गझल
मला ओरबाडून तो काळ गेला!
हिरावून सर्वस्व तो काळ गेला!!
न आले कुणीही मला हात द्याया.....
लुबाडून अस्तित्व तो काळ गेला!
किती फोडला जीवघेणाच टाहो!
झुगारून आकांत तो काळ गेला!!
किती हिंस्र होता पशूंचा गराडा.....
मला त्यात सोडून तो काळ गेला!
किती झुंजले जीवना! मी तुझ्यास्तव....
मला मात देवून तो काळ गेला!
अता पेटल्या मेणबत्त्या, मशाली!
कळ्या मात्र तोडून तो काळ गेला!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१