घिसाडकामाचे दिवस

          पुणे आणि अमेरिका या दोन्ही  स्थानात एक मोठे साम्य आहे.ते म्हणजे तेथे जाण्यापूर्वी जाणारे लोक या स्थानांना शिव्या देत असतात पण तिकडे जाण्यासाठी मात्र त्यांचा जीव कासावीस झालेला असतो. त्यामुळे अमेरिकेत जसे मूळ अमेरिकनांचाच पत्ता नाही तसाच पुण्यातही.   अस्सल पुणेकर आता एकमेव पुण्य़भूषण सुधीर गाडगीळ यांच्याव्यतिरिक्त कोणी राहिले असेल असे वाटत नाही.तरीही पुणेरी संस्थांचा अभिमान अस्सल पुणेकरांइतकाच आता बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या  या पुणेकरांनाही तितकाच असतो. काही पुणेरी संस्थाच आता नामशेष होत आहेत त्यात पुणेरी टांगेवाला,पुणेरी भामटा(सुद्धा),पुणेरी जोडा ,पुणेरी पगडी यांचा समावेश होतो. तरी अजून पुणेरी पाट्या विशेषत: "आमची कोठेही शाखा नाही "अभिमानाने मिरवतच असतात.
        पण पुणेरी काहीही म्हटले की पुणेकराची छाती जी अभिमानाने भरून येते त्यात सी.ओ.ई.पी.चा म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याचा समावेश व्हायलाच हवा.उगीच नाही त्याचं नाव P.I.E.T. असं बदलायला निघाल्यावर सगळ्या पुणेकरांनी विशेषत: त्या कॉलेजच्या आजी व विशेषत: माजी  विद्यार्थ्यांनी काव काव करून ते नाव कायम ठेवायला लावलं.सी.ओ.ई.पी.चा विद्यार्थी असल्याचा अभिमान प्रत्येक विद्यार्थ्याला असतोच. अर्थात तो मलाही आहे अगदी मी अमेरिकेत भाच्याच्या मुलीच्या बारश्याला गेलो तेव्हां भेटलेले गोखले हे गृहस्थ आपल्या घरात तीन पिढ्या म्हणजे ते स्वत:,त्यांचे वडील व आता माझ्या भाच्याबरोबरचा त्यांचा मुलगा हे सर्व सी.ओ.ई.पी.चे विद्यार्थी आहेत हे अभिमानाने सांगत होते.त्याना मी भेटल्यावर तर त्यांचा आनंद इतका उचंबळून आला की काही  विचारायलाच नको
      खरं तर हे मूळ कॉलेज म्हणून स्थापन झालेच नव्हते. इमारती,धरणे,कालवे रेलवेज अशी सार्वजनिक बांधकामे करणाऱ्या दुय्यम अधिकाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी जुलै १८५७ मध्ये पूना इन्जिनिअरिंग क्लास अंड मेकॅनिकल स्कूल या नावाची एक संस्था इंग्रज अमदानीत सुरू करण्यात आली व हेन्री कोकवर त्या संस्थेची धुरा सोपवण्यात आली.इंग्रजीवर प्रभुत्व व गणिताचे जुजबी ज्ञान एवढीच काय ती प्रवेश पात्रता लागत होती.ज्या उमेदवारांना प्रवेश हवा असे, त्यानी जवळच्या शासकीय इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापकाकडे अर्ज देणे आवश्यक असे.त्याला सोयिस्कर असे अश्या दिवशी तो मुख्याध्यापक त्यांची प्रवेशपरीक्षा घेई व उत्तरपत्रिका हेन्री कोककडे जात.त्यांची तपासणी करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी त्या मुख्याध्यापकांना कोक देई सहा महिन्यानंतर.त्यातील योग्य वाटणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांना दरमहा ६ रु.ची शिष्यवृत्तीही देण्यात येई. शिक्षणक्रमात गणित,ड्रॉइंग (अभियांत्रिकी), सर्व्हेइंग,लेव्हलिंग,बिल्डिंग अँन्ड कन्स्ट्रक्शन या विषयांचा समावेश होता व अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता. १८६४ मध्ये त्या स्कूलचे पूना सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रूपांतर झाले आणि वनसंरक्षण (फॉरेस्ट्री) व शेतकी (ऍग्रिकल्चर) या विषयांची जोड देण्यात आल्याने त्याला पूना कॉलेज ऑफ सायन्स म्हणू लागले. १८८६ मध्ये अभ्यासक्रम अधिक सुसंबद्ध करण्यात येऊन प्रवेशपात्रता जी मॅट्रिक्युलेशनची होती ती एका वर्षाने वाढवून त्यावेळीच्या  प्रीव्हियस  परीक्षेत उत्तीर्ण होण्यापर्यंत वाढवण्यात आली. १९११ मध्ये त्या कॉलेजमधील अभियांत्रिकीशी संबंध नसलेले सर्व विषय सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे मध्ये शिकवण्याची सोय करून त्याना बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात येऊ लागली. व या कॉलेजचे नाव बदलून ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करण्यात आले.
