एक सकाळ.

गुरुवार सकाळ ७. नेहमीप्रमाणे मैदानात आमची परेड चालू होती. सलामीनंतर हलकासा नाश्ता करून आम्ही जीपने नेहमीच्या राउंडअपला निघणार होतो. सीमे पलीकडची "वर्दळ" आजकाल वाढली असल्याने, आम्ही सतर्क होतो. कुठलेच चान्सेस आम्हाला घ्यायचे नव्हते. छोट्या-मोठ्या हालचालींवरही आमचे लक्ष होते. सलामी संपली आणि आम्ही कँटिनकडे नाश्त्यासाठी निघालो. मी, सुखविंदर, विनोद आमचा असा एक छानसा ग्रुप होता. गप्पा मारत-मारत, कँन्टिनपाशी पोचलो, तोच, मागून आवाज ..


ओये सुखी... तुझे और तेरे दोस्तोंको बुलाया है कॅप्टन अमरीतने ..
हा... जरा नाश्ता करके आते है .. विनोद मध्येच ..
नही .. अभी बुलाया है  चलो..


आम्ही सरळ उलट्या पावलांनी परतीला निघालो. कॅ. अमरीत .. प्रचंड शिस्तीचे. आमची नक्की काय चूक झाली असेल असा विचार डोक्यात येऊन गेला. प्रचंड भूक लागली होती. रायफ़ल डोक्यावर घेऊन चकरा मारायची अजिबात इच्छा नव्हती मला. नक्की प्रकार काय ते तिथे गेल्यावरच कळणार होता, इतक्यात ..


साला.. खानेभी नही देते .. विनोद पुटपुटला ..
तू क्या यहा हिमालयकी पिकनीकमे आया है क्या ओये ?? सुखीचा उत्तर.
ह्या दोघांची मला फार गंमत वाटायची. नेहमी भांडायचेत. आणि तरीही एकत्र !
देखते है ना जाके .. क्या बात है.. तुने कुछ कियातो नाही ? माझा प्रश्न.
विनोद - हान हान .. सब तो हम ही करते है.. बाकी सब यहा दूध के धुले है.
सुखी - हम नही.. तू .. तू करता है.. और हम भुगतते है.
आज बात कुछ और है .. मागून आवाज आला.

गपगुमान आम्ही चालू लागलो. आणि कॅ. अमरीतच्या केबीन जवळ पोचलो.

कम इनसाईड गाईज .. त्यांचा आतून आवाज आला. माझ्या छातीत धस्स झालं. एकमेकांकडे कटाक्ष टाकत आम्ही आत शिरलो..
सर !! ( सेल्युट )
कॅ - हॅव अ सीट .. वी हॅव अ सिचुएशन हिअर. १२km डाऊन द व्हॅली, देअर आर थ्री मिलिटंट्स. पक्की न्युज है. जाओगे ?
हा सर .. जरूर ..  सुखी खुष... ज्यासाठी त्याने आर्मी जॉईन केली, ती वेळ आली होती आज.
सर क्या ले आऊ ? सर .. हात... की पुरा मुर्दाही ले आऊ ? सुखीचा अजून एक प्रश्न !
कॅ - एक एक उंगली. सुखी.. तुम लीड करोगे. हिअर इज द मॅप.
ठिक है सर... - सुखी.


कॅप्टननी मग आम्हाला अख्खा प्लॅन समजावून सांगितला. एका घरात तीन अतिरेकी लपल्याची बातमी खबऱ्याकडून मिळाली होती. श्रीनगरमध्ये शाळेत बॉम्बं हल्ला करण्याची त्यांची योजना होती. आम्हाला तातडीने निघून दरीच्या पायथ्याशी असलेल्या त्या घराकडे कुच करायची होती. त्यानंतर तिथेच जवळपास लपून बसून रात्री हल्ला करायचा बेत होता. प्लॅन फ़ुल प्रुफ़ होता. आमच्या जागा, चढाई करण्याची पद्धत ह्याबद्दल आम्हाला सरांनी सर्व सूचना दिल्यात.
सो गाईज .. आय नीड फ़िंदरचिप्स फ़ॉर टुमॉरोज ब्रेकफ़ास्ट .. गुड लक ..
सर ( सेल्युट )

आम्ही बाहेर पडलो .. सुखी भयंकर खूश झाला होता ...
अब आयेगा मझा .. देख सालोंको कैसे उडाता हु !!- सुखी.
एक मै मारुंगा .. - मी म्हणालो.
हा ठिक है .. और एक इसके लिये छोड देते है .. भगा-भगाके मारेंगे !! - सुखी.
विनोद गप्प होता.


