विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल

      नमस्कार, मी कु. वरदा अभिजित रिसबूड. मी सरस्वती सेकंडरी स्कूलच्या मराठी माध्यमात ७ वी त शिकतेय. मी या संकेतस्थळाच्या सभासद सौ. मुग्धा रिसबूड यांची मुलगी.  विचार प्रकट करण्यासाठी मनोगत ही वेबसाइट अतिशय उत्तम आहे. म्हणून माझ्या आईची परवानगी घेऊन मी माझे विचार तुमच्यासमोर मांडते आहे.


Vishwakul International Indian School and Junior College, Thane, (w)

1.    Vishwakul International Indian School

आमची ओळख
आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा जमाना हल्ली आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. अशा पालकांसाठी आमच्या विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या मराठी माध्यमाच्या शाळेचं उत्तम उदाहरण समोर ठेवता येईल. हसत खेळत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतून शिक्षण घेताना मुलं नक्कीच आनंदात राहू शकतील. शाळेच्या ज्युनिअर कॉलेजची इमारत स्वतंत्र असून संलग्न विंग्जपैकी ए विंगच्या मागेच आहे. गेल्या १३ वर्षांत केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला आहे, की विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेतच प्रत्येक विद्यार्थी येताना जसा येतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हसतमुखाने तो पुढे पुढे प्रगतीची वाटचाल करतो. तर आमच्या या विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळेच्या प्रत्येक भागाची ओळख आता आम्ही तुम्हाला पुढे करून देत आहोत.
वर्गखोल्या
या आधुनिक जमान्यामध्ये प्रत्येक शाळेत दृक्श्राव्य माध्यमाची सोय असणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्याही शाळेच्या प्रत्येक वर्गखोलीमध्ये या दृक्श्राव्य माध्यमाची सोय आहे.प्रत्येक खोली प्रशस्त असली तरी वर्गाचा पट मात्र ४० संख्येच्या वर नसतो. याचं कारण प्रत्येक विद्यार्थ्याची सोय अगदी व्यवस्थित व्हावी, म्हणून एका विद्यार्थ्याला एक आसन अशीच व्यवस्था आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा हे प्रत्येक वर्गाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वर्गखोलीला दोन दरवाजे आणि तीन खिडक्या असं मोकळं वातावरण आहे. प्रत्येक वर्गात ४ ते ५ पंखे आणि २ एसी आहेत. ज्यामुळे विद्यार्थांच्या सोयीनुसार त्यांच्या हवेची निकड भागवता येईल.
शिक्षक खोल्या
विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या संलग्न विंग्जमधील ए विंगच्या ५ मजल्यांपैकी २ मजल्यांवर शिक्षक खोल्यांची व्यवस्था लावण्यात आलेली आहे. पहिल्या मजल्यावर पुरुष शिक्षकांची आणि दुसऱ्या मजल्यावर स्त्री शिक्षकांची शिक्षक खोली आहे. प्रत्येक शिक्षक खोलीत कॅटलॉग्ज, खडूची पेटी, प्रत्येक वर्गाचं स्वतंत्र डस्टर आणि शिक्षकांसाठीच्या सूचना लिहिण्यासाठी फळा अशी व्यवस्था आहे.
मजले आणि संलग्न विंग्ज
शाळेला एकूण २ विंग्ज आहेत. त्यातील ए विंगला पाच मजले असून तळमजल्यावर मुख्याधापक आणि उपमुख्याध्यापकांचं कार्यालय, लिपिक, विश्वस्त यांची कार्यालयं आणि क्रीडा साहित्य खोली आहे. पहिल्या मजल्यावर ७ वर्गखोल्या, स्कूल थिएटर आणि एक शिक्षक खोली आहे. दुसऱ्या मजल्यावरही ७ वर्गखोल्या, एक शिक्षक खोली आणि स्कूल थिएटर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ९ वर्गखोल्या असून पाचव्या मजल्यावर ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक आणि विज्ञान प्रबोधिनी, आणि आर्ट स्कूल आहे. आर्ट स्कूलमध्ये गायन, वादन, नृत्य, भाषाशिक्षण, खेळ आणि मुख्य म्हणजे स्टेज परफॉर्मन्स या विषयांवर १०० टक्के मार्गदर्शन केलं जातं. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आर्ट स्कूलमध्ये मार्गदर्शन करतात. बी विंगलाही पाच मजले असून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ९ वर्गखोल्या आहेत. चौथ्या मजल्यावर तीन प्रशस्त सभागृहं असून पाचव्या मजल्यावर इयत्ता दहावीच्या प्रत्येक तुकडीच्या प्रॅक्टिकल्स एक्झॅम्ससाठी स्वतंत्र चार प्रयोगखोल्या आहेत. प्रत्येक विंगला एक-एक लिफ्ट आहे.तसंच, दोन विंग्जना जोडण्यासाठी प्रत्येक मजल्याला जिना आहे.
शाळेतील मुख्य उपक्रम
शाळेचा मुख्य उद्देश हाच आहे, की मुलांच्या विकासासाठी जितके पोषक उपक्रम करता येतील तितके राबवायचे. शाळेतील आर्ट स्कूलमध्ये गायन, वादन, नृत्य, भाषाशिक्षण, खेळ आणि मुख्य म्हणजे स्टेज परफॉर्मन्स या विषयांवर १०० टक्के मार्गदर्शन केलं जातं. तसंच जानेवारी महिन्यात क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक स्नेहसंमेलन भरतं. यात मुलांच्या आवडीचे कार्यक्रम मुलंच ठरवतात आणि सादर करतात. यात कुणीही ढवळाढवळ करत नाही. शाळेत दरवर्षी मुलांशी गप्पा मारण्यासाठी प्रसिद्ध कलाकार, रंगभूमीतील आणि चित्रपटातील मराठी अभिनेते, मानसोपचार तज्ज्ञ, गायक, वादक, निर्माते, दिग्दर्शक इत्यादी पाहुणे बोलावले जातात. या गप्पांसाठी वर्षातले १० रविवार निश्चित केले जातात . मुलांना याबाबत पूर्वसूचना दिली जाते. अभ्यासेतर उपक्रम म्हणजे मुलांसाठी वर्षातून दोनदा स्टूडंट्स पार्टी तसंच ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी केली जाते. यात विद्यार्थ्यांनीच पार्टीचं आयोजन करून वेगवेगळ्या कार्यक्रमांविषयी ठरवायचं असतं. ज्यामुळे मुलांचे नेतृत्वगुण, स्पष्टवक्तेपणा आणि प्रसंगावधान या गुणांचा विकास होतो.
शाळेची अधिवेशने
इयत्ता पहिली ते सातवीचे दुपार अधिवेशन: दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० ,मधली सुट्टी दुपारी ३.३० ते ४.    
इयत्ता आठवी ते दहावीचे सकाळ अधिवेशन: सकाळी ७ ते दुपारी १२ , मधली सुट्टी सकाळी ९ ते ९.३०.
शाळेचा गणवेश
१.    मुलगे: पांढरा शर्ट, फिकट निळा टाय आणि फिकट निळी पॅंट
२.    मुली: पांढरा शर्ट, फिकट निळा टाय आणि फिकट निळा स्कर्ट.
३.    मुलगे आणि मुली यांना रोजच्या रोज पांढरेशुभ्र मोजे आणि लेदरचे शूज घालणं अनिवार्य असेल.
शिकवले जाणारे विषय
विश्वकुल इंटरनॅशनल इंडिअन स्कूल ही गुरुकुल पद्धतीची मराठी माध्यमाची शाळा असल्याने गृहपाठ हा शाळेतच केला जातो. संस्कृत हा विषयही पहिलीपासूनच शिकवला जातो. शाळेत मराठी (HL), संस्कृत (HL), हिंदी (ML), इंग्रजी (LL), गणित, विज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, चित्रकला हे विषय शिकवले जातात. प्रत्येक विषयासाठी १००-१०० पानी वही करणं बंधनकारक असेल.