     ही संस्था प्रथम मुंबई विश्वविद्यालयास संलग्न होती आणि मिळणारी पदवी लायसेन्शिएट ऑफ सिविल इन्जिनिअरिंग किंवा  L.C.E. या नावाने ओळखली जाई.१८५८ पर्यंत हा सर्टिफिकेट कोर्स होता त्याचे पदवी अभ्यासक्रमात रूपांतर १९१२ मध्ये झाले म्हणजे पदवी अभ्यासक्रमाची पहिली तुकडी १९१२ मध्ये बाहेर पडली.
   मी फर्ग्युसन कॉलेजात असताना माझ्या ससून मधील बहिणीकडे जाताना वाटेत कोर्टाच्या समोर रेल्वेचे रूळ पसरलेले व त्यांच्या मागे एक कळाखाऊ इमारत दिसे ती म्हणजे आपली भावी शिक्षणसंस्था असा विचार येऊन ती आतून कशी असेल याचा विचार मनात यायचा. त्यावेळी आजच्यासारख्या प्रवेशपरीक्षा घेणे, पुन्हा त्या रद्द होणे मग (कोर्टाची इमारत सहजच समोर उपलब्ध असल्यामुळे) कोर्टबाजी होणे वगैरे प्रकार न घडता संस्थेत सहज प्रवेश मिळायचा. मी जेव्हां या संस्थेत प्रवेश केला  म्हणजे  जून १९६० या वर्षी  ती पुणे विद्यापीठास संलग्न होती व अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून मेटॅलर्जी,सिविल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल व टेलिकम्युनिकेशन्स या  पाच शाखांचे शिक्षण तेथे देण्यात येत होते.प्रवेशासाठी इंटर सायन्स किंवा प्रीप्रोफेशनल (म्हणजे सध्याची बारावी) परीक्षा कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक होते.प्रवेश देताना गुणवत्ता यादीनुसार उपलब्ध जागांवर प्रवेश मिळत असे.
     उंट आणि अरब या गोष्टीप्रमाणे पॉलिटेक्निकच्या इमारतीत इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले व नंतर मात्र पॉलिटेक्निकला गणेशखिंड रस्त्यावर दुसरी इमारत बांधून देण्यात आली. सर्वत्र म्हणजे जेथे जेथे इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाली तेथे तेथे असाच प्रकार झाला होता. म्हणजे पॉलिटेक्निकच्या इमारतीत कॉलेज सुरू व्हायचे आणि मग पॉलिटेक्निकची हकालपट्टी व्हायची.सोलापूरचे तर पूर्ण कॉलेजच हलवून   कराडला नेण्यात आले. आम्ही विद्यार्थी असताना मात्र पुण्याचे कॉलेज आणि पॉलिटेक्निक एकाच इमारतीत भरत असे.त्यामुळे कॉलेजची वेळ सकाळी ७ ते दु.१-३० तर पॉलिटेक्निकची दुपारी १-३० ते रात्री ८ अशी विचित्र होती. त्यामुळे लवकर उठावे लागत असल्याने कॉलेजचे तर रात्री उशीरापर्यंत क्लासेस असल्याने पॉलिटेक्निकचे असे दोन्ही संस्थांचे विद्यार्थी नाराजच असत.