आमचा नाश्त्याचा प्लान आता बारगळला होता. आम्ही तडक आमच्या खोलीत गेलो. सर्व तयारी केली. आणि मग आवश्यक ती सामुग्री घेऊन प्रवासाला निघालो. NCC पासूनच नसती पायपीट करायची आम्हाला सवय झाली होती. १२कि.मी त्यामानाने काहीच नव्हतं. पण रस्ता सरळ नव्हता. दरीतून कोणालाही कळू न देता, गुपचूप उतरून आम्हाला त्या घरापासून काही अंतरावर, वेगवेगळ्या दिशेनं दबा धरून रात्रीपर्यंत बसायचे होते. अंधार झाल्यावर ठीक ७-४३ ला सुखी घरात घुसणार होता. मी आणि विनोद त्याला कव्हर करणार होतो. पण इतके १०-१२ तास करायचे काय ?? विनोदने सिगरेट पेटवली.


झुरका घेत म्हणाला..
ये कॅप्टन खुद क्यु नही आया ?
३ लोगोंके लिये वो क्युं आयेंगे ? - सुखी.
सुखी, ये हमारा फ़र्स्ट रीयल लाईफ़ एंकाऊन्टर है. बीना सीनीयर कुछ भी हो सकता है. - विनोद.
हा येभी बराबर है. - मी.
अरे यार... ३ लोग तो है. १० मिनिट का काम है. हम तीन बस्स है. - सुखी.
और जादा निकले तो ? - विनोद.
तो १५ मिनिट !! - सुखी.


आमची पायपीट चालू होती आणि बडबडही. थोड्याच वेळात आमच्या दिशाही बदलणार होत्या. मी डावीकडून दरीच्या दुसऱ्या टोकाला.. सुखी मागच्या बाजूला तर विनोद सुखीपासून काही अंतरावर उजव्या बाजूने चढाई करणार होता. आधी सुखीने घरात जायचे.. त्याच्या मागोमाग विनोदने आणि मी लांबून हालचालीवर लक्ष ठेवणार होतो. कुणी बाहेर आलाच तर त्यासाठी मी तयार राहणार होतो.


चलो .. अब ७-४३ को मिलते है - सुखी.
सुखी अपना ध्यान रख.. - विनोद.
विनोद .. तू भी ... - मी.
मेरी चिंता मत करो यार ... अपना-अपना ध्यान रखो. - सुखी.
आम्ही एकमेकांना मिठ्या मारल्या आणि आपापल्या तळाशी जायला निघालो.


आता मी एकटाच होतो. ३ वाजले होते. दरी उतरून एखादी योग्य जागा शोधून उरलेला वेळ तिथे गप्प बसून काढायचा होता. मी ही एक सिगरेट पेटवली आणि चालू लागलो. थोडाच वेळात मला ते घर दिसू लागले. मी ही सावध होत, जवळच्याच उंचवठ्याच्या मागच्या झुडपांजवळ शांतपणे, कुणाला दिसणार नाही असा लपून बसलो.


एव्हाना सुखी आणि विनोदही आपापल्या जागी पोचले असावेत. मला त्यांची काळजी वाटू लागली होती. सुखीच्या घरी त्याच्या आई शिवाय कोणीच नव्हतं. तिला तसं घरी एकटंच सोडून हा पठ्ठ्या कसा काय आर्मीत आला देव जाणे. विनोदच्या घरी निदान मोठा भाऊ तरी आहे. मलाही आता घरची आठवण येऊ लागली. मन सुन्न झालं होतं. पडल्यापडल्या मी माझी एके-४७ कुरवाळत होतो. हळूहळू अंधार पडू लागला होता. माझ्या तळहाताला भर थंडीत घाम फुटला होता. ट्रेनिंगमध्ये गोळ्या चालविणे वेगळे आणि आजचा प्रसंग वेगळा. इतरांच्या शौर्यकथा ऐकताना.. ह्यात काय इतकं मोठं ? असं मला नेहमी वाटायचं.. पण आता ...


