६३. गुरू

आध्यात्मिक प्रवासात गुरुची आवश्यकता आहे की नाही याविषयीचा हा लेख तुमच्या समोर ठेवताना मला अतिशय आनंद होतोय.

_________________________________

लौकिक म्हणजे जे आपण रोज जगतो ते, अवतीभवतीच्या जनजीवनासमेत असलेलं, ज्यात यशापयशाचे संपत्ती आणि कीर्ती असे मापदंड आहेत ते जग आणि पारलौकिक म्हणजे ज्यावर सर्व जनजीवन प्रकट झालंय, ज्या निराकार अवकाशात सर्व लौकिक जग वावरतंय ते जग.

मानवाला लौकिक जगात जगण्यासाठी कौशल्य आत्मसात करावी लागतात कारण त्यावर त्याची उपजीविका चालते. सजीवात फक्त मानवालाच व्यक्तीगत कौशल्य अवगत करावी लागतात, इतर जीवसृष्टी जन्मजातच उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेनं जगते.

आवश्यक कौशल्य मिळवण्यासाठी जर गुरू असेल तर शिकणाऱ्याला, जे पूर्वीच शोधलं गेलंय त्यावर संशोधन करावं लागत नाही आणि अनेक प्रयत्न होऊन सोप्या झालेल्या प्रक्रियेनं ज्ञान मिळवता येतं; यामुळे त्याच्या वेळेची आणि श्रमाची बचत होते आणि सततच्या चुकांमुळे त्यानं प्रयत्न सोडून देण्याची शक्यता न्यून होते.  

शिवाय एकदा कौशल्य आत्मसात झाल्यावर व्यक्ती त्यावर स्वत:चे प्रयोग करून पुन्हा प्रक्रियेत सहजता आणू शकते आणि कौशल्याच्या फलिताचे निर्णायक निकष असल्यानं आपली प्रगती जोखू शकते. कामातली सहजता, त्यातून त्याला मिळणारा आनंद आणि फलिताची गुणवत्ता या परिमाणांवर कुणीही व्यक्ती दिवसेंदिवस निष्णात होऊ शकते.

थोडक्यात लौकिक जगात गुरुमुळे कोणतंही कौशल्य आत्मसात करणं सोपं होतं. आध्यात्मिक जगात मात्र गुरू हा दुहेरी पेच आहे.

__________________________

पारलौकिक जगात व्यक्तीचा प्रयत्न निराकाराला म्हणजे ज्यात लौकिक जग प्रकट झालंय आणि वावरतंय त्या अवकाशाला जाणण्याचा आहे आणि मजा म्हणजे तो स्वत:ला व्यक्ती समजत असला तरी मुळात तो ते अवकाशच आहे.

वन इज ट्राइंग टू फाइंड समथिंग वीच ही ऑलरेडी इज!

याचा आणखी एक पैलू आहे, निराकार किंवा अवकाश हे कौशल्य नाही, ती स्थिती आहे. कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न आणि वेळ लागेल पण स्थितीचं आकलन आता, या क्षणी होऊ शकेल.

आता अध्यात्मात साधनेला पूर्वापार महत्त्व आहे त्यामुळे खुद्द गुरू साधकाला आकलनापेक्षा वेगवेगळ्या (किंवा संप्रदायानं प्रमाण मानलेल्या) साधना देण्याच्या प्रयत्नात असतो कारण साधनेची फलश्रुती स्वरूप गवसण्यात होईल असा बहुतेक गुरुंचा समज असतो. साधनाकाल आणि साधनेतली प्रगती यावरच गुरुचं श्रेष्ठत्व ठरलेलं असतं कारण अशीच घनघोर साधना त्याच्या गुरुनं आणि त्याच्या गुरुच्या गुरुनं केलेली असते.

यात पुन्हा साधनेतून प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि चमत्कार यांची वेगळीच भानगड असते आणि त्या गोष्टींचा जनमानसावर जबरदस्त पगडा आहे त्यामुळे आपण निराकार आहोत हा बोध होण्याऐवजी कुंडलिनी जागृत झाली का? कांती स्वर्णमयी झाली का? चेहऱ्यावर तेज कसं दिसत नाही? अमका शरीरगंध प्रकट व्हायचाय, सर्वज्ञता आली नाही इथपासून पाण्यावर चालता यायला हवं किंवा नजरेनं वस्तू हालवता यायला हव्यात इथपर्यंत गोंधळ आहेत.

