पाचूचे बेट - ६

०१-०५-२०११.

वाटेत एके ठिकाणी कमालला विसावा द्यायला चहा घेतला. ड्रायव्हींगमध्ये विसावा मिळाला खरा पण आता भ्रमणध्वनीवरून हॉटेलांशी त्याचे गुडुगुडू सतत चालू होते. कमालच्या ओळखीची सगळी हॉटेले भरलेली होती. शेवटी एका हॉटेलात दोन खोल्या साडेआठ वाजता रिकाम्या होणार होत्या. कोलंबोला पहिले कमालने त्याच्या घरी नेले. मुंबईजवळ वसईत किंवा पुण्यात कर्वे नगरला बंगले आहेत तसे घर. अतरंगी असला तरी कमाल कुटुंबवत्सल गृहस्थ आहे. मुले आपापले व्यवसाय व्यवस्थित करताहेत. चहापाणी झाले. त्याचा जावई पण आला होता. निघाल्यावर आणखी काही हॉटेलात गेलो. कधी हॉटेल पसंत येत नसे तर कधी खोल्याच उपलब्ध नव्हत्या. शेवटी साडेआठच्या हॉटेलात गेलो. नऊच्या सुमाराला खोल्या तयार झाल्या आणि आम्ही प्रवेश करते झालो. जसे असावे तसे पंचतारांकित हॉटेल. दरही जवळपस कॅंडीसारखेच. ते गिरीस्थान तर ही राजधानी. स्नान करून भोजन केले. इथे देखील तसा काळे कोट घातलेल्या गायक वादकांचा चमू होताच. पण हा वृंद काही खास नव्हता. आम्ही फर्माईश वगैरे केली नाही.

From दुवा क्र. १" target="_blank"> कोलंबोमधला वादक चमू

खाद्यपदार्थ थोडेफार तसेच. दोन वेगळे पदार्थ इथे होते. शेवया किंवा इडीअप्पमसारखे नूडल्स. आणि दुसरी नारळाच्या दुधातली भरपूर हळद घातलेली कैरीची आमटी. पण तिखटपणा जवळजवळ नाहीच. मी भातावर तर ती घेतलीच पण नूडल्सवरही घालून त्या भातासारख्या उसळीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर खाल्ल्या. एकदोन तिखट उसळी होत्या. एक बीन्सची तर दुसरी चवळीची. बटाट्याच्या लांबट उभ्या अर्धवर्तुळाकृती कापांची लाल तिखट भाजी होती. मस्त मजा आली. गोडाला मी यथोचित न्याय दिलाच. अर्थातच वजनदार सोबत्यांना पार्श्वकंडू देत देत.

०२-०५-२०११.

खोलीच्या सज्जातून सुरेख समुद्रदर्शन झाले. खाजाम साखरझोपेत. साडेसहा पावणेसातला चहा करून प्यालो. जाड्याशेवडेच्या खोलीतून आवाज नव्हता. झोपले असतील म्हणून आवाज दिला नाही. प्रभातफेरी मारायला एकटाच बाहेर पडलो. वातानुकूलनातून बाहेर आल्याबरोबर जाणवले की प्रचंड उकडत होते. हवेतील बाष्पाचे प्रमाण भरमसाठ. वर पाहिले. निसर्ग मल्हार आळवीत होता. केव्हा आकास कोसळेल भरवसा नाही. मागील आवारात झाडे, त्यातल्या एका पांढर्‍या चाफ्याच्या झाडाला फुले होतीच, पण आश्चर्य म्हणजे फळे पण होती. फुले होती म्हणून चाफा म्हणायचे झाले. एकेक आक्रीतच. मला शिरीष पैंच्या खडकचाफा या सुरेख, उत्कट कथेची आठवण झाली. ती वाचल्यापासून खडकचाफा पाहायचा आहे आणि त्याचा तो त्यांनी उत्कटतेने वर्णिलेला वार्‍यावर पसरणारा, उग्र रासवट पण मोहक, वेड लावणारा सुगंध अनुभवायचा आहे. ते अजून बाकी आहे. या चाफ्याला मात्र पांढर्‍या चाफ्यासारखाच वास होता.

From दुवा क्र. २" target="_blank">चाफ्याची फळे

त्यामागे एक लाबलचक जाळी. चेंडूफळीच्या सरावाला असते तशी. मासेमारीचे जाळेच हवेत लावलेले असावे. त्यापलीकडच्या तरणतलावापलीकडे सौंदर्याचा लवलेशही नसलेला समुद्रकिनारा. काळपट पिवळी वाळू, त्यात अधूनमधून छोटेछोटे काळे दगड. दोन्ही बाजूंना अशीच हॉटेलची आवारे दिसत होती. उबदार हवा. उकडत नव्हते एवढेच. समुद्रात दूरवर एकदोन मच्छीमार होड्या. एकच गोष्ट आवडली, ती म्हणजे अजिबात गर्दी नव्हती, शांतता आणि शांतता अधोरेखित करणारी समुद्राची घनगंभीर गाज. अर्ध्यापाऊण तासात वातानुकूलनाचा थंडावा घ्यायला खोलीवर परतलो. वाटेत एक हॉटेलचा सेवक दिसला. त्याला विचारले की जाळ्या का लावल्या आहेत. तर कावळ्यांना प्रतिबंध. नाहीतर कावळे सरळ स्टील्टमधल्या एका बाजूने उघड्या असलेल्या जेवणघरात येतात. खोलीत परत गेलो.

