भांडार हुंदक्यांचे....!

भांडार हुंदक्यांचे....!
ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी
धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी
संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी
वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी
होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी
जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी
खस्ताच जीवनाचा पाया रचून गेल्या
आयुष्य ठोस केले पिळदार आसवांनी
अश्रू कठोर-जिद्दी होताच निग्रहाने
भिरकावली निराशा तडिपार आसवांनी
बाबा तुझ्या स्मृतींचा केला पुन्हा उजाळा
फोडून हुंदक्यांचे भांडार आसवांनी
जे द्यायचे ते दे, जादा नकोच काही
छळणे नकोच नशिबा हळुवार आसवांनी
जा सांग 'अभय' त्याला की त्याग आत्मग्लानी
बरसून दे म्हणावे अंगार आसवांनी
                                         - गंगाधर मुटे
-------------------------------------------------