५९. सम

सम म्हणजे प्रत्येक आवर्तनानंतर येणारी शून्यस्थिती.

सम फक्त संगीतातच नाहीये, आपल्या प्रत्येक उच्छ्वासाच्या अंताला, श्वास पुन्हा आत येण्यापूर्वी सम आहे आणि प्रत्येक श्वासानंतर होणाऱ्या उच्छ्वासापूर्वी सुद्धा सम आहे.

प्रत्येक संवाद सुरू होण्यापूर्वी सम आहे आणि संवादाच्या अंताला सम आहे.

प्रत्येक कृत्यापूर्वी तुम्ही अकर्त्याला (किंवा स्वत:ला) भेटू शकता आणि कृत्य घडत असताना जरी त्याचं विस्मरण झालं तरी कृत्याच्या अंतापाशी तो उभा आहेच.

या अस्तित्वातल्या प्रत्येक अभिव्यक्तीच्या सुरुवातीला आणि अंताला सम आहे मग ती ऋतुचक्र असोत की साऱ्या अस्वास्थ्याचं कारण असलेली विचारचक्र असोत, समेशिवाय अभिव्यक्ती असंभव आहे.

ही सम स्वास्थ्य आहे आणि आपणच ती सम आहोत हे समजणं अध्यात्म आहे.

_________________________________________

खरं तर सम ही अभिव्यक्तीपेक्षाही उघड गोष्ट आहे कारण अभिव्यक्तीला तरी सुरुवात आणि शेवट आहे पण सम सुरुवातीपासून शेवटापर्यंत आणि शेवटानंतर पुन्हा सुरुवात होईपर्यंत उपस्थित आहे तरी ती गवसणं दुर्लभ झालंय.

एखाद्या बुद्धाला ती गवसते आणि त्याच्या चेहऱ्यावरल्या शांततेतून ती प्रकट होते, त्याच्या प्रत्येक वाक्यात, साध्या चालण्याबोलण्यात ती दिसते, त्याचं सारं आयुष्यच लयबद्ध भासतं आणि इतर कुणाला अख्खं आयुष्य जगून देखील ती सापडत नाही, गाण्यात एक वेळ गवसेल पण जीवनात गवसत नाही. काय असेल कारण याचं?

कारण मोठं मजेदार आहे, ज्या मानवाला समेचं रहस्य कळण्याचं वरदान आहे त्याला संगोपनाचा शाप आहे. संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडून ते प्रस्थापित केल्याशिवाय त्याला समाजात जगणं अशक्य आहे आणि एकदा व्यक्तिमत्त्व घडलं की सम सापडणं जवळजवळ असंभव आहे, असा तो पेच आहे.

____________________________

गौतम बुद्धाच्या साऱ्या आकलनाचं सारसूत्र धम्मपद नाही, त्यानं समेवर येण्यासाठी सांगितलेली साधना, विपश्यना आहे.

माझे एक आजोबा अत्यंत प्रतिभा संपन्न आणि कमालीचे वैभवशाली आर्किटेक्ट होते,  आयुष्यभर ते विपश्यनेचा पाठपुरावा करत होते. त्यांचा  दबदबा इतका होता की त्यांची सगळी फॅमिली विपश्यना करायची आणि (आता ते नाहीत तरी) अजूनही करते.

मला आश्चर्य वाटायचं, पुन्हापुन्हा विपश्यना सेशन्स, साधनेच्या एकापेक्षाएक वरचढ लेवल्स, इतके महीने, तितके महीने, अमका आहार, तमका आहार, शारीरिक क्लेश, धम्मपदाच्या क्लिष्ट सूत्रांचे अगम्य अर्थ.

श्वासासारख्या साध्या, सोप्या, घरी-दारी सर्वत्र आणि सतत चालू असणाऱ्या साध्या प्रक्रियेतून होणाऱ्या समेच्या उलगड्यासाठी इतका सायास आणि इतका प्रदीर्घ कालावधी? आणि इतकी तैलबुद्धी आणि वैभवातून आलेलं कमालीचं स्वास्थ्य उपलब्ध असताना आजोबांना सम गवसू नाही?

आज मला कळतंय की जोपर्यंत आपण जाणीवेचा रोख मनाकडून श्वासाकडे वळवू शकत नाही, किंवा इतकंच करायचंय हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आयुष्यभर जरी साधना केली तरी सम गवसत नाही.

__________________________________

मनाच्या किंवा विचारांच्या आवर्तनाची सम आपलं सतत लक्ष वेधून घेतेय आणि त्यामुळे श्वासाच्या समेचा उलगडा होत नाही.

काय आहे ही विचारांच्या आवर्तनाची सम? का ती आपलं लक्ष सतत वेधून घेतेय?  विचारांच्या आवर्तनाची सम, त्या गाण्याचं ध्रुपद एकच आहे आणि ते मोठं गमतीशीर आहे. प्रत्येक विचाराचं आवर्तन समेवर येताना तुम्हाला एकच गोष्ट सांगतंय, ‘तुम्ही मूर्ख आहात! ’ ‘यू आर ऍन इडियट! ’

आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हणा तुम्हाला ते मंजूर आहे! जर तुम्हाला ते मंजूर नसतं तर विचार तुमचं लक्षच वेधू शकले नसते, एका क्षणात तुम्हाला श्वासाची जाणीव झाली असती आणि पुढल्या क्षणी समेचा उलगडा झाला असता.

