व्यवहारज्ञान (३)

आता मी माझ्या चौकशीचा रोख परत एकदा 'मेरी हिल' कडे वळवला.  

मेरी हिल ही त्या हॉटेल मध्ये चेंबर मेड म्हणून अनेक वर्षे नोकरी करत होती. मिसेस ऱ्होडस ला जिवंत पाहणारी बहुदा खुनी व्यतिरिक्त, तिच शेवटची व्यक्ती असावी.  मी तिला प्रश्न विचारता त्या दिवशी काय काय घडले याचे सविस्तर र्णन करण्यास सांगितले.
मेरी हिल ही क्राऊन हॉटेल ची एक कर्मचारी, चेंबर मेड आहे. ती त्या दिवशी नेहमीप्रमाणे मिसेस ऱ्होडसच्या खोलीत तिला लागणाऱ्या गरम पाण्याच्या बॉटल्स ठेवण्यासाठी गेली होती. खोलीकडे जाताना तिने लाउंजमध्ये बसलेले चौघेजण पाहिले होते, तसेच रुमच्या बाहेर काम करणारा इलेक्ट्रिशियन सुद्धा तिने पाहिला होता. तिने पाहिले की मि. ऱ्होडस हे त्यांच्या खोलीतील मेजाजवळ बसून काही लिहीत होते. ती मिसेस ऱ्होडस च्या खोलीत आली, तेव्हा मिसेस ऱ्होडस झोपायच्या तयारीतच होती. नव्हे जवळ जवळ झोपलीच होती. तिचे डोळे मिटत होते. मेरी ला वाटले बहुदा तिने झोपेचे औषध घेतले असावे. मिसेस ऱ्होडस ही स्वतःच्या प्रकृतीची अवास्तव काळजी घेणारी स्त्री होती. त्यामुळे तिला नेहमी वेगवेगळी औषधे घ्यायची असत. तसेच ती नेहमी लवकरच झोपी जात असे. त्या मुळे  तिला मेरी हिल आल्याची कसलीच चाहूल लागली नसावी. मेरीने गरम पाण्याच्या बाटल्या मिसेस ऱ्होडसच्या बिछान्याजवळील मेजावर ठेवल्या आणि ती निघून आली. आणि त्यानंतर तिला तिच्या खुनाचीच बातमी समजली होती. तिच्या दृष्टीने ती खोलीत गेली असताना तिथे तिला काहीच संशयास्पद दिसल्याचे स्मरत नव्हते.  
मेरी हिलने दिलेल्या या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. पण कुठलाही मुद्दा दुर्लक्षित ठेवून चालणार नव्हता.  
त्यानंतर मी मि. ऱ्होडसला त्या दिवशीचा घटनाक्रम वर्णन करण्यास सांगितले.  
मि ऱ्होडस ला रात्री उशीरापर्यंत लिहीत बसण्याची सवय होती. तो जे पुस्तक लिहीत होता त्यासाठी त्याला अनेक संदर्भ तपासावे लागत. खूपच लक्षपूर्वक काम करावे लागे. त्यामुळे लिहीत असताना त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल तो फारसा जागरूक नसे. पण एक नक्की, तो लिहीत असताना त्याच्या खोलीचे दार उघडेच होते. आणि गरम पाण्याच्या बाटल्यांचा ट्रे घेऊन जाणारी चेंबर मेड त्याने पाहिली होती. नंतर थोड्याच वेळात तिच मेड परत जातानापण त्याने पाहिले. रात्री जवळ जवळ ११ वाजल्या नंतर त्याने आपले लिखाण बंद केले. आपल्या बिछान्याकडे जाण्यापूर्वी मिसेस ऱ्होडस च्या खोलीत तो आला. काही बोलण्यासाठी त्याने तिच्याकडे पाहिले तर मिसेस ऱ्होडसचा मृत्यू झालेला होता. कदाचित तासाभरापूर्वीच. तिचा बिछाना रक्ताने भरलेला होता.होता.नंतर त्याला पोलीसांकडून कळले, तिचा मृत्यू पोटात धारदार चाकू खुपसल्यामुळे झालेला होता. तो चाकू मिसेस ऱ्होडसचाच होता. त्याचा वापर ती पेपरकटर म्हणून करत असे, आणि जो नेहमीच तिच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला असे. तिच्या खोलीतील साऱ्या वस्तू जशाच्या तशा होत्या. म्हणजे चोरीचा वगैरे प्रयत्न झालेला दिसत नव्हता. खोलीचे पलीकडील भागात उघडणारे दार आतून बंद होते आणि खिडकीसुद्धा. नंतरच्या पोलीस तपासणीत त्या चाकूच्या हॅंडलवर हातांचे ठसे नव्हते. खुनी व्यक्तीने अत्यंत कल्पकतेने आणि सफाईने काम केले होते.  
