भरली कारली

  • हिरवीगार कारली पाव किलो (बुटकी असल्यास जाती चांगली)
  • ओल्या नारळाचा खव दोन वाट्या
  • दाण्याचे कूट दोन वाट्या
  • तिखट, मीठ, गोडा/गरम मसाला, गूळ, हळद, हिंग, धने-जिरे पूड
  • कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल
४५ मिनिटे
२ जणांना

पहिल्याप्रथम बुटकी हिरवीगार कारल्याचे दोन भाग करणे. कारली उंच असल्यास ३-४ भाग करणे. त्यातील बिया काढणे.

नारळाचा खव व दाण्याचे कूट यामधे प्रत्येकी ३-४ चमचे तिखट,धने-जिरे पूड, गोडा किंवा गरम मसाला घालणे. अजुन १ चमचा हळद व अर्धा चमचा हिंग घालणे. कोथींबीर बारिक चिरुन घालणे. लिंबा एवढ्या आकाराचा गूळ व चवीपुरते मीठ घालुन हे सर्व मिश्रण कालवणे. नंतर कारल्यामधे हे मिश्रण दाबून भरणे. हे मिश्रण जास्ती प्रमाणात झाले तरी चालेल, पण कमी पडता कामा नये.

परसट भांड्यात तेल घालुन फोडणी करणे व त्यात ही कारली घालुन मंद आचेवर ५-६ वाफा देवून शिजवणे. सर्व कारली बुडतील एवढे तेल घालणे. कारल्यावर कोणतेही सोपस्कार करु नयेत.

कारल्याच्या कडू चवीमधेच खरी गोडी आहे. अमेरीकेतील तो दसरा मी कधीच विसरणार नाही. कधी नव्हे ते इंडीयन स्टोअर्समधे कारली दिसली, म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भरली कारली केली होती. दोन भारतीय विद्यार्थ्यांना  जेवायला बोलावले होते, कारण तेही कारलेप्रेमी होते.

रोहिणी

नाहीत.

मैत्रीण सौ दिप्ती जोशी