थोडक्यात खुद्द गुरुला स्वरूप गवसलंय की नाही हे शिष्यच ठरवत असतो आणि त्याचं प्रमाण शिष्याला स्वत:ला नेमकं काय हवंय यानं ठरतं. बहुतेक शिष्यवृंद आध्यात्मिक साधनेला लागल्या लागल्या त्याला दोन स्पष्ट फायदे होतात, एक, त्याचं सोशल नेटवर्किंग वाढतं आणि दोन; नवागत, मुरलेले, अत्यंत मुरलेले, जवळजवळ पोहोचलेले अशा साधकांच्या प्रतवाऱ्या त्याला कळल्यामुळे आध्यात्मिक प्रगती हा कालबद्ध कार्यक्रम आहे अशी त्याची ठाम समजूत होते.
________________________

जवळजवळ सर्व आध्यात्मिक केंद्रात शिष्याचा तिथे वारंवार येण्यात रस राहावा म्हणून त्याला वक्तृत्वाची संधी आणि त्याची संघटनात्मक कौशल्य वाढतील अशी कामं दिली जातात. बहुतेक सर्व आध्यात्मिक केंद्रे त्यांचा सामाजिक संपर्क जोपासला जावा आणि देणग्या वगैरेच्या स्वरूपात मिळालेल्या मदतीचा काही भाग तरी समाजाकडे वळवावा या हेतूनं अनिवार्यपणे सामाजिक प्रकल्प राबवत असतात. अशा सामाजिक कार्याचा काही भाग अपरिहार्यतेनं नवागतांकडे येतो आणि त्यांना आपण अध्यात्माबरोबर समाजसेवाही करतोय ही भावना सुखावते.  

गुरुची मात्र दुहेरी कसरत असते एकतर त्याला त्याच्या गुरुच्याच मार्गावर चालावं लागतं कारण शिष्यगणाची एकसंधता आणि त्यांचा पारस्परिक आदर केवळ ते सगळे एकाच व्यक्तीला थोर मानतात म्हणून टिकून असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ गुरुच्या औदार्यामुळेच तो स्वत: उत्तराधिकारी झालेला असतो आणि त्याला स्वत:च स्थान अबाधित राखायला गुरुस्तुती शिवाय दुसरा पर्यायच नसतो.

अशा पद्धतीनं सध्या अस्तित्वात नसलेल्या गुरुनं त्याला त्याच्या गुरुनं दाखवलेल्या मार्गावर, त्यांच्या संप्रदायानं प्रमाण मानलेली  आध्यात्मिक प्रणाली नामशेष होऊ नये म्हणून ; सांप्रत गुरू आणि त्याचे विविध स्तरावर प्रगत झालेले शिष्य ‘सत्य म्हणजे काय? ’ या आपापल्या कल्पनेचा पाठपुरावा करत असतात.
____________________________

श्री निसर्गदत्त महाराज सत्य गवसल्याचा, कुणाही साधकाला केंव्हाही उपयोगी होईल असा साधा निकष सांगतात:

"निश्चिंतता, आनंदाची जाणीव, आणि उत्साह" (सुखसंवाद : ८९)

तुम्ही साधना काय करताय, गुरू पोहोचलाय की नाही, संप्रदाय किती पुरातन किंवा केवढा मोठाय यापेक्षा तुमच्या व्यक्तीगत जीवनात तुम्हाला निश्चिंतता, आनंदाची जाणीव, आणि उत्साह वाटतो की नाही यावरनं तुम्हाला सत्य गवसलं की नाही हे ठरवणं सर्वात श्रेयस्कर आहे.
_________________________________

असा प्रयत्न मग कुणाला गुरू मानून करा, स्वत:ला त्या परिमाणांप्रत नेणाऱ्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही साधनेतून करा किंवा आध्यात्मिक वाचनातून तुम्हाला उलगडा होत असेल तर त्या मार्गानं जा पण काय साधायचंय त्याची मनाशी खूणगाठ असू द्या म्हणजे तुमचा मार्ग चुकणार नाही आणि तुम्हाला निराशा येणार नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या निवडीची आणि प्रयासाची सर्व जबाबदारी तुमची राहील आणि प्रयत्नांची फलश्रुती जाणण्याचा निकष तुमचं स्वत:चं आयुष्य असेल; तुम्ही गुरुला दोषी धरणार नाही.

जर गुरुचा तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत पोहोचायला उपयोग झाला तर  गुरुविषयी तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल पण सर्व प्रार्थमिक आणि अंतिम निर्णय तुमचेच होते हे तुम्हाला सत्याचा उलगडा होता क्षणी लक्षात येईल.

काय असेल कारण याच? तर गुरू-शिष्य हे तुम्ही मंजूर केलेलं नातं होतं, गुरू तुम्हाला एकच गोष्ट समजावत होता: 'तुम्ही निराकार आहात' आणि त्यामुळे ते नातं, तो गुरू, आपल्याला पोहोचायचं आहे ही तुमची मानसिकता हे सर्वस्वी तुम्ही निर्माण केलेले प्रश्न होते.

कुणाला गुरू मानणं, कोणतीही साधना करणं आणि स्वत:ला व्यक्ती समजणं यानं तुमच्या जीवनात अस्वस्थता होती.

निश्चिंतता नव्हती कारण आपण स्वतःला कालबद्ध समजत होतो, आनंदाची जाणीव नव्हती कारण विचारांनी जाणीव व्यापून टाकली होती आणि उत्साह नव्हता कारण आपण स्वतःला देह समजत होतो.

ज्या क्षणी आपल्या निराकारत्वाचा उलगडा होईल त्या क्षणी "निश्चिंतता, आनंदाची जाणीव, आणि उत्साह" ही परिमाणं आपल्याला अनायासेच उपलब्ध होती हे तुमच्या लक्षात येईल. 

मेल : दुवा क्र. १