तिघे व्यायामाला गेले. मी खोलीवर हातपाय झाडून न्याहारीला काय आहे ते पाहायला जेवणघरात एक फेरी मारून आलो. न्याहारी दहापर्यंतच उपलब्ध होती. संत्रे, पपई आणि मद्यदेवीची माता अंगूरीचा अर्थात काळ्या द्राक्षांचा असे तीन रस, चहाकॉफी, टोस्टरच्या बाजूला लोणीपाव आणि इतर पदार्थ होते. बहुतेक ठिकाणी असते तसे आम्लेट आपल्याला हवे ते पदार्थ घालून आपल्यासमोरच बनवून देतात. इथे देखील माझे आवडते क्रोशॉं होते. गोडाचे पदार्थ होतेच. व्यायामशाळेत जाऊन तिघांना बातमी दिली, पावणेदहाला यायला सांगितले आणि खोलीवर निवांत बातम्या पाहात बसलो. एका वाहिनीवर श्रीलंका आयडलचा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता.

न्याहारी केल्यावर कोलंबोत फिरायला बाहेर पडलो. वाटेत लागलेले समुद्रकिनारे मात्र देखणे होते. वानानुकूलित गाडीत बसून इकडेतिकडे फिरून प्रकाशचित्रे घेणे, मग वातानुकूलित मॉलमध्ये फिरून वाटेत कुठेतरी पोटात काहीतरी ढकलायचे आणि संध्याकाळपर्यंत आराम करायचा. मग दोघे पोहायला जाणार. एक व्यायामशाळेत आणि मी मनाला येईल ते करणार. हवे तर भटकणार, नाहीतर खोलीत बसून वाचन किंवा इडियट बॉक्स पाहाणे. मी दुसरा शांततेवर ओरखडे न ओढणारा थंड पर्याय निवडला.

From दुवा क्र. ३" target="_blank">देखण्या होड्या

From दुवा क्र. ४" target="_blank">आधुनिक कोलंबो शहर

From दुवा क्र. ५" target="_blank">देखणा समुद्रकिनारा
कोलंबो शहरातला एक देखणा समुद्र किनारा. दीडदोनशे वर्षांपूर्वीच्या तोफा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत.

From दुवा क्र. ६" target="_blank">देखणी इमारत
कोलंबोमधल्या एका सुरेख मैदानाला बिलगून असलेली एक देखणी इमारत.

From दुवा क्र. ७" target="_blank">चर्चची दानपेटी
धर्माने बौद्ध असलेला कमाल या चर्चच्या पेटीत पैसे टाकतो.

मॉलमध्यल्या कपड्यांच्या दुकानात प्रामुख्याने भारतीय बनावटीचे कपडे होते. आपल्याकडे अठराशे वगैरे रुपयांना मिळणारे शर्ट तिथे ३०००/- श्रीलंकन रुपयांना म्हणजे बाराशे भारतीय रुपयात मिळाले. दोन घेतले. आपल्याकडच्या हजार पंधराशे रुपयांच्या दोन आदिदासच्या पॅंट्स तिथे पाचशे ऐशी श्रीलंकन रुपये म्हणजे साडेतीनशेला मिळाल्या. मालाचा दर्जा चांगलाच होता. त्यामुळे खरेदी वगैरे करायची नसून मी देखील केली. रात्री जेवल्यावर गप्पांचा फड जमला. अकरा कधी वाजून गेले कळले पण नाही. सव्वाअकरादरम्यान हॉटेलचा एक सेवक आला. थोडासा भीतच नम्रपणे म्हणाल की त्या शांततेत आमच्या बोलण्याचे आवाज खालच्या खोलीत ऐकू जात होते आणि तिथल्या प्रवाशांना झोपायला त्रास होत होता. वातानुकूलनाचा आवाजही फारसा मोठा नव्हता आणि आम्ही पण तसे फारसे मोठ्याने बोलत नव्हतो. पण ही वेळ तशी झोपण्याचीच. आम्ही दिलगिरी व्यक्त केली, सेवकाने धन्यवाद दिले. आम्ही झोपी गेलो.

मॉलमध्ये एका काचपेटीत एक तांब्याचा चकचकीत देखणा बंब होता. त्याची प्रकाशचित्रे घेतली आणि इतर प्रकाशचित्रे घेतली. खास असे काही नाही. बाकी तसे फारसे काही खास लिहिण्यासारखे पाहिले नाही आणि घडलेही नाही.

तारीख दोन की तीन आठवत नाही. खाजाम निद्रिस्त. सकाळी उठून चहा करून प्यालो. थोडा वेळ सज्जातून समुद्रदर्शन. तेवढ्यात दारावर हलकी टकटक. खाजामच्या सुखनिद्रेत व्यत्यय येणार नाही इतपत. जाड्या होता. त्याने ताजी बातमी दिली. लादेनला गोळ्या घालून ठार केले. नुकतीच टीव्हीवर बातमी पाहिली म्हणे. खाजाम अजून निद्रिस्त. जाड्याशेवडेच्या खोलीवर गेलो. तिघे चहा पीत बातम्या पाहात बसलो. थोड्या वेळाने खोलीवर गेलो तर खाजाम तयार होत होता. त्याला बातमी दिली.

दिवस कोलंबोतच घालवला आणि आठ दिवसानंतर पाचूच्या बेटाच्या मस्त आठवणी घेऊन मुंबईला परत आलो. यथावकाश घरी बसून संग्याचा कळफलक बडवून तारीखवार नोंदी केल्या. प्रकाशचित्रांवरून तारीखवार लावल्या. आपला अमूल्य वेळ खर्चून वाचणार्‍या सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद.

समाप्त