नवी नियमावली

गेली काही दशके प्रस्तुत लेखकाच्या असे (हळूहळू) लक्षात आलेले आहे की खालील दोन
गोष्टींमध्ये भयावह वाढ झालेली आहे.
* नवीन तंत्रज्ञान
* प्रस्तुत लेखकाला
फाट्यावर मारून जगरहाटी चालवण्याची प्रथा
पण आता या खुळचटपणाला थांबवणे भाग आहे.
जगरहाटीचे नवीन नियम खालीलप्रमाणे असतील.

==
[१] महाराष्ट्र, महालक्ष्मी आणि
महागाई हे तीन शब्द सोडून इतर कुठल्याही शब्दामागे 'महा' लावणे बेकायदेशीर मानले
जाईल. महासंग्राम, महासिनेमा, महाएपिसोड असले शब्द पाच वेळेस उच्चारणाऱ्या
व्यक्तीला तीन आठवड्यांसाठी बुळकांड्या रोग जडेल. हा रोग म्हणजे काय हे माहीत
नसल्यास रोगाचा कालावधी सहा आठवडे राहील. तसेच हे शब्द छापल्यावर त्यातील 'महा'
आपोआप गायब होईल.

(१ अ) राज ठाकरेंचा पक्ष राष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ओळखला
जाईल. गाव महाराष्ट्र असले तरी आव राष्ट्राचा आणायचा असतो हे अखेर त्यांना
उमजेल.

(१ आ) महागांवकर, महाशब्दे, महाजन, महाबोले, महाडिक या आडनावांच्या
मंडळींची गोची होण्याची शक्यता आहे. विशेषतः कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या
महाडिकपुत्रांची. पण नाईलाज आहे.

(१ इ) दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात (वा इतर कुठल्याही ठिकाणी) 'महागुरू' हा
शब्द उच्चारणार्‍या व्यक्तीला सहा महिने बुळकांडया रोग जडेल. रोग माहीत नसल्यास
अकरा महिने. स्वतःला 'महागुरू' म्हणवून घेणार्‍या व्यक्तीच्या टकलावर विग टिकणार
नाही आणि अशा 'महागुरू'ची उंची पावणेआठ इंचांनी कमी होईल.

==

[२] रस्तादुरुस्तीच्या नावाखाली वाटेल तिथे पेव्हर-ब्लॉक्स बसवण्याचे कंत्राट
देणार्‍यांच्या गाड्या प्रत्येक सिग्नलला बंद पडतील आणि तीन सिग्नल जाईपर्यंत चालू
होणार नाहीत. अशा मंडळींनी रिक्षा-टॅक्सीने प्रवास केला तरीही तीच गत होईल.

(२ अ) पेव्हर-ब्लॉक बसवणारे कंत्राटदार भस्म्या रोगाने पीडित होतील आणि त्यांची
सगळी कमाई स्वतः खाण्यातच खर्च होईल. काळा-पांढरा असा सगळा पैसा खाऊन संपला की ते
रोगातून मुक्त होतील.

(२ आ) पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांत साठणारे सगळे पाणी एकत्र करून त्याने
सार्वजनिक बांधकाम खात्यातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या वरच्या श्रेणीतील सगळ्या
मंडळींना आंघोळ घातली जाईल. पाणी फारच खराब असले तर ते प्यायला भाग पाडले जाईल.

(२ इ) टोलनाक्यांची कंत्राटे मिळवणारे आणि त्याविरुद्ध आंदोलन केल्याचा आव
आणणारे अशा दोन्ही प्रकारच्या मंडळींच्या गाड्या दिवसातून सात वेळेस पंक्चर होतील
(शनिवार रविवारी दहा वेळेस). अशा मंडळींनी रणगाड्यातून प्रवास केल्यास त्या
रणगाड्याचा पट्टा तुटेल आणि हॉवरक्राफ्टने प्रवास केल्यास वेग दिवसाला दहा किमी
इतका असेल.

==

[३] वर्तमानपत्रात लिहिताना मराठी शुद्धलेखनाचे नियम धुडकावणार्‍यांना
वर्तमानपत्रे भिजवून कुटून हातकागद करण्याची शिक्षा दिली जाईल. प्रत्येक चुकीसाठी
सलग सहा तास शिक्षा असेल.