७ वाजले होते. मी घड्याळाकडे पाहिलं .. एक मिनिट डोळे मिटले... माझे आई-वडील ... मित्र ... सगळेच माझ्या डोळ्यासमोर मला दिसू लागलेत. मी चटकन डोळे उघडलेत ! आता माझं लक्ष समोरच्या घराकडे आणि घड्याळाकडे होतं. घरातील लुकलुकता दिवा मला दिसतं होता. पण आश्चर्य म्हणजे.. इतक्या वेळात.. त्या घरात मला कीहीही हालचाल दिसली नव्हती. तिथे कोणीच नसावे .. आणि आपण सुखरूप परत जावे .. अशी मनातल्या मनात कल्पना येऊन गेली.


७-४३ झाले. मागच्याच बाजूला, दबक्याच पाउलांनी येणाऱ्या सुखीची पुसटशी आकृती मला दिसू लागली. माझा हात ४७वर घट्ट आवळला. आणि बोट ट्रिगरवर थांबले. दूरूनच झाडा मागे .. विनोदही दिसला. मीही पूर्णपणे सावध झालो. सुखी प्लॅनप्रमाणे आडोशातून बाहेर आला. आणि दारावर .. एकच लाथ मारून... दार तोडून आत शिरला. दुसऱ्याच दिशेला ... विनोदही धावून आला.


एक मिनिट संपूर्ण शांतता पसरली. माझी कल्पना बहुतेक खरी ठरली. घरात कोणीच नव्हते. सुखी घरात शिरला होता. त्याला काहीच प्रतिकार झाला नव्हता. विनोदही दारापाशी पोचला होता. माझा ताण थोडा कमी झाला. दोघेही ठीकठाक आहेत हे पाहून मला आनंद झाला. मी ही उठून तिथे जाणार ... तितक्यात ... मला फ़ायरिंगचा आवाज आला... आणि... दारापाशी उभा असलेला विनोद क्षणार्धात खाली कोसळला....


विनोद ..... मी जोरात ओरडलो ...
मयुरेश ... भाग !!!!!! सुखी जोरात ओरडला....


मला काहीही कळेना. . नक्की काय चालू आहे ??? मी ज्या दिशेने गोळी आली त्यादिशेने बंदूक रोखली. पण माझं लक्ष सुखीकडे होते. त्यानेही घरात मिळेल तो आडोसा धरला होता. पण नक्की कोणाला काय करणार ? आम्हाला काहीच दिसतं नव्हते. सुखीने प्रसंगावधान राखून ... घरातील दिवा विझवला. आता मला सुखीही दिसेनासा झाला. अचानक ... गोळीबार सुरू झाला.  बहुतेक .. सुखीला कोणीतरी दिसले असावे. मला मात्र काहीच दिसत नव्हते. मी उठून घराच्या दिशेने जायचा निर्णय घेतला. इतक्यात... घराच्या डावीकडून २-३ जणांना सुखीने यमसदनी धाडले. गोळीबार थांबला. मी न हलता तिथेच थांबायचा निर्णय घेतला. मला सुखीचे कौतुक वाटत होते .. पण विनोद ...


