नको आणखी त्या सुखाची उधारी
कधीचीच सरली मनाची उभारी
मला फसविले माणसांनीच साऱ्या
न देवात होती कुणा ती हुशारी
चिरंजीव होणे मला भाग आहे
न मारेकरी कोण घेई सुपारी
जगाने पुन्हा गाळले नांव माझे
म्हणे संपली काल खानेसुमारी
तिची नाव टाळून गेली किनारा
उभी रात्र होतो उभा मी किनारी
-------- जयन्ता५२