मि. ऱ्होडस आणि मेरी हिल च्या सांगण्यात संगती तर लागत होती, त्यामुळे त्या दोघांपैकी कुणी खोटे बोलत असावे असे वाटत नव्हते. शेजारील खोलीत असून मि. ऱ्होडसला कसलाही आवाज आला नव्हता, याचे स्पष्टीकरण मेरीच्या जबानीत मिळू शकत होते. कारण मेरी ने सांगितले होते, ती जेव्हा खोलीत गेली तेव्हा मिसेस ऱ्होडस ग्लानीतच होती, त्यामुळे खुन्याला तिने कसलाही प्रतिकार केला नसणे शक्य होते.  
पण मला कळत नव्हते की मग खुनी आला कुठून? आणि गेला कुठे? 
 सगळे परिस्थितीजन्य पुरावे मि. ऱ्होडस कडेच खुनी म्हणून बोट दाखवीत होती. पण मि. पथेरिकला खात्री होती तो निर्दोष असण्याची, आणि मला माझ्या या जुन्या मित्रावर अविश्वास दाखवायचा नव्हता.  
मी माझ्या घरातील बैठकीच्या खोलीत विचार करत बसले होते. सरळ साधी वाटणारी केस चांगलीच गुंतागुंतीची झाली होती.  
इतक्या ग्वेन.. माझी मेड आली. मि. पथेरिक आणि मि. ऱ्होडस आल्याचे तिने मला सांगितले. ती त्यांना बैठकीच्या खोलीकडे आण्यासाठी दाराकडे निघाली होती, इतक्या ते दोघे तिथे आले. मि. ऱ्होडस चा चेहरा चांगलाच चिंताग्रस्त दिसत होता. मला त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती वाटली.  
दोघेजण सोफ्यावर बसल्यावर मि. पथेरिकने सांगितले,मी  विचारलेली माहिती मिळाली आहे.  
क्राऊन हॉटेल मध्ये दोघी एकेकट्या राहणाऱ्या स्त्रिया आहेत. त्यातील एक साधारण पन्नाशीची असून तिचे नाव मिसेस ग्रॅनबी असे होते. ती एक अँग्लो इंडियन स्त्री होती. तिचे कपडे काहीसे भडक आणि तिथेच मिळणाऱ्या सिल्कच्या कापडाचे असत. ती नेहमी केसांचा विग वापरीत असे.
आणि दुसरीचे नाव मिस. कॅरथर्स. ती साधारण चाळीस वर्षे वयाची असावी. तिचे स्कर्टस आणि कोट नेहमीच्या बायकी रंगसंगतीचे नसत. तिची आवड काहीशी पुरूषी असावी. आणि तिचे केसही पुरूषांप्रमाणे अगदी बारीक कापलेले होते. तिची एक सवय फारच विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती म्हणजे, तिच्या हातातील वस्तू सतत खाली पडणे. काहीवेळा ती ते मुद्दाम तर करत नाही ना? असा संशय येई.  
मिळालेली माहिती मी नीट समजून घेत होते. परत एकदा साऱ्या माहितीची मी उजळणी केली आणि शेवटी माझे मत पक्के झाले.  