2.    Vishwakul International Junior College.

कॉलेजची माहिती
कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी आणि १२ वी या दोन इयत्ता आहेत. विश्वकुल इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये सर्व विषय पूर्णत: मराठी माध्यमातून शिकवले जातात. ज्यामुळे पुढे शिकताना अडचण येत नाही. कॉलेजला चार मजले असून तळमजल्यावर कॉलेजचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, लिपिक, विश्वस्त यांची कार्यालयं असून पहिल्या मजल्यावर अकरावीच्या ७ तुकड्यांच्या वर्गखोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर बारावीच्या ७ तुकड्यांच्या वर्गखोल्या आहेत. तिसऱ्या मजल्यावर स्त्री शिक्षक आणि पुरुष शिक्षक यांना स्वतंत्र शिक्षक खोल्या असून या खोल्यांत कॅटलॉग्ज, खडूची पेटी, प्रत्येक वर्गाचं स्वतंत्र डस्टर आणि शिक्षकांसाठीच्या सूचना लिहिण्यासाठी फळा अशी व्यवस्था आहे. चौथ्या मजल्यावर विज्ञान विभागासाठीच्या ८ प्रयोगशाळा आहेत. कला आणि विज्ञान या दोन विभागांचे वर्ग दोन अधिवेशनांत भरतात. कला विभाग हा सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत भरत असून विज्ञान विभाग दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत भरतो.  प्रत्येक विषयाची १००- १०० पानी वही करणं बंधनकारक आहे. कॉलेजला युनिफॉर्म नसून मुलींनी पंजाबी ड्रेस/ चुणीदार आणि मुलांनी पूर्ण पायघोळ पॅंट- शर्ट घालणं बंधनकारक आहे.

शिकवले जाणारे विषय

विश्वकुल इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये कला विभागात मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, जपानी, स्पॅनिश या भाषा तसंच समाजशास्त्रे, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, चित्रकला हे विषय पूर्णत: मराठी माध्यमातून शिकवले जातात. तसंच, विज्ञान विभागात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणिशास्त्र, जलशास्त्र आणि मृदाशास्त्र असे विषय शिकवले जातात.

  • अधिक माहितीसाठी आणि शाळा अथवा कॉलेजच्या प्रवेशअर्जाची माहिती मिळवण्यासाठी वेबसाइट:
  • www.Vishwakul2000.org ( ह्या संकेतस्थळाचा वापर कृपया करू नये. ही अधिकृत वेबसाइट नाही.)