शिवेन एकेक स्वप्न आतून फाटलेले!

गझल
वृत्त: बहर-ए-रजज़ मुसद्दस मख़्बून मरफ़ल
संस्कृतात व मराठीत या लगावलीला नाव नाही.
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
************************************************

शिवेन एकेक स्वप्न आतून फाटलेले!
जगेन आयुष्य मी अता हे झपाटलेले!!

अरे, कशाची कुलूप-किल्ली? न दार साधे!
नका विचारू, कुणी, कुणी, काय लाटलेले!!

जणू न हे पंख, याच पायांमधील बेड्या.....
स्वत:हुनी पंख मी स्वत:चेच छाटलेले!

कधी मिळाली उसंत डोळ्यांस बरसण्याची?
सदैव डोळ्यांत व्योम नुसतेच दाटलेले!

अवर्षणाची किती समस्या खरेच मोठी!
झरेच हृदयांमधील संपूर्ण आटलेले!!

स्वधर्म कुठला? कुणापुढे फोडतोस डोके?
मुळात येथील लोक जात्याच बाटलेले!

किती तरी जाहलीत वर्षे न हासलो मी!
कधी तरी मी जगास पेढेच वाटलेले!!

खरेच झालीत स्वस्त स्वप्नेच माणसांची!
दुकान दिसते हरेक रस्त्यात थाटलेले!!

अजूनही त्या स्मृतींमुळे ही तनू शहारे!
किती हलाकीत पूर्ण तारुण्य काटलेले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१