हसरी हजामत

               सध्या अमेरिका जगातील कोणत्याही राष्ट्राची हजामत करण्याचा आपल्याला हक्कच आहे अशा समजुतीत आहे. चीन इराणसारखी राष्ट्रे त्यांना भीक घालत नाहीत ही गोष्ट वेगळी. पण अमेरिकेच्या हजामतीला तोंड कसे द्यायचे या चिंतेत असलेल्या राष्ट्राच्या माझ्यासारख्या नागरिकास मात्र चिंता वेगळीच असते ती म्हणजे अमेरिकेत गेल्यावर आपली हजामत कशी व्हायची? खरे तर  ए पी जी सारख्या भरघोस केस राखून हसत हसत तो केशसंभार संभाळणाया आदरणीय राष्ट्रपुरुषाचा आदर्श मी समोर ठेवायला हरकत नाही पण डोक्यावर निम्मेच केस उरल्यावर ह्या प्रश्नाचे स्वरूप बदलते. परवाच सलूनमधून बाहेर पडल्यावर माझे एक मित्र समोर आले व माझ्याकडे पाहून "काय कटिंग केले वाटते? " असा प्रश्न विचारते झाले . यावर मी "हो आहेत थोडेफार केस त्यामुळे जावे लागते कधी कधी " असे म्हटल्यावर ते म्हणाले " खरे आहे. खरे तर आपली  कटिंग निम्म्या दरातच करायला हवी ""हो बरोबर "असे मी उत्तर दिल्यावर ते पुढे म्हणाले "अहो कसचे काय मी माझ्या कारागिराला तसे म्हणाल्यावर तो्च उलटा म्हणाला काका तुम्हाला दुप्पट आकार घ्यायला हवा"मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, " बराच दिसतोय की. अस का म्हणाला? "त्यावर ते मित्र म्हणाले "अहो तो म्हणाला  काका तुमची कटिंग करायला आम्हाला केस शोधून शोधून कापावे लागतात "  यातील विनोदाचा भाग सोडला तरी अमेरिकेत कटिंग करण्यातील अडचणी आणखीनच वेगळ्या असतात हे खरेच!

      अमेरिकेत हजामत करून घेण्यातील मला येणारी पहिली अडचण खरे पाहता क्षुल्लक आहे ती म्हणजे तेथील हजामतीचा दर आपल्याकडील तुलनेत फारच आहे अर्थात आता आपल्याकडेही काही  पार्लर्सनी त्यांच्या तोडीस तोड भाव वाढवण्यास सुरवात केली असली तरी माझी मजल तेथपर्यंत जात नसते उलट आमच्या घराच्या बाहेर पडले की प्रथम दिसणाऱ्या कटिंग सलूनला  मी आश्रय देतो, ते  सलून घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. सध्या मी कमीतकमी अंतर चालायला लागावे याविषयी फारच दक्ष आहे कारण मायबाप सरकारने कितीही निर्बंध जनहितार्थ जारी केले तरी वाहनचालक आपल्या मर्जीनुसार कोणत्याही दिशेने व पद्धतीने वाहने चालवत असल्यामुळे त्या वाहनचालकांच्या तडाक्यातून वाचणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. त्यामुळे पाच मिनिटाच्या अंतरावरील सलूनच्याही अगोदर दिसणाऱ्या एका झाडाखाली बसलेल्या कारागिराला आश्रय द्यावा की काय असाही विचार कधीकधी माझ्या मनात डोकावतो पण त्यानंतर घरात होऊ शकणाऱ्या हजामतीचा विचार करून तो मोह मी टाळतो. त्या कारागिराच्याच काय पण कोणत्याही महागात महाग (कदाचित माझी कल्पनाशक्तीची कुवतच तेवढी! ) सलूनचाही विचार केला तरी अमेरिकेतला कटिंगचा दर रुपयात रूपांतरित केल्यावर यापुढील भारतातील त्यातही पुण्यातीलसुद्धा सलूनमध्ये माझी  जन्मभराची हजामत तेवढ्या पैशात होऊ शकेल हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

      पण कटिंगसाठी डॉलर्स मुलगाच देणार असल्याने हा प्रश्न त्याला गंभीर वाटत नाही पण दुसरा एक गंभीर प्रश्न मात्र उरतोच तो म्हणजे येथे जसे मनात आले की कटिंगला बाहेर पडता येते तसे तेथे थोडेच जमणार आहे? तेथे थोडेच हाकेच्या अंतरावर सलून आहे आणि सलूनपयंत जायला वाहन कोण चालवणार? थोडक्यात लहानपणी मुलांना गाडीवर घेऊन कटिंग करायला मी जात असे त्या ऐवजी त्याच मुलांना आता मला गाडीत  घालून कटिंगसाठी घेऊन जावे लागते आणि त्यासाठी त्यांच्या कार्यमग्नतेतून त्यांना वेळ मिळायला हवा. त्यांना जो काही वेळ मिळणार तो आठवड्याच्या साचलेल्या कामासाठी वापरावा लागणार. त्याची कटिंग तर तो ऑफिसला जाताना किंवा येतानाच उरकून येतो त्यामुळे आमच्या दोघांच्या वेळा जुळणे कठीणच.

