पिऊनी आसवांना तू कसा जगतोस रे वेड्या?
उन्हाळी मोगर्यासम तू कसा फुलतोस रे वेड्या?
जमूनी दु:ख सार्यांनी, रडावे रीत आहे पण
सभेला पीडितांच्या तू कधी नसतोस रे वेड्या?
मनी हा प्रश्न माझ्या, पाहता क्षितिजावरी तुजला
नसूनी पंख फुटलेले, कसा उडतोस रे वेड्या?
जरी त्यांचे निराळे विश्व आहे, वळचणीला तू
मुलांचे पाहुनी ऐश्वर्य का खुलतोस रे वेड्या?
पहारा पापण्यांचा का असावा आसवावरती?
झरूदे, व्यर्थ का तुजलाच तू छळतोस रे वेड्या?
जशी ती दूर गेली, जीवनाचा तोल गेला अन्
मला पुसती कशाला एवढी पीतोस रे वेड्या?
मशाली पेटल्या ज्यांच्या, तयांना ओढ क्रांतीची
जुनेर्या तू विचारांनी, कसा विझतोस रे वेड्या?
मिळवणे शक्य आहे जे, तयाची आस ठेवावी
गवाक्षातून तारे व्यर्थ का बघतोस रे वेड्या?
मनी का पेलसी "निशिकांत" ओझे लाख प्रश्नांचे?
कशाला उत्तरे शोधीत तू जगतोस रे वेड्या?
निशिकांत देशपांडे मो.क्र.-- ९८९०७ ९९०२३