         इंजिनिअरिंग कॉलेजचे वसतीगृह शिवाजीनगरलाच  पण कॉलेजपासून बऱ्याच अंतरावर आहे.म्हणजे वेधशाळेच्या अगदी समोर आहे.त्यावेळी वेधशाळेचे घड्याळ चालू असे आणि काही वसतीगृहाच्या खोलीतून ते घड्याळ दिसत असे आणि त्याच्या ठोक्यावरच ती मुले कॉलेजात जात असत. वसतीगृहात  प्रवेश मिळाल्यावर मी येथे गेलो तेव्हां खोल्यांचे वाटप झाले होते.प्रथम वर्षाच्या मुलांसाठी हॉस्टेलच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर अगदी समोर असणारा C ब्लॉक  मुक्रर करण्यात आला होता व प्रत्येक खोलीत तीन विद्यार्थी होते.ती व्यवस्था नेहमीचीच होती हे मला नंतर कळले.अगदी आमचे टाइमटेबलसुद्धा अनेक वर्षापूर्वी केलेले तेही बदलत नसे.खोल्या चांगल्याच मोठ्या होत्या व माझ्या खोलीत  आणखी दोघेजण होते. पण मला माझ्या एका दुसऱ्या मित्राबरोबर  माझ्या पूर्वपरिचयाचा म्हणून रहायचे होते.तसेच त्याने पुस्तकांचा सेट मिळवलेला असल्याने लगेच पुस्तकांचा वापर करणे सोपे जाणार होते.शिवाय तो ज्या ऍनेक्स(annex) ब्लॉकला रहात होता त्यातील  खोल्या छोट्या असल्याने एका खोलीत दोनच विद्यार्थी रहात होते. त्यामुळे आम्हाला आणखी कोणाबरोबर जमवून घेण्याचा प्रश्न उद्भवणार नव्हता.
       प्रवेश मिळाल्यावर  तडक त्याच्याच खोलीत गेलो व तो म्हणाला "तू इथेच रहा ,आता जरी तुला सी ब्लॉकमधील खोली वाटप झाले असले तरी आपण बदलून घेऊ" त्यामुळे व माझ्याही मनात तसेच असल्याने मी माझा बिछाना अनेक्स (annex) ब्लॉकमध्ये पसरला नंतर काही भानगडी उपस्थित झाल्या तरी त्यांचे निवारण करून आमचे बस्तान त्याच खोलीत टिकवण्यात आम्ही यशस्वी झालो.
    होस्टेलचे त्यावेळी दोन भाग होते त्यातील आतील भाग तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांचा होता व त्यांचेही A,B,C ब्लॉक्स होते.महाविद्यालयाच्या वसतीगृहाचा भाग प्रवेशद्वारापाशीच सुरू होत होता.आत गेल्यावर अगदी समोर C ब्लॉक होता व तो पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी होता. प्रवेशद्वारापाशीच पण C ब्लॉकशी काटकोन करणारा B ब्लॉक होता तो द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असे. C ब्लॉकला काटकोन करणारा दुसरा  ब्लॉक सरळ आत गेल्यावर C ब्लॉक संपल्यावर होता तो D ब्लॉक होता त्यातही बहुतेक द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असत. B ब्लॉकच्या ओळीतच  A ब्लॉक होता त्यात अंतीम वर्षाचे विद्यार्थी रहात.   A आणि B या दोन ब्लॉकच्या मध्ये आमचा ऍनेक्स(annex) ब्लॉक होता.त्या ब्लॉकला संडास व स्नानगृह नव्हते.त्यामुळे आम्हाला   A किंवा  B ब्लॉकला त्यासाठी जावे लागत होते.अर्थात दोघांनाच खोली असण्याचा जो फायदा होता त्यासाठी तेवढी गैरसोय सोसण्याची आमची तयारी होती.  याशिवाय न्यू ब्लॉक हा नव्याने बांधण्यात आलेला ब्लॉकही होता त्यात तर कॉलेज,पॉलिटेक्निक यांची मिश्र वसाहत होती व त्यातही सर्व वर्गाचे विद्यार्थी होते. तो मागील बाजूस होता व त्या भागात पॉलिटेक्निकच्या वसतीगृह प्रमुखाचा बंगला व प्राचार्यांचाही बंगला होता.तर कॉलेज वसतीगृह प्रमुखांचा बंगला पुढच्या बाजूस A व B ब्लॉकसमोर होता.विद्यार्थिनींची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नसल्याने लेडीज हॉस्टेल असण्याचा संभवच नव्हता.आम्ही प्रवेश घेतला तेव्हां आमच्या सर्व तुकड्यात मिळून एक व द्वितीय वर्षाच्या टेलेकम्युनिकेशनच्या शाखेस एक अश्या फक्त दोन विद्यार्थिनी होत्या.
