आत्मदीप्त

तुझी वाट पाहताना चंद्र जसा थांबलेला ।
एका युगासारखा तो क्षण असा लांबलेला ।

गूढगर्भ स्तब्धतेत शब्द सर्व निजलेले ।
सर्दघन्या निळाईत स्वप्न एक थिजलेले ।

आत्ममग्न जाणिवांना छेडले कुणीच ना ।
तरी काही भावनांनी वेढले वेड्या मना ।

अस्तित्व हे आतुरला मोर जणू जाहलेले ।
पंख पंख डोळे किती वाटेवर लागलेले ।

उंबऱ्याशी क्षितिजाच्या अवघडली रात्रही ।
येता तुझी अनाहत चाहुल क्षणमात्र ही ।

तुझी साद ऐकताना मीपण ही लोपलेले ।
अस्वस्थल्या अहंतेचे तेव्हा मन कोपलेले ।

रुप तुझे प्रकाशाचे जाणिवेतून जाणता ।
आत्मदिप्त विसरलो मी रंग माझा कोणता ।