मना भासते जाता जाता

सांज जाहली खेळ संपला मना भासते जाता जाता
पैलतिराची आस लागली तरी गुंतते जाता जाता

काय कमवले, काय गमवले हिशोब त्याचा व्यर्थ कशाला?
शुन्य राहिले झोळीमध्ये शल्य टोचते जाता जाता

खडतर जीवन असून माझे हसावयाचा सराव केला
हास्य न फुलले, ठरवुन हसले खंत वाटते जाता जाता

उच्चारुन तू तलाक, केली बरबादी का आयुष्याची?
पुढील जन्मी धर्म वेगळा निश्चय करते जाता जाता

पदोपदी अपमान सोसला प्रतारणेचे जीवन जगले
पुन्हा शिळा कर श्रीरामा मी शाप मागते जाता जाता

काय मिळवले मारुन मजला जन्माआधी नराधमा तू?
पाप तुझे रक्ताने भाळी तुझ्या गोंदते जाता जाता

तत्त्व पाळुनी राम भागला पुढील जन्मी कृष्ण जाहला
जन्मोजन्मी अबला मी का? देवा पुसते जाता जाता

स्त्रीमुक्तीच्या बाष्कळ गप्पा ऐकत ऐकत जीवन सरले
एरंडाच्या गुर्‍हाळास मी लाथ मारते जाता जाता

"निशिकांता"ने मला नेहमी दु:ख दिले पण वरून हसले
"पदरी पडले पवित्र झाले" मना पटवते जाता जाता

निशिकांत देशपांडे  मो.क्र.  ९८९०७ ९९०२३