       अर्थात हा प्रश्न कधीतरीच उपस्थित होत असतो आणि यावेळी माझ्या मुलाने अनेक गोष्टींची सांगड घालत माझी, त्याची व आमच्या नातवाचीही कटिंग करणे आणि मॉलमधील खरेदी या दोन्हींतिन्ही  कर्तव्यांचा एकत्र मेळ घातला म्हणजे यावेळी आम्ही कटिंगसाठी सहकुटुंब गेलो. माझ्या जावळानंतर माझ्या कटिंगसाठी सर्व कुटुंब उपस्थित असण्याचा हा पहिलाच योग. त्यात वेळेच्या नियोजनामुळे मॉलमधील खरेदी आमची सौ. व सूनबाई यांनी नातवास बरोबर घेऊन करावी तोपर्यंत मी व आमचे चिरंजीव यांनी कटिंग करावी, खरेदी आटोपून त्या दोघींनी नातवास घेऊन तेथे यावे व त्यानंतर त्याची कटिंग करून आम्ही सहकुटुंब घरी परतावे असा एकूण बेत होता.

          ठरलेल्या बेतानुसार खरेदीपथकास मॉलमध्ये सोडून  आम्ही दोघे सलूनमध्ये शिरलो. सलून म्हणजे एक प्रशस्त हॉलच असतो व अनेक आरामशीर खुर्च्या व त्याहूनही आकर्षक मुली हातात कात्र्या घेऊन आपल्यावर हल्ला करण्यासाठी वाट पाहत असतात. त्यांच्यातील प्रमुख तरुणी आपल्या रजिस्टरमध्ये  आपल्या येण्याची नोंद घेऊन योग्य त्या खुर्चीकडे आपली रवानगी करते. नेहमीची गिऱ्हाईके आपल्या विशिष्ट कारागीर स्त्रीकडेच जाण्याचा आग्रह धरतात. भारतात सुद्धा आमचे काही मित्र ठराविकच सलूनमध्ये ठराविकच कारागिराचा आग्रह धरणारे आहेतच. माझ्या बाबतीत भारतातही असा काही प्रकार उद्भवत नाही तर अमेरिकेत तर तो प्रश्नच नाही शिवाय अमेरिकेच्या प्रत्येक भेटीत जास्तीतजास्त दोनच वेळा आणि तोही वेगवेगळ्या सलूनमध्ये कटिंग करणाऱ्यास एका विशिष्ट स्त्रीवरच (त्यातही आणखी एका स्त्रीची कडक नजर आपल्यावर आहे ही जाणीव असताना) लोभ जडण्याची शक्यता आता कुठली? त्यामुळे आम्हाला त्या प्रमुख स्त्रीच्याच दिग्दर्शनाखाली आपली कारागीर निवडावी लागली. विशिष्ट कारागिराचा आग्रह धरणे अगदीच चूक नव्हते हे आमच्या लवकरच लक्षात येणार होते.                       

            त्यावेळी सर्वच कारागिरिणी व्यग्र असल्याने उपलब्ध असलेल्या एकाच कारागीर तरुणीकडे प्रथम मुलाची रवानगी झाली. मी माझा वेळ तेथे पडलेल्या फेमिनासारख्या  मासिका साप्ताहिकातील छायाचित्रे पाहण्यात घालवत बसलो थोड्याच वेळात मुलाचे कटिंग आटोपले आणि  त्याच कारागीर तरुणीकडे  जाण्यासाठी मला त्या प्रमुख स्त्रीने पाचारले. मुलाकडे पाहिल्यावर त्याच्या अगदीच बारीक कापलेल्या केसांकडे माझे लक्ष गेले व त्याच्या उजव्या बाजूच्या कानाजवळ बराच मोठा चट्टा उमटल्यासारखे जाणवले व जरा बारीक निरीक्षण केल्यावर तो त्या केशकर्तन कलावतीचाच प्रसाद असल्याचे जाणवले पण माझा मुलगाही माझ्यासारखाच सहनशील ( लग्नानंतर हा गुण प्रामुख्याने अंगी बाणवणे आवश्यक असते) असल्यामुळे ही बाब त्याने नजरेआड केली असावी म्हणून मीही त्यावर बोलण्याचे टाळले.