     C ब्लॉक च्या मागील बाजूस म्हणजे प्रवेशद्वाराच्या आणखी डाव्या बाजूस जेवणघराची मोठी एकमजली इमारत होती. त्यात A ते  F असे सहा क्लब होते. त्यातील आमचा  C म्हणजे कर्नाटक क्लब व गुजराती विद्यार्थ्यांचा D क्लब हे दोन पूर्ण शाकाहारी होते.तर सिधी,मुस्लिम कोकणी क्लब पूर्णपणे मांसाहारी तर B हा महाराष्ट्र क्लब मिश्र पद्धतीचा म्हणजे मधून मधून मांसाहार करणारे होते..याशिवाय मराठवाड्यातून आलेल्या मुलांचा G क्लब वेगळ्याच छोट्या जागेत होता,तोही शाकाहारीच असावा.
       आमच्या कॉलेजचे त्यावेळचे मेस म्हणजे क्लब ही अगदी खास संस्था होती आणि बाहेरचे विद्यार्थीसुद्धा तेथे जेवण घेण्यास उत्सुक असायचे.मेसचा कारभार अगदी लोकशाही पद्धतीने चाले व त्यात अजून कॉंग्रेसी संस्कृतीने प्रवेश केलेला नव्हता.शासनाकडुन आस्थापना खर्च झालेला होता म्हणजे प्रत्येक क्लबचे स्वयंपाकी ,वाढपी व इतर कर्मचारी यांना पगार शासनातर्फे मिळत तसेच मेसमधील भांडी तसेच बाके, खुर्च्या वगैरे फर्निचरही मूळ शासनाकडूनच मिळाले असावे.दररोजचे जेवण तयार करण्यासाठी लागणारा शिधा,लाकूडफाटा हा मेस चालवण्याचा खर्च आम्हा विद्यार्थ्यांकडून घेतला जाई.सुरवातीस काही रक्कम अनामत घेतली जाई व नंतर प्रत्येक महिन्यासाठी ज्याप्रमाणात खर्च होई त्या प्रमाणात मासिक बिल आकारण्यात येई.क्लबच्या कार्यकारिणीत सेक्रेटरी, कलेक्टिंग व स्पेंडिंग ट्रेझरर,अशी तीन पदे असत व त्यासाठी निवडणुका होत अगर सर्वानुमते ती पदे क्लबच्या सभासदांपैकी तिघाना देण्यात येत.
   सचिव क्लबच्या सर्व कारभारावर देखरेख ठेवी पण त्याच्याकडे आर्थिक व्यवहार नसत.पैसे जमा करण्याचे काम कलेक्टिंग टेझरर करी तर खर्च करण्याचे काम स्पेंडिंग ट्रेझरर करी.बॅंकेत तिघांच्या नावावर खाते असे व त्यापैकी दोघांच्या सहीने पैसे काढणे किंवा चेक  देणे ही कामे होत त्यामुळे तिघांनी संगनमत केले तरच पैशांचा गैरव्यवहार करणे शक्य होत असे.व तसे शक्य नसे कारण त्यात आणखी एक व्यक्ती असे ती म्हनजे फॉर्टनाईट सेक्रेटरी.पंधरा दिवसाच्या जेवणात कोणते पदार्थ द्यायचे ही गोष्ट तो ठरवत असे व दर पंधरा दिवसानी हे पद वेगवेगळ्या सभासदाकडे जात असे.त्या पदावर काम करणाऱ्या सभासदाची कार्यक्षमता तो किती चांगले जेवण व किती कमी खर्चात देतो यावर ठरत असे.प्रत्येक पंधरावड्यात झालेल्या खर्चावरून प्रत्येक जेवणास किती खर्च झाला याचा हिशेब त्या सेक्रेटरीस काढावा लागे व त्यानुसार प्रत्येकाचे बिल काढण्यात येत असे. अश्या व्यवस्थेमुळे तीन वर्षे अतिशय चांगले जेवण कमीतकमी खर्चात आम्हाला मिळाले.त्याशिवाय   दोन विद्यार्थी ऑडिटरचे काम करत.सकाळी नाश्त्याला दूध व अंडे असे अर्थात तो खर्च वेगळा घेण्यात येत असे.पण त्यावेळी प्रत्येक जेवणाचा खर्च साठ ते पासष्ठ पैसे (आता साठ पासष्ठ रुपयातही तसे जेवण मिळत नाही)इतका येत असे त्यामुळे  अगदी रविवारचे मिष्टान्नभोजन व आठवड्यातील दोन चेंजसह आमचा मासिक भोजन खर्च पन्नास रुपयाच्या आसपासच असे.आणि चांगल्या जेवणामुळे प्रत्येकाची तब्येत सुधारत असे. क्लबमध्ये एक मोठा रेडिओ व कॅरम बोर्ड होता.त्यामुळे जेवणापूर्वी व नंतरही बरेच विद्यार्थी खेळत बसायचे.व बुधवारी अर्थातच आमच्यासारखे बिनाकाचे शौकीन रेडिओभोवती कोंडाळे करून बसायचे.       
