शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधून सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावून गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहिराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवले होते. सडेतोड स्वभावाच्या बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी सर्वांना आवाहन केले होते की कृपया लहान मुलांना बरोबर आणू नका आणि ज्यांना शेवटपर्यंत बसणे जमणार नसेल त्यांनी कृपया येऊ नये. ते बरोबरच होते. एकदा का हा शाहीर शिवकालात गेला की अक्षरशः: पाणी प्यायला देखिल न थांबता आपल्या लयीत इतिहास साकारत असे. आपल्या श्रोत्यांना साक्षात शिवकालात घेऊन जाण्याचे महान सामर्थ्य बाबासाहेबांकडे होते. ते रंगात येऊन कथन करीत असता जर मुलांनी दंगा सुरू केला, भोकाड पसरले वा कुणी मध्येच उठून चालू लागले का त्यांचा रसभंग आणि लयभंग होणे स्वाभाविकच होते.( सुदैवाने त्या काळात भ्रमणध्वनी नव्हते.)

मराठी माणसाच्या घरात 'राजा शिवछत्रपती' असणे हे दारात वा खिडकीत तुळशीचे रोप असण्याइतके निश्चित होते. अनेक शाळांमधून, वासंतिक व्याख्यानमालांमधून वा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत बाबासाहेबांची व्याख्यानमाला सातत्याने सुरू असायची. साधारण १९८०-८५ च्या सुमारास ठाण्यात त्यांची एक अभिनव व्याख्यानमाला झाली होती, विषय होता "राजा शिवाजी - एक प्रशासक व आदर्श राजा". तोपर्यंत मी त्याचे केवळ 'राजा शिवछत्रपती' च ऐकले होते. शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकी सोहळ्यानिमित्त म्हणजे १९७४ मध्ये दादरच्या शिवाजी मैदानात 'शिवसृष्टी' साकारण्यात आली होती. संध्याकाळी दर तासा-दोन तासांनी 'शिवराज्याभिषेकाचा' सोहळा खास उभारलेल्या प्रचंड मोठ्या रंगमंचावर साजरा होत असे. हा सोहळा खरोखरच प्रेक्षकांना शिवकालात घेऊन जात असे, आणि जेव्हा राजे सिंहासनस्थ होताना बाबासाहेबांच्या खणखणीत आवाजात जेव्हा 'गोब्राह्मण प्रतिपालक.....' अशी ललकारी यायची तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत होते. या नंतर इतका भव्य कार्यक्रम झाला तो जाणता राजा.

अकरा वर्षांपूर्वी पुण्याच्या एका संस्थेने आयोजित केलेल्या 'पन्हाळा, पावनखिंड, विशाळा व प्रतापगड' या भ्रमंतीला जायचा योग आला होता, साक्षात बाबासाहेबांच्या बरोबर! बाबासाहेबांच्या सहवासातले ते दिवस अजूनही आठवतात. पन्हाळ्यावर प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या कडूनं सिद्दी जौहर ऐकणे ही पर्वणी होती. तेव्हा बाबासाहेब ७९ वर्षांचे होते पण उत्साह तरुणांना लाजविणारा. एखाद्या लहान मुलाने पाहुण्यांना आपले घर दाखवावे तितक्या उत्साहाने बाबासाहेब आम्हाला घेऊन पन्हाळ्यावर फिरले होते. राजे वेढा फोडून साधारण कुठल्या वाटेने गेले असावेत ती त्यांच्या अभ्यासानुसारची वाटही त्यांनी दाखविली. तिथून पुढे अंबा घाटात. मुक्काम पावनखिंडी जवळ एका विश्रामगृहात होता. सकाळी नाश्ता झाल्यावर पावनखिंडीचा कार्यक्रम होता. आम्ही सगळे बसकडे जात असताना मागून बाबासाहेबांची हाळी आली, 'अरे म्हातारे झालात काय रे या वयात? वर टपावर बसून सह्याद्रीचा वारा छातीवर घ्यायचा सोडून आत कसले बसता? ताबडतोब सगळे मागे शिडीकडे वळले. पावनखिंडीत फिरून आल्यावर बाबासाहेबांनी तिथे उभारलेल्या तात्पुरत्या निवार्‍यात आम्हाला राजे पन्हाळा ते विशाळा कसे निसटले हे सांगायला लागले आणि सगळे जण आपण भर दुपारी रणरणत्या उन्हात आहोत हे विसरून गेलो. त्या विश्रामगृहाच्या मालकांनी (श्रीयुत शिरगावकर) पावनखिंडीत एक छोटी प्रदर्शिका उभारली होती व तिचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते होते. तिथून पुढे विशाळा व मग प्रतापगड. लहानपणापासून प्रतापगड अनेकदा पाहिला होता, मात्र बाबासाहेबांसोबत पाहिलेला प्रतापगड काही निराळाच होता. प्रतापगडाचे युद्ध हे दहा देशांच्या लष्करी अकादमींमध्ये एक संपूर्ण पाठ म्हणून शिकविले जाते - 'कमीत कमी वेळ, सामग्री व सेनेच्या साहाय्याने बलाढ्य व सुसज्ज शत्रूच्या प्रचंड सेनेचा सर्वनाश' याचे उदाहरण म्हणून. एकदा रात्री जेवणानंतर बाबासाहेब जरा निवांत मिळाले आणि मी संधी सोडली नाही. बाबासाहेब म्हणजे अत्यंत मऊ माणूस, कुणाला नाही म्हणणार नाहीत. मी बाबासाहेबांना विनंती केली की 'प्रतापराव गुजर' ऐकायचे आहे आणि आम्हा सर्वांना बाबासाहेबांनी प्रत्यक्ष तो इतिहास ऐकवला आणि आमचे कान तृप्त झाले.

आज बाबासाहेबांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना हा सचित्र मुजरा

PhotobucketPhotobucketPhotobucketPhotobucketPhotobucketPhotobucketPhotobucketPhotobucket