         तेवढ्यात आमचे खरेदीपथक आपले काम आटोपून सलूनमध्ये प्रवेश करते झाले आणि मी चहा पिताना चुकून माझ्या हातातील कपातून एकादा चहाचा थेंब शर्टावर पडला असला तर "दाग अच्छे होते है"जाहिरातीतील मुलगाच मी आहे अश्या मुद्रेने माझ्याकडे पाहणाऱ्या सौ. ला लगेच आपल्या मुलाच्या सौंदर्याचा इतका अधिक्षेप झालेला  पाहावयाला कसे आवडणार? तिने लगेचच आपल्या तीक्ष्ण स्वरात "हे काय  उजव्या बाजूला असे (केसांच भूत करून घेतलेले)काय दिसतेय? "असा प्रश्न विचारला पुढील वादळात माझा समावेश होण्याची शक्यता  व तेवढा उत्साह मला नसल्यामुळे मी माझ्या खुर्चीचा व तेथील त्याच कलावतीने माझ्या डोक्याचा ताबा घेतला.

         माझी कटिंग तशी फारच सोपी असल्याने व त्याचबरोबर त्या कलावतीकडे बऱ्याच केशकर्तनयंत्रांचा साठा असल्याने पण त्यांचा उपयोग कसा करावा याचे यथातथ्य ज्ञान तिला   तर त्याहूनही मला नसल्याने तिने दहा पंधरा मिनिटातच मला मोकळे केले तोपर्यंत आमची सूनबाईही तेथे आल्यामुळे माझा मुलगा आता दुहेरी संकटात सापडला होता. त्याच्या उजव्या बाजूचा कानच (विन्सेंट वॅन वॉगसारखा? ) कोणीतरी कापला असावा इतका गहन प्रसंग कोसळल्याचा भास त्या दोघींना झाल्यासारखे दिसले व तसाच वाद सुरू झाला होता  तो सोडवण्याची जबाबदारी त्या प्रमुख स्त्रीवर पडली होती.. माझ्या मुलावर अतिशय गंभीर प्रसंग कोसळला आहे हे तिने मान्य केले अर्थात ही तिची समजूत त्याच्या कानाजवळील केसांच्या चट्ट्यामुळे असण्यापेक्षा त्यामुळे  त्याच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या  ज्या दोन स्त्रियांच्या तावडीत तो सापडलेला होता त्याच व्यक्तींच्या तावडीत तीही सापडल्यामुळे झाली असावी अशी माझी धारणा आहे. या पेचप्रसंगावर तोड काढण्यासाठी आमच्या दोघांचे कटिंग करणाऱ्या कारागीर स्त्रीला तिने बोलावले व माझ्या मुलाच्या देखणेपणास केशकर्तनातील तिच्या निष्काळजीपणामुळे लागलेला बट्टा दुरुस्त करण्याचा आदेश तिने दिला.

       माझा मुलगा त्या खुर्चीवर पुन्हा एकदा स्थानापन्न झाला. ती कारागीर नवशिकी असावी त्यामुळे तिने थोडीफार खटपट करून शेवटी त्या सलूनमधील सर्वात कुशल समजल्या जाणाऱ्या कारागीर स्त्रीला   आवाहन केले. अर्थात माझ्या मुलाची उचलबांगडी तिच्या खुर्चीवर झाली. त्या कुशल कारागीर स्त्रीनेही आपल्यापरीने बरीच खटपट केली तरी ज्या दोन स्त्रियांनी हा प्रश्न मूळ उपस्थित केला होता त्या दोघींचे समाधान करणे तिला काही शक्य झाले नाही खरे तर बिरबलाच्या गोष्टीतील कांड्या केलेला ऊस पुन्हा पहिल्यासारखा करून देण्याच्या आग्रहासारखाच हा प्रकार होता शेवटी त्या प्रमुख स्त्रीने त्यावर तोडगा काढला की आता केसांची झालेली अवस्था बदलणे शक्य नाही त्यामुळे यावेळी त्या कटिंगचे पैसे घेण्यात येणार नाही इतकेच नव्हे तर थोडे केस वाढल्यावर मुलाने पुन्हा त्याच सलूनमध्ये यावे व त्याची कटिंग अगदी मनासारखी व तीही मोफत करून देण्यात येईल त्यामुळे कटिंगमुळे थोडाफार देखणेपणा कमी झाला तरी त्यावरील निकालामुळे माझ्या मुलाचा, निदान एका कटिंगचे तरी पैसे वाचले या आनंदात माझा, कशी जिरवली सलूनची या आनंदात या नाटकातील दोन प्रमुख स्त्रियांचा व या नाटकात मुळीच सहभागी नसला तरी बाकी सगळे खूश आहेत हे पाहून नातवाचा असे सर्वांचे उजळलेले हसरे चेहरे घेऊनच आम्ही घरी परतलो.