      त्यावेळी गणित हा  विषय शिकवायला मामा गद्रे व प्रो.भाटिया ही जोडगोळी होती. तसेच प्रा.वर्टीकर पण होते.ते नेहमीच starting from the fundamentals असे शिकवायचे त्यामुळे त्यांचा एकादा तास चुकला तरी पुढच्यावेळी चुकल्यासारखे वाटायचे नाही याउलट प्रा.भाटिया मागील तासाला एकादी ओळच राहिली असेल तर त्या ओळीपासूनच सुरवात करायचे. त्यांनी गणिताची F.E.BSc व S.E.B.Sc ही पुस्तके दुसऱ्याच्या नावावर लिहिली होती. Similar examples for practice. ही त्या पुस्तकातील वाक्यरचना ते आम्हाला गृहपाठ देताना वापरून आपण ते पुस्तक लिहिले आहे याची जाणीव करून द्यायचे .डेक्कन जिमखान्यावरील अलाइज पब्लिशर त्यावेळी ही पुस्तके प्रकाशित करी. गणिताचे तास रेलवे रुळाच्याशेजारील वर्गखोली क्रमांक  १२ मध्ये असत व त्यांच्या तासाच्या मध्ये कमीतकमी एकदा तरी कोणतीतरी गाडी खडखड करत शेजारून जाई व तेवढा वेळ काही शिकवणे अशक्य होत असे.. मामांच्या वर्गात हा अडथळा आनंददायक वाटायचा पण इतर वेळी तो त्रासदायक वाटे. अश्या खोल्यातून वर्ग भरवणे इतके का आवश्यक होते काही कळत नाही.तेवढे वर्ग इतर बऱ्याच खोल्यात भरवता आले असते,पण हा विचार कोणत्याच प्राचार्यांनी अजूनतरी केला की नाही कळत नाही.   तसाच त्रास वर्कशॉपशेजारील एका वर्गखोलीत व्हायचा तेथे कबुतरांची फडफड चाले.आता तो क्लास पाडून तेथे मोठी इमारत उभारण्यात आली आहे.
   त्या वेळी प्राचार्य वर्तक होते.ते सिव्हिल ईंजिनिअर होते.  व तंत्रशिक्षण संचालक टी.एन. तोलानी होते. त्याना आम्ही कधी पाहिलेही नाही.प्राचार्य वर्तकांनाही एकदाच पाहिले ते फी भरण्यास उशीर झाल्यामुळे होणारा दंड रद्द करून घेण्यासाठी. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी प्रा.ओगले यांची ज्येष्ठतेनुसार प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली.ते मेटॅलर्जी विभागाचे प्रमुख होते.
