वेदना दडवून गाणे गात आहे
नाटकाची ही खरी सुरुवात आहे
भूतकाळी हरवणे दैवात आहे
आठवांची अंगणी बरसात आहे
नोकरीसाठी मिळवला दाखला मी
लपवुनी माझी खरी जी जात आहे
मी भुकेला, काढतो ढेकर तरीही
मुखवट्याच्या आड वाताहात आहे
गारद्यांना मी अताशा भीत नाही
आपुल्यामधलाच करतो घात आहे
आस का देता मला खोटी उद्याची?
आज वैर्याची कदचित् रात आहे
कैक आल्या, भेटल्या पण नेमकी का
जीवनी आली न ती ह्रदयात आहे
स्नान मी गंगेत केले अन् नव्याने
पाप करण्या टाकली मी कात आहे
शुध्द वारा, पाखरे, गावात हिरवळ
काय उरले आज या शहरात आहे
पेश हो "निशिकांत" चल देवापुढे तू
पाप पुण्याची उद्या रुजुवात आहे
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३