गझल
वृत्त: वीरलक्ष्मी
लगावली: गालगा/गालगा/गालगा
रोज आयुष्य वाटे नवे!
रोज इच्छा नवी पालवे!!
जिंदगीलाच मी सांगतो....
हे नको, हे हवे....ते हवे!
व्यर्थ गीता इथे वाचणे!
खानदानी इथे गाढवे!!
सूर्य गेला ढगाआड की,
भाव खाती किती काजवे!
या न गझला अरे, माझिया......
चेतनांचेच हे ताटवे!
एकतारी उरी वाजते!
वेदनांचेच हे पारवे!!
या मनाच्या तरूवर किती......
पाखरांचे स्मृतींच्या थवे!
काल तो एकटा चालला......
आज दिसती किती कारवे!
ऊब साथीस माझ्या, तुझी!
सोसले कैक मी गारवे!!
भाट सारे पळाले कुठे?
पाठ त्याचीच तो खाजवे!
आर्तता और आहे तुझी!
ऐकले मी किती मारवे!!
काय वाचाळ आहे हवा!
आणते कैक ती बोलवे!!
गच्च भरले मनाचे धरण!
भावनांचे उघड सांडवे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१