"माझ्या मते मिसेस ग्रॅनबी किंवा मिस.  कॅरथर्स या दोघींपैकी कुणी एकीने खून केला असावा. " मी सांगितले.  
ते दोघेजण आश्चर्याने बघत होते.  
"कशावरून? " मि. ऱ्होडसने विचारले. त्या दोघींना मी किंवा माझी पत्नी ओळखत देखील नाही. आणि या दोघींपैकी कुणालाच मी तिच्या खोलीत जाताना किंवा येताना पाहिले नाही. " मि. ऱ्होडस म्हणाला.  
"तू पाहिलेस मि. ऱ्होडस, नक्कीच पाहिलेस. मला सांग, आत्ता तुम्ही दोघे आलात तेव्हा दार कुणी उघडले? " मी विचारले.
"कुणी म्हणजे? अर्थातच तुमच्या मेडने. " ऱ्होडस म्हणाला.
"तिचे वर्णन करता येईल तुला? " मी   म्हणाले.
"हो! का नाही. साधारण उंचीची आणि लाल केसांची आहे ती. "ऱ्होडस उत्तरला.
"पण तू अगदीच सर्वसामान्य वर्णन केलंस. अशा वर्णनाच्या या पंचक्रोशीत कितीतरी मुली असतील. नेमके वर्णन कर. तिचे डोळे कसे आहेत? निळे की तपकिरी? नाक सरळ आहे की अपरे? दात सरळ ओळीत आहे की वेडेवाकडे, किंवा पुढे आलेले? " माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीने तो चांगलाच गांगरून गेला.
"मिस मार्पल, क्षमा करा पण मी इतके नीटपणे तिच्याकडे लक्ष नाही दिले. सध्या माझी मनः स्थिती ठीक नाहीये... " मी ऱ्होडसला हातानेच थांबण्याची खूण केली. इतके स्पष्टीकरण देण्याचे कारण नाही. तुझी काहीच चूक नाहीये. त्या दिवशी नेमके असेच घडले असावे. म्हणजे तू लिहिण्यात मग्न होतास. त्यावेळी तू चेंबर मेड आलेली पाहिलीस. पण मला खात्री आहे तू तिचा चेहरा नाही तर फक्त कपडे पाहिलेस. एक युनिफॉर्म घातलेली स्त्री तू खोलीत जाताना पाहिलीस, आणि तसाच युनिफॉर्म घातलेली मेड परत जाताना पाहिलीस. पण त्या दोघी वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. "  माझा निष्कर्ष ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर फारच मजेशीर भाव दिसत होते. ऱ्होडस तर उघड उघड अविश्वासाने माझ्याकडे बघत होता. आणि मि. पथेरिक चांगलेच गोंधळलेले दिसत होते.  
मग मी त्यांना माझ्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली.  
त्या दिवशी काय घडले असावे मी सांगते. मिसेस ऱ्होडसच्या खोलीत गरम पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी मेरी हिल गेली, आणि ती दुसरे दार उघडून पलीकडच्या भागात निघून गेली. तिला तसे सांगितलेले असावे. थोड्याफार पैशासाठी ती हे काम करण्यास तयार झाली असावी. ती गेल्यावर त्याच दाराने दुसरी मेड, म्हणजे मेड चा युनिफॉर्म घातलेली स्त्री आली. मिसेस ऱ्होडस झोपेतच होती. त्यामुळे तिने कसलाच प्रतिकार केला नाही. त्या स्त्रीने तो चाकू स्वच्छ पुसून परत होता तसा ठेवला. ती ज्या दाराने आत आली होती ते बंद करून कुलुप लावले, आणि पुढच्या म्हणजे लाउंजच्या बाजूच्या दाराने बाहेर आली. तू पाहिलेस तसेच इतरांनीही तिला पाहिले. तिने परिधान केलेला युनिफॉर्म बघून तुला वाटले की आधी आत गेलेलीच मेड परत आली आहे. हा