एकर...

इथं पेग पेग विस्की रिचवत
विस्कटलेलो असताना,
आणि घराच्या हप्त्यांच्या
कोंदटलेल्या धुरात
घुसमटलेलो असताना…
आबा, तुझी आठवण येते.

भेंडीखालच्या गुत्त्यावर
पावशेर झोकून,
पारापाशी पडून राहायचास तू
निपचीत…  सूद हरपून…

आणि तुझ्या ठिगळं लावलेल्या संसाराचे
सारेच्या सारे अडाणी प्रश्न,
निदान तेवढ्यापुरते तरी
तू विसरून जायचास साफ.
तुझ्या भाबड्या मेंदूभोवती
सदांकदा घोंगावणाऱ्या
त्या सावकाराच्या तगाद्याला,
आणि तुझ्या घामेजलेल्या
चेहऱ्याभोवती घोंगावणाऱ्या
त्या नादान माशांनादेखील
तू करून टाकायचास माफ…

इथं बाटलीभर विस्की ढोसूनही
सहा सहा अंकी आकड्यांचे
हे वळवळणारे भयाण सर्प..
मला हैराण करतात लचके तोडून…
आणि अगदी पूर्ण उतरल्यावरही
सारे उभे राहतात पुन्हा फणा काढून,
नोकरदार कणा हा माझा
गेलाय डाऊनपेमेंटनंच मोडून…

तू मात्र शांत निजायचास,
त्या कुडापाचटाच्या शेणामातीनं
लिंपून घेतलेल्या चार भिंतीत.
इथं जीव गुदमरून जातो माझा,
या बीएचके च्या हिशेबांत,
आणि एमेनिटीज च्या गिनतीत…

निम्माअर्धा जन्म चाललाय
फक्त व्याजच फेडताना…
गहाण पडल्या चतकोर जमिनीच्या
कर्जाची जू होती तुझ्याही खांद्यावर
तरी राहिलास ताठच्या ताठ
तुझा संसारगाडा ओढताना.

~
अशाच एखाद्या अस्वस्थ रात्री
जेव्हा मांडत बसतो असाच
हिशेब तुझ्या माझ्या जिण्याचे…
तेव्हा ओल्या ताज्या घावागत
एक जाणीव ठसठसते,
माझ्या या हजार स्केअर फुटांत,
खरं सांग आबा,
तुझे कितीतरी एकर मावले असते…