(३ अ) इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना चुकीचे उच्चार ('फिल गुड', 'गेट वेल सुन'
आदि) समाजात पसरवणार्‍या माणसांना कुठलीही भारतीय भाषा येईनाशी होईल. त्यांना फक्त
अझरबैजानी भाषाच समजेल.

(३ आ) आंतरजालावर अशुद्ध लेखन करून निर्विकारपणे प्रकाशित करणार्‍या मंडळींच्या
हाताची बोटे इतकी नाजूक होतील की त्यांना कुठलाही कळफलक वापरता येणार नाही
(भ्रमणध्वनीचादेखिल). या नाजुक बोटांनी त्यांना फक्त बुढ्ढीके बाल आणि चुरमुरे खाता
येतील.

(३ इ) इंग्रजी वाक्प्रचार आणि म्हणी मराठीत भाषांतर करून मग त्याची वाटेल तशी
लघुरूपे करणारी मंडळी यापुढे फक्त कानडी हेलातली अहिराणी भाषा बोलू शकतील. अशा
मंडळींचे सगळे लिखाण गुरुमुखी लिपीतल्या गुजरातीत आपोआप परावर्तित होईल.

==

[४] लसूण 'ती' का 'तो' हा वाद घालणार्‍यांना उरलेला जन्म लसूण सोलण्यात घालवावा
लागेल. तसेच त्यांच्या प्रत्येक पदार्थात लसणीचा अंतर्भाव असेल (चहात देखिल).
फक्त पिण्याच्या पाण्यात लसूण नसेल, कांद्याचा रस असेल.

(४ अ) 'हनी फ्राईड चिकन', 'मोसंबीच्या रसातले मटन' असले प्रकार करणार्‍या
मंडळींना उर्वरित आयुष्य पिंपळाची पाने खाऊन काढावे लागेल. त्यांचा कोटा
येणेप्रमाणे- रोज पंचवीस पाने, शनिवार-रविवारी तीस. दसर्‍याला पाच आपट्याची
पाने आणि गणेशचतुर्थीला सात दुर्वा जास्तीच्या मिळतील.

(४ आ) न धुरावलेल्या तेलात बद्कन फोडणीचे साहित्य टाकून मग ते तडतडण्याची वाट
बघणार्‍या मंडळींनी कुठलाही तेलयुक्त पदार्थ खाल्ला की त्यांच्या जिभेवरचा ताबा
सुटेल आणि ते कानठळ्या बसवणार्‍या आवाजात संतोषी मातेची आरती सत्तावीस मिनिटे
म्हणतील. ही आरती इंग्रजीत असेल.

(४ इ) गोड पदार्थ सोडून इतर कुठल्याही पदार्थात गूळ घालणार्‍या मंडळींना
गुळाच्या पाकात बुडवून लाल मुंग्यांच्या वारुळावर सत्तेचाळीस मिनिटे बसवले
जाईल.

==

[५] दारूला 'ड्रिंक' म्हणणार्‍या, एका वेळेस तीन पेगपेक्षा कमी पिणार्‍या, पेला
हातात येताच शेरोशायरी करू लागणार्‍या मंडळींच्या दारूचे तत्काळ गोमूत्र होईल.

(५ अ) दारूत भेसळ करणारे सर्वजण मुके आणि आंधळे होतील. आंतरजालावरच्या सगळ्या
मराठी कविता एकत्र करून त्या त्यांना दिवसातून दहा तास ऐकवल्या जातील. 'आम्हांला
बहिरेपण हवे' असा अर्ज घेऊन ही मंडळी येईस्तोवर ही शिक्षा चालू राहील.

(५ आ) 'खजुराहो' (ऊर्फ 'खजुरा') आणि 'नॉक आउट' (ऊर्फ 'नाकाट') ही बिअर
पिणार्‍यांना प्रदीप दवणेंच्या कविता पाठ कराव्या लागतील. दोन कविता म्हटल्याखेरीज
त्यांना पाणीही मिळणार नाही. आणि त्यांनी बिअरचा घोट गिळला की त्याचे एरंडेल
होईल.

(५ इ) 'हँगओव्हर' ही एक दुर्धर व्याधी जाहीर करण्यात येऊन वैद्यकीय क्षेत्रातले
सगळे संशोधन त्यावर केंद्रित करण्यात येईल. हँगओव्हरवरचे औषध शोधल्यावर ते प्रत्येक
रस्त्यावरच्या प्रत्येक खांबावर बसवलेल्या पेटीत मोफत उपलब्ध असेल. हे औषध
घेण्यासाठी पाण्याची गरज नसेल.