मानवी स्वभावच  आहे. एखादी संदर तरूणी जात असेल, तर निदान काही पुरूष तिच्याकडे निरखून बघतील. परंतु एक सर्वसामान्य, मध्यमवयीन स्त्रीकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही. तुझ्याप्रमाणेच तो इलेक्ट्रीशियन आणि लाउंजमध्ये बसलेले चौघेजण यांनीही त्या मेड ला पाहिले, म्हणजे तिचे कपडे, केस या साधारण ढोबळ गोष्टी पाहिल्या. कुणाचेच लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले नाही. फारच कल्पकतेने तिने ही योजना आखली असावी. त्या साठी तिने तुझा आणि मिसेस ऱ्होडस चा बराच पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. तुम्हा दोघांच्या सवयी, तुमचे वेळापत्रक सारं काही. " बोलता बोलता श्वास घेण्यासाठी मी काही काळ थांबले. त्याचा फायदा घेत ऱ्होडसने विचारले,
"पण का? आम्ही काय केले म्हणून ती आमच्या मागे होती? "
आता मला देखिल ऱ्होडस निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला होता. माझ्या जुन्या स्नेह्याच्या, मि. पथेरिकच्या समंजसपणाचा मला अभिमान वाटला. सर्व विरूद्ध पुरावे असताना देखिल तो मि. ऱ्होडसच्या बाजूने ठाम उभा राहिला होता. मी त्यांच्याकडे बघ स्मित केले आणि म्हणाले,
"तू काहीच नाही केलेस. पण तुझ्या पत्नीला येत असलेली पत्रे दुर्दैवाने खरी होती. तुझा, किंवा माझाही तिच्या कथेवर विश्वास बसला नाही. अर्थात मी ही तुझी चूक मानणार नाही. लांडगा आला रे आला च्या कथेतील गुराखी पोरासारखी तुझ्या पत्नीची अवस्था झाली होती. ती सत्य सांगत होती, आणि तुला तिचा तो नेहमीचाच कल्पनाविलास वाटला. आणि दुर्दैवाने तिचा असा अंत झाला. "
आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यात चेहरा झाकून ऱ्होडस काही काळ शांत बसलेला होता. मग हलकेच चेहऱ्यावरील हात काढत म्हणाला,
"कोण असेल ती? " विचारताना त्याचा आवाज थरथरत होता.
"मिसेस ग्रॅनबी किंवा मिस. कॅरथर्स " मी आत्मविश्वासाने म्हणाले.
"पण ते कसे शक्य आहे, मिसेस ग्रॅनबीचे केस खूपच वेगळे आणि रंगवलेले आहेत, आणि मिस कॅरथर्स  चे अगदीच बारीक कापलेले. कपडे जरी तेच असले तरी केसातील वेगळेपण जाणवण्याइतके आहे नक्कीच.. " ऱ्होडस म्हणाला.
"तरीही माझे तेच मत आहे. कारण मिसेस ग्रॅनबी विग वापरत असते, हे तुमच्याच माहितीत सांगितले आहे. तिला मेरी हिल च्या केसांसारखा विग लावणे काहीच अशक्य नाही. आणि तेच मिस कॅरथर्स  बद्दल. तिचे केस बारीक कापलेले असल्याने तिला देखिल विग लावणे अगदीच सोपे आहे. मेरी हिल ला पैसे देऊन कपडे मिळविणे, आणि खोलीचे दार उघडे ठेवणे सहज शक्य होते. त्या स्त्रीने आपला सूड घेतलाच. पत्रे बालिश पद्धतीने लिहिली असली तरी तिने आखलेली योजना चांगलीच कल्पक होती. आता हेच बघ ना, तुम्हा दोघांचाही अजून विश्वास बसत नाही. पण काही हरकत नाही. तुम्ही पोलीस तपासणी अधिकाऱ्याला हे सर्व सांगा.. यातून सत्य बाहेर येईलच. " मी म्हणाले.  