_______________________________

माणसाचा सर्व प्रयत्न आपण कुणी तरी आहोत हे दाखवण्याचा आहे आणि मजा म्हणजे तो प्रयत्न फक्त मनाला, ‘मी मूर्ख नाही’ हे पटवण्याचा आहे.

सर्व मानवी अस्वास्थ्याचं कारण ही मनाशी चाललेली झकापकी आहे आणि तुम्ही कुणीही दिग्गज असा, तुमचं कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही प्रेसिडेंट असा की सीईओ, साऱ्या जगानं तुम्हाला मानलं, तुम्हाला ग्रॅमी काय नोबेल अवॉर्ड जरी मिळालं तरी जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला पटवू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनाची सम सापडणं शक्य नाही आणि वरून कुणी काहीही दाखवो, आतल्या पराभवानं येणारं अस्वास्थ्य काही केल्या दूर होत नाही.

मनाला पटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, आपण सत्य आहोत, वरकरणी कितीही अपयशी आणि सामान्य असलो, आपल्याला दुसऱ्यानं मानलं किंवा नाही मानलं तरी आपल्या सत्य असण्यात कणभरही फरक पडत नाही हा नुसता उलगडा व्हायचा अवकाश की आपला श्वास लयबद्ध होतो, विचारांनी आपलं सतत वेधून घेतलेलं लक्ष्य मोकळं होतं, आपण स्वच्छंद आणि मुक्त होतो.

______________________________

विचारांचं प्रत्येक आवर्तन आपल्या न्यूनत्वाकडे निर्देश करतं कारण आपलं संगोपन आपल्याला व्यक्ती बनवतं, आपल्या स्वरूपाचं, आपल्या निराकार सत्यत्वाचं, आपल्याला विस्मरण घडवतं. या अर्थानं प्रत्येक मानवाला संगोपनाचा शाप आहे कारण त्याची व्यक्ती म्हणून घडण अपरिहार्य आहे.

पण एकदा आपण व्यक्ती आहोत ही धारणा सघन झाली की तिचं सातत्य राखण्याची जबाबदारी आपल्यावर येते. हे व्यक्तिमत्त्व सामान्य असलेलं कुणालाच मंजूर होत नाही मग प्रत्येकाची असामान्य होण्याची धडपड सुरू होते. हे असामान्यत्व समाजानं मंजूर केल्याशिवाय सिद्ध होत नाही आणि लाखात एखादाच असामान्य होऊ शकतो.

तो असामान्य झाला की इतरांसाठी पुन्हा नवा काँप्लेक्स तयार करतो पण त्याहीपेक्षा खुद्द स्वत:साठी तो अत्यंत शोचनीय परिस्थिती निर्माण करतो कारण ज्या प्रमाणात आपण असामान्य आहोत असं त्याला वाटतं त्याच प्रमाणात त्याचं आपण निराकार आहोत याचं विस्मरण सघन झालेलं असतं.

_______________________________

ओशो कम्युनमधे साधकाला (त्याची इच्छा असेल तर) संन्यास देण्याचा रम्य सोहळा असतो. कम्युनला गेल्यावर मी एकदा तो बघितला आणि वैकल्पिक आणि विनामूल्य असल्यानं त्याचा फॉर्म भरला.
‘डू यू वाँट टू चेंज योर नेम? ’
‘नो’
‘डू यू वाँट ओशोज माला विथ हिज फोटो?
‘नो’ (कारण त्यासाठी वेगळा चार्ज होता! )

असला फॉर्म पाहिल्यावर तिथल्या सीनिअरनं मला आत बोलावलं, ती म्हणाली ‘आय कॅन अंडरस्टँड अबाउट माला बट इफ यू डोंट वाँट टू चेंज इव्हन योर नेम व्हाय डू यू वाँट संन्यास? ’
‘व्हाय शूड आय चेंज माय नेम? ’ मी
‘बिकॉज ओशो सेज यू आर बॅडली ऍटॅच्ड टू योर नेम’ सीनिअर
‘लेट इट बी, आय वुड स्टील गीव इट अ ट्राय’ मी
तिला काय वाटलं माहिती नाही पण तिनं माझा फॉर्म ओके केला.

नंतर मला माझ्या नांवाचा उलगडा झाला, मी नांव बदललं नाही ते किती योग्य केलं ते कळलं, संजय म्हणजे ज्यानं समत्वात राहून जय मिळवला, सत्य शोधलं असा. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समत्व आहात, या समत्वाच्या बोधातून तुम्ही स्वत:प्रत या, तुम्हाला मनाशी हुज्जत घालण्याची, कुणाला काहीही पटवून देण्याची अजिबात आवश्यकता नाही.

_______________________________

तुम्ही कुणीही असा, सामान्य की असामान्य, तुम्ही सम आहात, प्रत्येक अभिव्यक्ती पूर्वी आणि तिच्या अंताला तुम्हीच आहात हा नुसता बोध तुम्हाला शांत करेल. मनाचं, विचारांचं तुमच्या जीवनावर अहर्निश चाललेलं साम्राज्य एका क्षणात शून्य होईल. मनाला काहीही पटवण्याची गरज तुम्हाला उरणार नाही, तुमचा श्वास मोकळा होईल, तुमचं बोलणं, तुमचा विहार, प्रत्येक अभिव्यक्ती, तुमचं सारं जीवन लयबद्ध होईल.

संजय

 मेल : दुवा क्र. १