       प्रथम वर्षाला अप्प्लाइड मेकॅनिक्स व इन्जिनिअरिंग ड्रॉइंग हे दोन विषय विद्यार्थ्यांचे शत्रु समजले जात कारण त्या विषयात जास्तीतजास्त विद्यार्थी नापास होत. अजूनही या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही.ईंजि..ड्रॉइंग शिकवायला प्रा केळकर होते ते बहुधा डिप्लोमाच झालेले होते,तरी त्यांचे विषयावर प्रभुत्व बऱ्यापैकी होते पण त्यांचे इंग्लिश भयानक होते.त्यावेळी आजच्यासारखी ड्रॉइंगची साधने नव्हती त्यामुळे मोठा बोर्ड.टी स्क्वेअर,सेट्स्क्वेअरची जोडी पेपर बोर्डाला चिकटून रहावा म्हणून क्लिपा असा सगळा जामानिमा घेऊन जावे लागत असे.सेटस्क्वेअरला मध्ये भोके असल्याने केळकर सर त्याला holy setsquare म्हणत.एकदा ते कट्ट्यावर उभे होते व मुले खालच्या भागात होती तर त्याना त्यांनी "Why are you understanding?"असा प्रश्न विचारला होता.आपले इंग्लिश चांगले नाही याची त्यांनाही कल्पना होती त्यामुळे तेही "what is language ?it is this  येथे ते मुले व स्वत: यामध्ये हातवारे करून between you and me" असे सांगून आपले बोलणे एकमेकास कळले की पुरे असे व्यक्त करत.पण ड्रॉइंगसाठी अस्खलित भाषा महत्वाची नसल्याने आम्हाला ते कळे.   त्या वेळी प्रा.गुंडा व आर्वीकर यांचे पुस्तक ड्रॉइंगसाठी होते.
   गणिताचे दोन पेपर्स प्रथम वर्षास होते.त्याला M1व M2 म्हणत.त्या दोन विषयांचा अभ्यासक्रम फारच प्रचंड होता.डिप्लोमा करून एकदम द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे दोन पेपर्स क्लिअर करावे लागत आणि ते न जमल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण सोडूनच द्यावे लागले.पुढे बऱ्याच काळानंतर ही त्रुटी दूर करण्यात आली व द्वितीय वर्षास एकदम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हा बोजा काढून घेतला गेला.
   इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची आणखी वेगळीच तऱ्हा.आमच्याच वर्गाला तो विषय शिकवायला सलग एक प्राध्यापक लाभलेच नाहीत.वर्षभरात तो विषय जवळजवळ निदान दहा प्राध्यापकांनी तरी शिकवला.अगोदरच तो विषय जरा अनाकलनीय.कारण विद्युत्प्रवाह,विद्युत्दाब,वगैरे सगळ्याच कल्पना काल्पनिक त्यात शिकवणारे प्राध्यापक दररोज बदलते त्यामुळे शेवटपर्यंत मला तो विषय मुळीच समजला नाही.हीट एंजिन्ससाठी सुद्धा प्राध्यापक बदलते होते पण त्यातील कल्पना दृष्य होत्या म्हणजे बॉयलर दिसत असे किंवा डिझेल इंजिन किंवा तपमान वगैरे कल्पना थोड्यातरी समजण्यासारख्या होत्या त्यामुळे त्यासही प्राध्यापक असे तसेच असले तरी वाचून विषय कळत असे.त्यावेळी भारतीय लेखकांनी लिहिलेली पुस्तके उपलब्धच नव्हती त्यामुळे इले.इंजि.ला कॉटन.हीट एंजिन्सला लेविट किंवा रॅंगहॅम अश्यांची मोठी जाडजूड पुस्तके वाचावी लागत.
   पहिले वर्ष सर्व शाखांना एकच असल्याने सिव्हिल इंजि.मधीलही दोन विषय आम्हाला होते .त्यात एक सर्व्हेइंग ऍंड लेव्हलिंग दुसरा इंजिनिअरिंग मटीरिअल्स.तिसरा एक विषय फौंडेशन ऍंड कन्स्ट्रक्शन असा होता सुदैवाने त्याला परीक्षा नव्हती. 
     त्या वर्षी प्रॅक्टिकल्स गणित व इंजिनिअरिंग मटे.सोडून सर्व विषयांना होती.ड्रॉईगसाठी सर्व जामानिमा घेऊन ड्रॉईंग हॉलला जावे लागे.तेथे लॉकर्स उपलब्ध होती त्यात बोर्ड ठेवता येई व दररोज नेण्या आणण्याचा त्रास वाचे.
