मी उधार हसणे हसतो
नगदीत आसवे पुसतो
आप्तांच्या रेशिम गाठी
मी गळ्याभोवती कसतो
आयुष्य पोरके जगतो
त्वेषातच मी फरपटतो
मजला हे ठाउक नाही
प्रेमाला अंकुर फुटतो
अंगणी जरी तो फुलतो
मजसाठी सुगंध नसतो
केवड्यासवे असणारा
तो सर्पच माझा असतो
कंटकावरी मी निजतो
अन् वेदनेस पांघरतो
या जगास चिंता नाही
मी जगतो अथवा मरतो
तो तारा दुरून बघतो
अन् त्यात जरासे रमतो
दुर्दैव तोच का तारा
तुटतो अन् खाली पडतो
गजला मी जेंव्हा रचतो
का एक शब्द अडखळतो?
मी पुन्हा पुन्हा मिसरे ते
लिहिलेले वाचुन पुसतो
जो कोणी भाळी लिहितो
मी सवाल त्याला करतो
हा भेद भाव का देवा?
जगतो कोणी गुदमरतो
निशिकांत देशपंडे मो.क्र, ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com