धबधबा होऊन मजला कोसळावे वाटते!

धबधबा होऊन मजला कोसळावे वाटते!
तर कधी होऊन निर्झर झुळझुळावे वाटते!!

गोठल्या धमन्यांत थोडीफार उरली धुगधुगी....
माझिया रक्तास आता सळसळावे वाटते!

पाहतो जेथे, तिथे दिसतेस मजला तूच तू....
ह्या तुझ्या असण्यात मजला विरघळावे वाटते!

मी कधी दु:खात डोळ्यांना दिले नाही रडू;
आज अश्रूंना सुखाच्या ओघळावे वाटते!

सूर्यकिरणांची प्रभा पडते फिकी तुझियापुढे,
सूर्यबिंबाला पहाटे मावळावे वाटते!

जे पहायाला नको, ते पाहतो दररोज मी;
रक्त हृदयातील म्हणते...साखळावे वाटते!

कैक वर्षे जाहली...मी नांदतो आहे इथे!
हा पुरे परकेपणा, आता रुळावे वाटते!!

चालतो आहे सरळ, पण, गाव काही येइना....
पावलांना माझिया आता वळावे वाटते!

पेटण्याची वाट बघताना सरण कंटाळले;
प्रेत म्हणते चूड लावा, मज जळावे वाटते!

पाय माझे जाहले आहेत कुबड्यांसारखे!
चालताही येत नाही, अन् पळावे वाटते!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१