==

[६] 'मराठी साहित्य संमेलन' हे आमच्या मर्जीतून उतरलेले आहे, मग ते 'अखिल
भारतीय' असो वा 'विश्व'. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांना
मताधिकार आहे त्या सर्वांना तात्पुरता स्मृतीभ्रंश होईल. कष्टाने पैका मिळवण्याची
सवय लागली की या दुखण्यातून त्यांची सुटका होईल.

(६ अ) साहित्य संमेलनाचा अध्यक्ष/अध्यक्षा म्हणून कुणी भाषण लिहिलेच तर त्या
लिखीत भाषणाच्या शंभर प्रती काढण्यात येतील. त्या प्रती त्या अध्यक्षाला दिवसातून
दोन अशा खाव्या लागतील. पन्नास दिवसांनी पुढील शिक्षेचा विचार होईल. हे पन्नास दिवस
त्या अध्यक्षाला काहीही बोलता येणार नाही.

(६ आ) या कायद्याविरोधात कुणी पत्रके काढायचा प्रयत्न केला तर ती पत्रके
छापण्याचा प्रयत्न करणारे छापखाने बंद पडतील. ते दुरुस्त करायचा प्रयत्न
करणार्‍यांना दीड लिटर वंगण प्यावे लागेल.

(६ इ) कौतिक टोळीत सामील होऊन ज्यांनी ज्यांनी आधी लूटमार केलेली आहे त्यांना तो
पैसा दर महिना पंचवीस टक्के व्याजाने भरायला लागेल. तो पैसा मिळवण्यासाठी त्यांना
अफगाणिस्तानात बांधकाम मजूर म्हणून पाठवण्यात येईल. पैसा वसूल होईपर्यंत त्यांना
कुठलेही संपर्कसाधन, लेखनसाधन वा साबण वापरता येणार नाही. टोळीप्रमुखाला ही शिक्षा
तहहयात होईल.

==

[७] 'सामाजिक कार्यकर्ते' म्हणून मिरवणार्‍या मंडळींच्या सोन्याच्या दागिन्यांचे
पितळ होईल. आणि चारचाकी गाड्यांच्या बैलगाड्या.

(७ अ) भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी होणार्‍या प्रत्येकाचा उत्पन्नाचा
तपशील त्या त्या गावातल्या मुख्य चौकात एका मोठ्या फलकावर जाहीर केला जाईल. त्यात
त्या व्यक्तीचे वाहन, त्याची किंमत, त्याला लागणार्‍या इंधनाची किंमत, त्या
वाहनामुळे होणारे प्रदूषण या बाबी स्पष्ट केल्या जातील.

(७ आ) 'आपल्या मालकीचे वाहन नाही' असा आव आणून पजेरोमधून फिरणार्‍यांना गाडीत
बसल्याबसल्या पाठदुखी, दातदुखी आणि गुडघेदुखी सुरू होईल. ती त्यापुढचे नऊ दिवस
टिकेल. या नऊ दिवसांत परत गाडीत बसायचा प्रयत्न केल्यास अर्धांगवायूचा झटका
येईल.

(७ इ) या नियमाविरुद्ध फेसबुकवरून मोहीम उघडायचा प्रयत्न करणार्‍यांना एक किलो
निरमा खाऊ घालून त्यांच्या तोंडाला फेस आणला जाईल.

==

[८] शिक्षणमहर्षी ही पदवी रद्द करण्यात येत आहे. तरीही ती कुणी लिहा/बोलायचा
प्रयत्न केला तर त्याऐवजी 'महागुरू' वाचा/ऐकायला मिळेल. इथे नियम (१ इ) लागू
होईल.

(८ अ) 'विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरते आहे' असा गळा काढणार्‍या सर्व
अध्यापकांची कुठलीही पूर्वकल्पना न देता परीक्षा घेतली जाईल. दहा वर्षांपूर्वी पास
झालेले आणि आता नोकरी-व्यवसाय करून जगणारे माजी विद्यार्थी या परीक्षेचा पेपर
काढतील. या परीक्षेचा निकाल प्रत्येक गावातल्या प्रत्येक चौकात आणि त्या
अध्यापकांच्या घराच्या दारांवर रंगवला जाईल. या अध्यापकांमध्ये 'व्हिजिटिंग
फॅकल्टी'देखिल अंतर्भूत असेल.

