहे. इंग्रजी शिक्षण उपलध असावे. मात्र ते अनिवार्य नसावे.

मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही?

मुंबई विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकरता नियुक्त केलेल्या पुस्तकांवर आणि त्यांच्या लेखकांवर नजर टाकली तरीही एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती ही की त्यातील बव्हंशी लेखक मराठी आहेत. ते इंग्रजीत पुस्तके लिहीतात. इंग्रजीतून आपल्याच विद्यापीठांतून ती शिकवतात. मराठीच विद्यार्थी ती इंग्रजीतून शिकतात. आणि माझे काही मित्र, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून, आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालायचे, आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याने इंग्रजी उच्च शिक्षणालाच काय ते विद्यार्थी मिळायचे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले तरीही ते कुणी खरोखरच घेईल काय? अशी परिस्थिती! त्यामुळे इथे अंडे आधी की कोंबडी आधी असा प्रकारच दिसून येतो.

मात्र राष्ट्रीय योजना आयोगाने ह्याचा विचार करायला हवा आहे की, आपण आपल्या उपलब्ध मनुष्यबळापैकी किती टक्के मनुष्यबळ, अनिवार्य इंग्रजीच्या उपासनेत वाया घालवतच राहणार आहोत. आपल्याच मायबोलीत उच्च शिक्षण मिळू लागेल, तर हे मनुष्यबळ कायमस्वरूपी मुक्त होईल. इंग्रजीत नापासाचा शिक्का बसून आयुष्यभराकरता नाउमेद होण्याची पाळी, आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या हिश्श्यावर येणार नाही. पण आजवर कुठल्याही योजना आयोगाने इतका मूलभूत विचार केलेला दिसत नाही. मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही? ह्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

दुसरे एक कारण आहे, ते म्हणजे पुस्तकच नाहीत हो मराठीत. ती इंग्रजीतून अनुवादित करायला हवी आहेत. आता उच्च शिक्षण नाही म्हणून पुस्तके नाहीत की पुस्तके नाहीत म्हणून उच्च शिक्षण नाही, हा एक तसलाच न सुटणारा प्रश्न आहे. मुळात स्वतःच्या, स्वभाषेच्या, देशाच्या विकासाशी आपण प्रामाणिकच नाही. हे खरे आहे.

काय करायला हवे आहे?

मराठी विचारवंतांनी आपल्या मायबोलीच्या लेकरांच्या विकासाकरता, मायबोलीच्या विकासाकरता, हे एकदा आणि नेहमीकरता नक्की करण्याची गरज आहे की मायबोलीतून उच्च शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. आधुनिक शास्त्र हे मान्यच करते की असे झाल्यास व्यक्तींचा विकास झपाट्याने होईल. मात्र हे साधावे कसे?

याकरता एक "मराठी उच्च शिक्षण समिती-मुशिस" असावी. तिने पाच-दहा वर्षांच्या सुनिश्चित कालावधित महाराष्ट्रात, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध होईल अशाप्रकारचे नियोजन, कार्यान्वयन करावे आणि शिक्षणसंस्थांनी, शिक्षणमहर्षींनी, राज्यकर्त्यांनी त्यात आपापल्या अधिकारास, क्षमतेस साजेशी भूमिका प्रामाणिकपणे निभावावी. तरच हे साध्य होण्यासारखे आहे.

संकल्पना अशी आहे की जे प्राध्यापक स्वतःच लिहिलेली विज्ञान व तंत्रज्ञानाची इंग्रजी पुस्तके, इंग्रजीतून विद्यार्थ्यांस शिकवत आहेत, त्यांनीच त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करावेत. त्यांनीच ते मराठीतून शिकवावेत. त्याकरता इंग्रजीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे आणि जे इंग्रजीने दिले नाही ते मायबोलीकडून हक्काने मागून घ्यावे.

मी काय करू शकतो?

७ डिसेंबर २००४ रोजी माझी अँजिओप्लास्टी झाली. लोकं "गेट वेल सून" म्हणायला येत. कसे? ते मात्र मला माहीत नव्हते. ते शोधून काढण्याच्या प्रयत्नात "डॉ. डीन ऑर्निशस प्रोग्रॉम फॉर रिव्हंर्सिंग हार्ट डीसीज", डॉ. डीन ऑर्निश, पृष्ठसंख्या: ६७१, बॅलंटाईन बुक्स, १९९०, हे पुस्तक माझ्या वाचनात आले. मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. स्वतःस ते शब्द-न्-शब्द समजावे म्हणून मी त्याचा मराठीत अनुवाद केला. त्या पुस्तकातील सल्ल्याबरहुकूम जीवनशैली परिवर्तने घडवत घडवत मी माझ्या हृदयविकाराची माघार घडवली. आज किमान औषधे घेऊनही माझा रक्तचाप १००/७० मिलीमीटर पारा, असा राहत आहे. मग ह्याच संबंधात मी "बायपासिंग बायपास सर्जरी", डॉ. प्रतीक्षा रीग डेब, एम. बी. बी. स., एम. डी. (मुंबई) व डॉ. एल्मर म. क्रँटन, एम. डी. (अमेरिका), पृष्ठसंख्या:२६७, प्रतिबंधक हृदयोपचार संस्था प्रतिष्ठान, २००७ ह्या पुस्तकाचाही मराठीत अनुवाद केला. त्यानंतर मला वैज्ञानिक पुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्याचा छंदच लागला. रुची आणि गतीही प्राप्त झाली. त्यानंतरही मी आणखी तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानातील किमान ५० पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध झाल्याखेरीज कुठलाही अर्थपूर्ण, उच्च शिक्षण अभ्यासक्रम सुरू होऊच शकत नाही. ह्यासंदर्भात अशाप्रकारचे अनुवाद करणे मला वरील पार्श्वभूमीमुळे शक्य झालेले आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी ह्यात जे काय करू शकतो, ते करायचे असा निर्णय घेतला आहे.

मी स्वतः अनुवाद करू शकतो, इतरांना मदत करू शकतो, "मुशिस" च्या कार्यात मोलाचा वाटा उचलू शकतो. इतर कोण कोण, काय काय करू शकतात हे त्यांच्याजवळ ही संकल्पना मांडून समजून घेऊ शकतो आणि एकूणच ह्या संकल्पास सशक्त आधार देऊ शकतो. तो देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मान्यवर, तुमचा काय विचार आहे. तुम्हालाही असेच वाटते का? तुम्ही ह्याकरता काय करू शकता?

संकल्पनाः नरेंद्र गोळे २०१११००४