इतक्यात  मला घराच्या उजवीकडे काही तरी हालताना दिसले... माझी बंदूक आता तिथे वळली होती. घराच्या मागच्या बाजूला काहीतरी हालल्यासारखे दिसले... मी नीट पाहतो तर !! शत्रूची ४-५ माणसे ... घराकडे सरकत होती. सुखी ... वी आर ट्राप्ड !! मी जोरात ओरडलो... आणि मी गोळीबार सुरु केला. त्याच क्षणी माझ्या दिशेने.. गोळ्यांचा वर्षाव झाला ... मी उंचवठयावरून खाली उडी मारली आणि आडोशाने घराच्या दिशेनं धाव घेतली. सुखीला चारी बाजूने वेढल्याची कल्पना मला सहन होण्या पलीकडे होती. मी पुन्हा थोडा वर चठलो आणि घराच्या दिशेने नजर टाकली. शत्रूवर मागून हल्ला करावा ह्या विचाराने .. मी लांबून वळसा घेत घराच्या मागच्या बाजूला जायच्या प्रयत्नात होतो. मी वर चढलो आणि पुन्हा शत्रूच्या दिशेने गोळीबार सुरू केला. इतक्यात घरावर ५-६ ग्रेनाईड फेकण्यात आलेत. एका मागोमागे एक ५-६ विस्फ़ोट ! सुखी संपला होता. आता फक्त मी ... शेवटचा ...


नक्की किती शत्रू आहेत ह्याची मला कल्पना नव्हती. दगा झाला होता. खबऱ्याने चुकीची .. नाही.... मुद्दाम चुकीची माहिती दिली होती का ? त्यांचे टारगेट नक्की कोण होते ?? आम्ही ?? इतक्यात मला विनोदचे वाक्य आठवले ... ये कॅप्टन खुद क्यो नाही आया ??


मला काहीच सुचेना !! मी नुसताच धावत सुटलो होतो... नक्की कोणत्या दिशेला हे ही आता मला कळत नव्हते... इतक्यात ठेच लागून मी खाली पडलो... उधर ... उधर ... असे कोणी तरी ओरडलेले मला ऐकू आले.. उसे जिन्दा पकडो... हे ऐकताच माझ्या हृदयाचा ठोका चुकला... मला जिवंत पकडून ह्यांना नक्की काय करायचे आहे ?? मी सरळ आवाजाच्या दिशेने गोळीबार सुरू केला... पण काहीच उत्तर नाही. मला कोणीच दिसत नव्हते. मी पुन्हा पळायला सुरुवात केली. मागून कोणाच्या तरी येण्याचा आवाज आता मला स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यातच मला पुढे लपण्यासाठी एक जागा दिसली. मी तिथे लपलो.


आता मला काहीही दिसत नव्हते. बंदुकीवरचा हात थरथरत होता. संपूर्ण शरीर घामाने भिजलेलं ... घशाला कोरड पडली होती. विनोद आणि सुखीचा डोळ्यांनी पाहिलेला शेवट .... छाती धडधडत होती...
यही होगा वो ...
बाहेरून आवाज आला.  मी आडोशातून बाहेर पाहिले.... एक नाही.. दोन नाही... जवळपास डझनभर माणसे होती.
उसने गोली चलाई तो भुंदके रखदेना ... - कोणी तरी ...
सरजी... एक ग्रेनेड ? आपने आप बाहर आ जायेगा...
ठिक है... दुर हटो सब ... इन्शा अल्लाह ... जिंदा मिले तो अच्छा है ... फ़ेक ...

मी डोळे घट्ट मिटलेत ... श्वास रोखून धरला .. आता पुढे काय ?? आडोशातून बाहेर पडून स्वैरपणे गोळीबार करायचा की इथेच लपून राहायचे आणि मरणाची वाट पाहायची ? माझी मूठ घट्ट आवळली गेली. ह्यापुढे जे काही होणार होते... ते पाहण्याची-अनुभवण्याची माझी ताकद संपली होती. मी ताडकन डोळे उघडलेत ... बेडवरून उठलो आणि तडक .. बाथरुमकडे चालता झालो... लाइट लावला .... तोंडावर पाणी मारलं .... आरशात स्वतःकडे पहात बसलो.. स्वप्न संपलं होत ... नाही .. मी संपवलं होतं. ह्यापुढे... saving private ryan पुन्हा पाहायचा नाही असं मनाशी ठरवलं.. आणि दिवाणखान्यात जाऊन टीव्ही लावला .. "काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना भारताचे ३ जवान शहीद" अशी बातमी दिसली. मी टीव्ही बंद केला. सिगरेट पेटवली .. आणि विचार करत बसलो... हे सर्व कशासाठी ??


मयुरेश वैद्य.