(८ आ) जे अध्यापक वरील परीक्षेत नापास होतील (८५% पेक्षा कमी गुण मिळवणारे नापास
गणले जातील) त्यांना परत इयत्ता पहिलीपासून शिक्षणाची सुरुवात करावी लागेल.
त्यासाठी त्यांना इतर विद्यार्थ्यांच्या दुप्पट फी आकारली जाईल.

(८ इ) प्रत्येक वर्षी पास होणार्‍या मुलांचे एक सर्वेक्षण केले जाईल. त्या
निकालांवरून पुढील वर्षाची फी किती असावी आणि भरलेल्या फीमधली किती रक्कम परत
विद्यार्थ्याच्या खात्यात आपोआप वळती व्हावी हे ठरवण्यात येईल.

==

[९] 'आयुर्वेद', 'योगा', 'प्राचीन संस्कृती' असली दुकाने मांडून बसलेल्यांना
सहारा वाळवंटात पाठवले जाईल. तिथे त्यांच्या दिमतीला स्विस वा अमेरिकी ललना
'सेविका' म्हणून नसतील तर नरमांसभक्षक टोळीतल्या धारदार दातांच्या स्त्रिया ते काम
करतील.

(९ अ) या मंडळींची इथली संस्थाने विकून तो पैसा प्राथमिक आरोग्य आणि
रस्तेबांधणीवर खर्च केला जाईल.

(९ आ) या मंडळींना आजपर्यंत आश्रय देणार्‍या राजकारणी आणि/वा वृत्तपत्रमालकांना
दिवसातून तीन तास खोकल्याची ढास लागेल आणि चार तास हगवण.

(९ इ) या कायद्याविरोधात उपोषण करणार्‍यांना ते उपोषण किमान सदतीस दिवस करावे
लागेल. उपोषणकाळात स्टीलचे तांब्याभांडे वापरून मोसंबी वा तत्सम रस प्यायचा प्रयत्न
केला तर त्या रसाचे समुद्राच्या पाण्यात रूपांतर होईल. तो समुद्र दादर चौपाटीचा
असेल, वेळणेश्वर वा हेदवीचा नव्हे.

==

[१०] प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे आसपासचा खुळचटपणा असह्य झाल्याने मी हे नवीन
नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे. सध्या इतकेच नियम तयार आहेत.

(१० अ) हे नियम 'मॅक्रो' पातळीवरचे आहेत. खाली उतरून 'मायक्रो' पातळीवरचेही नियम
(एअरटेलची सर्व्हिस, चितळेंच्या दुकानाच्या वेळा, 'कोल्हापुरी' नावाने खपवण्यात
येणारे पदार्थ इ इ) करायची गरज आहे याची मला जाणीव आहे, कुणी आठवण करून देण्याची
गरज नाही. आठवण करून देण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीचा ईमेल अकाउंट हॅक होऊन
त्यातून अमेरिकन अध्यक्षाच्या (जो असेल तो - बराक किंवा मिट) पत्नीला अश्लील पत्र
पाठवले जाईल. मग सीआयए त्या व्यक्तीला पकडून ग्वांटानामो बे मध्ये पाठवून देईल.

(१० आ) नियमावलीचा पुढचा भाग कधी येणार आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न
करणार्‍या व्यक्तीचे पॅनकार्ड, लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि एटीएम कार्ड या चार
गोष्टी हरवतील. "परत अशी चौकशी करायचा प्रयत्न करणार नाही" असे दिवसातून सदतीस
वेळेस घोकल्यावर तीन आठवड्यांनी त्यांच्या वस्तू त्यांना परत मिळतील. 'रिपीट
ऑफेंडर'ला या वस्तू कधीच परत मिळणार नाहीत.

(१० इ) वरील कुठल्याही नियमामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या तर त्या
व्यक्तीस मंगळावर कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची मुभा दिली जाईल. ही मुभा नियमावली
प्रसिद्ध झाल्यापासून एक आठवडा असेल. या आठवड्याभरात स्थलांतर न करणार्‍या
व्यक्तीने नंतर कुरकूर करायचा प्रयत्न केल्यास (१० अ) वा (१० आ) हा पोटनियम त्यांना
लावण्यात येईल. कुठला पोटनियम लावायचा हे मी निर्णयाच्या दिवशी चहा पितो की कॉफी
यावर अवलंबून असेल.