एका दुर्मीळ पण बहुमोल पुस्तकाविषयी थोडेसे ...

सुमारे २० वर्षांपूर्वी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने काढलेल्या स्मरणिकेत श्री मुकुंद सोनपाटकी यांचा ’कुछ याद उन्हे भी कर लो’ या शीर्षकाचा एक अतिशय मौलिक माहिती देणारा लेख वाचला होता. तसेच कोठेतरी त्यांच्या ’दर्यापार’ या पुस्तकाचा उल्लेख वाचला होता. पण ते पुस्तक कोठेही विकत मिळू शकले नाही पण माझे मित्र श्री. गुणे यांचेशी बोलतांना हे पुस्तक त्यांच्याजवळ असल्याचे समजले आणि अनपेक्षितपणे हाती आले. दर्यापार - लेखक - मुकुंद सोनपाटकी, पुरंदरे प्रकाशन, पुणे, सन १९८०. काळाच्या ओघात दुर्मीळ झालेल्या या १२० पानांच्या छोटयाशा पुस्तिकेतील माहिती मात्र खूप मोलाची आहे आणि ती त्यांनी इंग्लंडमधील वास्तव्यात अतिशय परिश्रम घेऊन जमा केली आहे.
९ जून १९०६ ला सावरकरांनी मातृभूमीचा निरोप घेतला. इंग्लंडला प्रयाण केल्यापासून त्यांनी पुढील चार वर्षात इंग्लंडमध्ये राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी जिवाचे अक्षरशः रान केले.
त्यांच्या तेथील कार्याविषयी सोनपाटकींनी केलेल्या संशोधनातून मिळालेल्या माहितीच्या खजिन्याचा महत्वाचा भाग या पुस्तकात समाविष्ट आहे. लेखकाने सर्वत्र साधार विवेचन केलेले आहे. वाचकांनी आवर्जून शोध घ्यावा व हे पुस्तक जरूर वाचावे. अशा या पुस्तकात वाचलेली महत्वाची माहिती येथे अशासाठी देतो आहे की ज्या कोणाकडे हे पुस्तक असेल त्याला त्याचे खरे मोल कळावे आणि त्याने ते काळजीपुर्वक सांभाळावे. ते रद्दीत घालू नये.
(१) इंडिया ऑफिस लायब्ररी- भारताशी संबंधित सर्व कागदपत्रे येथे साठवली आहेत. त्यात दोन फायली Public & Judicial (secrets) या अंतर्गत ७५ वर्षांच्या निर्बंधांखाली ठेवल्या आहेत. त्यातून दरवर्षी ज्या कागदपत्रांना ७५ वर्षे पूर्ण होतात ती अभ्यासकांना उपलब्ध होत जातात. त्यातून त्याकाळी अत्यंत गुप्त ठेवलेल्या व बाहेरच्या जगाला अज्ञात अशा गोष्टी उघडकीस येत आहेत. त्यामुळे ब्रिटिश सरकार सावरकरांच्या लहान वयातील उद्योगांपासून त्यांच्यावर कसे लक्ष ठेऊन होते हे लक्षात येते. ब्रिटिशांचा मुत्सद्दीपणा व दक्ष कारभारही त्यात दिसून येतो. त्यातूनही सावरकरांनी चाणाक्षपणे मार्ग काढून जे प्रचण्ड काम केले ते आश्चर्यचकित करणारे आहे. माहितीचा असाच प्रचंड खजिना ब्रिटीश म्युझियमच्या ग्रंथालयातही पसरला आहे. तेथे संशोधकांना विनामूल्य प्रवेश आहे.
(२)बोटीवर पाऊल ठेवल्यापासून जो जो संपर्कात येईल त्याला त्याला सावरकरांनी मायभूमीच्या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी कसे करून घेतले त्या प्रयत्नांची कहाणी पुराव्यानिशी मांडलेली आढळते.
त्याच काळात नेहरूही शिक्षण घेत होते. इंग्लंडमधील जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सावरकरांच्या प्रभावाखाली कमी अधिक प्रमाणात ब्रिटीश सत्तेला इंग्लंडमध्ये व भारतातही अस्वस्थ केलेले असतांना, ते मात्र या चार वर्षातील स्वातंत्र्यचळवळीपासून १००% दूर राहिले. त्यांनी स्वतंत्रपणेही काही केल्याचेही वाचनात आलेले नाही.
(३)सावरकर बॅरिस्टर झाले तरी त्यांना सनद दिली जाऊ नये यासाठी ब्रिटीश सरकारनेच कॉलेजवर दडपण कसे आणले याचीही सर्व कथा यात आहे.
