जागृती नको

स्वप्नील नीजही नको, अन्‌ जागृती नको

रात्रीसवे सरेल ती भानामती नको

 
निष्फळ नकोस पाजळू तू शब्ददीपिका

पाषाणरूप देविची कवितारती नको

 
याहून एकटेपणा सोसेन लाखदा

जेथील माणसे निबर ऐसी क्षिती नको

 
ऐन्या, कधी तरी तुझे सोडून सत्य-व्रत

रेखाट चित्र काल्पनिक; वस्तुस्थिती नको

 
फुटते कधी तरूस का शिशिरात पालवी?

फुलता तनुवरी जरा ही विकृती नको 

 
केले हसून मोकळे वचनातुनी तिला

आहे तहान प्रीतिची, मज आहुती नको

 
राखेवरी चढे कधी का मांस मूठभर?

मरणोपरांत मान्यतेची पावती नको