गझल
वृत्त: मंदाकिनी
लगावली: गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा
************************************************
ज्याला हवे ते, तो लिही, कागद जणू आखीव मी!
कोणी म्हणे नेणीव मी, कोणी म्हणे जाणीव मी!!
डोळ्यामधे भरतो कधी! डोळ्यावरी येतो कधी!
माझे मला कळते कुठे, इतका कसा कोरीव मी!!
ज्याला हवे त्याने तसे सोयीप्रमाणे कापले.....
आरास त्यांची जाहली, होतो किती घोटीव मी!
आता दिसाया लागलो मी व्यंगचित्रासारखा!
होता गुन्हा माझा...नको तितका कसा रेखीव मी!!
होते सुबक कारण किती, टाळायला त्यांना मला!
प्रत्येक मैफीलीमधे होतो सदा राखीव मी!!
या जीवनावर अन् जगावर प्रेम होते त्यामुळे.....
रागावलो कोणावरी, केली कुणाची कीव मी!
हा डौल माझा वेगळा, ही ऐट माझी वेगळी!
त्यांच्यामधे बसणार नाही, केवढा कातीव मी!!
एकाच या गोष्टीमुळे तगलो इथे दुनियेमधे!
दुनियेस जैसे पाहिजे, झालो तसा बांधीव मी!!
होता कुठे लेखी पुरावा थोरवीचा माझिया?
साक्षात दंतकथेपरी होतो म्हणे ऐकीव मी!
हा काय माझा दोष आहे? की, उफाड्याचाच मी!
पडलो किती बाजूस एका, वाटतो वाढीव मी!!
खाली पडू नाही दिला मी शब्द दुनियेचा कधी!
दुनियेस वाटू लागलो आहे अता पाळीव मी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१