आपली हॅट डोक्यावर चढवत, चालण्यासाठी वापरत असलेली छडी हातात घेत, मि. पॅथरिक जागेवरून उठले. उठता उठता मि. ऱ्होडस कडे बघत म्हणाले, "बघ माझा अनुभव बरोबर होता ना. नुसते विषयाचे ज्ञान असणे पुरेसे नाही, तर त्या जोडीला ते ज्ञान वापरायचे तारतम्य, आणि व्यवहारज्ञान देखिल हवे. निरीक्षण, अनुभव आणि त्याचे विश्लेशण करणारी बुद्धी हे समस्या सोडविण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक आहेत. " मि. ऱ्होडसला ते पूर्णपणे पटले होते. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसत होती. 
"धन्यवाद मिस. मार्पल, मला खात्री होतीच, की तुम्ही माझ्या या मित्राला जरूर मदत कराल. आता फक्त शेवटचे एक सांगा, तुमच्यामते दोघींपैकी कोण असावी? त्याने विचारले.
या प्रश्नाचा मी देखिल विचार केलाच होता. "मिस.कॅरथर्स " मी वेळ न घालवता उत्तर दिले.  
"कशावरून? " मि पथेरिकने उत्सुकतेने विचारले.  
"मिस. कॅरथर्स हिचे वागणे खूपच विचित्र होते असे हॉटेल मधील साऱ्यांचे म्हणणे आहे. पण तिचा संशय येण्याचे ते कारण नाही.  तिचे वागणे काहीवेळा मुद्दाम वाटेल असेच असे. म्हणजे लोकांच्या मनात स्वतःचा वेंधळेपणा ठसावा असेच तिचे वागणे होते. पण त्यातील कृत्रिमपण सर्वांनाच जाणवलेला होता. आपण आहोत, त्या पेक्षा वेगळे दर्शविण्याचे तिला दुसरे काय कारण असणार? तिच्यासारखी वेंधळी स्त्री अशी योजनाबद्ध पद्धतीने, सफाईने एखादा खून करेल असे कुणालाच वाटणार नाही ." 

जोन आणि रेमंड या कथेमध्ये चांगलेच गुंतले होते. रेमंडच्या चेहऱ्यावर आपल्या आत्याविषयी अभिमान स्पष्ट दिसत होता.  
"मग पुढे काय झाले? तुमचा अंदाज बरोबर होता का? " जोन ने विचारले
"अर्थात, असणारच" काहीशा नाराजीने त्याच्याकडे बघत रेमंड म्हणाला.
"हो, अगदी तंतोतंत.. ", मिस मार्पल म्हणाली. "मिस. कॅरथर्स , म्हणजेच त्या मुलाची आई. सूड भावनेने पेटलेली स्त्री, मग एरवी ती सर्वसामान्य का असेना?   किती घातक असते ते तुमच्या लक्षात येईल. तिने अनेक वर्षे मिसेस ऱ्होडस चा पाठलाग केला. पत्रे पाठवून तिला मानसिकरीत्या कमकुवत केले, आणि संधी मिळताच मोठ्या सफाईने तिचा खून केला. मला समाधान याचच आहे की ऱ्होडस सारख्या सज्जन माणसाला मी खुनाच्या अरोपाखाली बळी जाऊ दिले नाही. आता तो सुखात आहे. त्याने त्याला शोभेल अशा शहाण्या, समजूतदार मुलीबरोबर विवाह केला आहे. त्यांच्या घरी एक नवीन लहानगा पाहुणा आला आहे. आणि माहिती आहे ?  मि. ऱ्होडस चा चांगुलपणा म्हणजे त्याने मला त्याच्या मुलाची गॉडमदर होण्याची विनंती केली, जी अर्थातच मी मान्य केली. " 
मिस मार्पलचे बोलणे संपूनदेखील रेमंड आणि जोन काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत मग मिस मार्पल गमतीने म्हणाली, "मला आशा आहे की माझी कथा तुम्हाला फार कंटाळवाणी वाटली नसावी. "
"नाही, अजिबात नाही" जोन आणि रेमंड ने एकसुरात उत्तर दिले.  
(समाप्त)
(ऍगाथा ख्रिस्ती यांच्या "मिस मार्पल टेलस अ स्टोरी" या कथेचे मराठी रुपांतर. )