मी तिच्या वेणीतल्या गजऱ्यात होतो!

मी तिच्या वेणीतल्या गजऱ्यात होतो!
की, कुण्या गझलेतल्या मिसऱ्यात होतो!!

मी तुझे निर्माल्य झालो, धन्य झालो!
वाटले दुनियेस, मी कचऱ्यात होतो!!

ना उगा गझलेमधे आली  झळाळी.....
मीच एकेका  तिच्या मिसऱ्यात  होतो!

सोहळे माझेच अन् माझेच उत्सव......
मी दिवाळी, ईद अन् दसऱ्यात  होतो!

मी सुपामध्ये तसा जात्यामधेही;
भरडलेही मीच, मी भगऱ्यात होतो!

बाज माझ्या लेखनाचा और होता!
मी रित्या जागेतही नखऱ्यात होतो!!

पोत सौख्याचा खऱ्या, कळला कुणाला?
मी सुखाच्या भरजरी सदऱ्यात होतो!
   
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१