शब्दबेवडा

शब्दबेवडा
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!
ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! लंकेमध्ये रमून गेलो!!
अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो
तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली 
तरी निसर्गा! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो?
विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो
देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी
दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो
                                                       - गंगाधर मुटे
-------------------------------------------