(४)सावरकरांचे वास्तव्य असलेल्या इंडिया हाऊसवर आतून-बाहेरून गुप्तचरांची सतत असलेली नजर, आणि तरीही सावरकरांनी तेथे केलेल्या अदभुत कार्याची पुराव्यासह माहिती दिली आहे.
(५)सावरकरांच्या प्रभावळीतील मदनलाल धिंग्रा [ याच्याविषयीची माहिती तर हृदय हेलावून टाकणारी आहे. सर्व देशभक्तांनी त्याही परिस्थितीत त्याची बाजू घेतली, त्याचा गौरव केला; पण त्याच्या घरच्यांनी मात्र (नाईलाजाने असेल कदाचित! ) त्याचा जाहीरपणे धिःकार केला. ], श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा वगैरे प्रसिद्ध क्रांतिकारकांबरोबरच, इंडिया हाऊसमधील चतुर्भुज अमीन हा आचारी, हरिश्चंद्र कोरेगावकर, चंजेरी रामराव आणि आणखी आपल्याला माहीत नसलेल्या कितितरी लोकांनी सावरकरांच्या कार्यात घेतलेल्या लहान मोठ्या सहभागाची माहिती दिलेली आहे.
(६)एच एम हिंडमन, डेव्हिड गार्नेट व गाय आल्ड्रेड हे तीन ब्रिटिश नेते क्रांतिकारकांची उघडपणे बाजू घेत. गाय अल्ड्रेड याने तर भारतीय स्वातंत्र्याकरिता १ वर्षाचा तुरुंगवास भोगला. सावरकरांना अटक झाल्यावर त्याने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. सावरकरांनी मांडलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या तत्वज्ञानाचा तो पूर्ण समर्थन करायचा. त्यांच्या कार्याचीही माहिती यात मिळते.
(७) ८ जुलै १९१० या दिवशी सावरकरांनी मार्से बंदरात मोरीया बोटीतून उडी मारून सुटण्याचा जो प्रयत्न केला त्याचा खूप तपशील दिला आहे. तसेच ब्रिटिश भारताला कसे लुटत असत त्याचेही दाखले मधून अधून दिले आहेत.
(८)मुख्य म्हणजे मुळचे त्याकाळातील अनेक दुर्मीळ फोटो या पुस्तकात पहायला मिळतात. उदा. -
सावरकरांना अटक झाल्यानंतरचा खुर्चीत बसलेले असतांनाचा सुटाबुटातील पूर्ण फोटो
गुरुगोविंदसिंह यांचा जन्मोत्सव कॅक्स्टन हॉलमध्ये साजरा केला त्याचा व त्या समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेचा फोटो ( जीवर सावरकरांनी हाताने लिहिलेला कांही मजकूरही आहे)
कॅक्स्टन हॉल, मदनलाल धिंग्रांना फाशी दिले तो पेंटोन्व्हील तुरुंग, सावरकरांना अटकेत ठेवले होते तो ब्रिक्स्टन तुरुंग, इंडिया ऑफिस लायब्ररी, इंडिया हाऊस, मोरीया बोट, बोटीचा नकाशा व त्यावर सावरकरांनी ज्या पोर्टहोलमधून उडी मारली ती जागा आणि आणखीही कांही फोटो त्यात आहेत.
मुकुंद सोनपाटकी यांची त्रोटक माहिती मिळाली ती अशी :- व्यवसाय आर्किटेक्टचा. सावरकर-अभ्यासक. बरीच वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्य. पण नंतर तळेगाव-दाभाडे जवळ वास्तव्य. १० मार्च १९९९ रोजी सात सशस्त्र दरवडेखोरांनी घरावर केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करतांना वयाच्या ५९ व्या वर्षी अकाली मृत्यू. ’तमसा तटाकी’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक त्यांच्या नावावर आढळले.
इंग्लंडमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंबंधित माहितीचा जो प्रचंड खजिना आहे तो शोधण्याचे काम सध्या ब्रिटनमधील श्री. श्रीधर दामले आणि अनुरुपा सिनार करीत आहेत. श्रीधर दामले 'Savarkar in foreign media', 'La affaire Savarkar', 'Indian Sociologist', and 'Gallic American' अशी चार पुस्तके लिहिणार आहेत, तर अनुरुपा सिनार ’Burning Soul' हे पुस्तक सावरकरांवर लिहिणार आहेत.
कुणी कितीही उपेक्षा करो वा गरळ ओको, सूर्याचे तेज असलेले हे व्यक्तिमत्व नव्या पिढीतील तरुणांनाही आज ना उद्या स्तिमित केल्याशिवाय राहाणार नाही.