     वर्कशॉपचे चार विभाग होते.फिटिंग , चिपिंग.कारपेन्ट्री व स्मिथी. वर्कशॉपमध्ये काम करताना बॉयलर सूट घालावा लागे व तेथेच सर्व हत्यारांच्या बरोबर ठेवण्यासाठी लॉकर दिलेला असे.पुण्याच्या कॉलेजात त्यावेळी वर्कशॉपच्या तळघरात हे लॉकर्स होते.तेथे जाऊन प्रथम बॉयलर सूट चढवून व योग्य ती हत्यारे घेऊन वर यावे लागे.म्हणजे चिपिंग असल्यास छिन्नी हातोडा,तर फिटिंगसाठी योग्य त्या फायली व लोखंडी तुकडा कापण्यासाठी हॅकसॉ,कारपेंटरीसाठी लाकडी हातोडा,पटाशा,रंधा तर स्मिथीसाठी चिमटा व हातोडा वगैरे.
      सुरवातीस चिपिंग किंवा फिटिंग आले की विद्यार्थ्याची दाणादाण उडायची.चिपिंगसाठी एक चार पाच इंच उंच.तेवढाच लांब व रुंद लोखंडी (मॅलिएबल स्टील)ठोकळा मिळायचा व त्यावरील धातू छिन्नीच्या सहाय्ये काढून त्यावर योग्य तो आकार तयार करायचा.त्या विभागाच्या बाजूस त्याचे ड्रॉइंग दिलेले असे ते अगोदर कच्चे काढून घ्यायचे व नंतर छिन्नी व हातोड्याने त्या ठोकळ्यावर आपल्या करामतीचे कौशल्य दाखवावयाचे.सुरवातीस हातोड्याचे घाव बहुधा  छिन्नीऐवजी हाताच्या बोटावरच पडायचे व बरीच दुखापत व्हायची.तरी त्यावेळी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना तर दगड घडवायचे पण प्रशिक्षण असे त्याच्यापेक्षा हे थोडे बरे म्हणायचे
     वर्कशॉपमध्ये इन्स्ट्रक्टर असत ते त्या धंद्यातील प्रवीण असेच लोक असत म्हणजे कारपेंट्रीला इन्स्ट्रक्टर कुशल सुतारच असे तर फिटिंगला कुशल फिटर.त्यांच्या दृष्टीने आमचे जॉब म्हणजे किस झाडकी पत्ती.स्मिथी विभागाचे कारागीर तर इतके कुशल की जो जॉब आम्ही सात आठ दिवस राबूनही नीट करत नसू ते तो अगदी जादू केल्यासारखे. आमच्यासमोरच मोजून दहा बारा ठोके घालून पूर्ण करून फेकून देत. तीच गोष्ट इतर विभागांची.
     पहिल्याच वेळी चिपिंग मिळाल्यामुळे माझे अंग दररोज अगदी मोडून येई. त्यावेळी मी गावात रहात होतो त्यामुळे आणखीच अवघड जात होते थोडक्याच दिवसात होस्टेल मिळाल्यावर चिपिंगसुद्धा सुसह्य होऊ लागले.तरीही छिन्नी व हातोडा चालवण्याचे कौशल्य काही येत नव्हते.
  आपल्या दृष्टीने जॉब संपला तरी तो सबमिट करण्यापूर्वी इन्स्ट्रक्टरना दाखवावा लागे व तो त्याना पसंत पडला नाही तर तोच रिपीट करावा लागे.तरी चिपिंग व फिटिंगमधील शारीरिक श्रमामुळे त्यात रिपीट न देण्याचे सौजन्य ते दाखवीत.पण फिटिंगमध्ये दोन भाग एकमेकात व्यवस्थित बसवावे लागत व नंतर त्यात मोठ्या भेगा नसायला हव्यात.इन्स्ट्रक्टर्स आमचा म्हणजे माझा जॉब घेऊन त्याचे दोन भाग फिट करून त्यातून पलीकडे पाहून यातून पलीकडला हत्ती दिसतोय की,म्हणून आणखी घासायला सांगत मग लागले पुन्हा घासायला. रिपीट मिळाला नाही यातच आनंद मानायचा.त्यामुळे आमचे मेडिकलला गेलेले मित्र आम्हाला घिसाडीच म्हणत तर आम्ही त्यांना  खाटीक म्हणत असूं.
     त्यामानाने कारपेंटरी कमी श्रमाचे वाटे कारण आम्हाला दिले जाणारे लाकूड चांगल्या प्रतीचे असल्याने रंध्याने भराभरा त्याच्या कपच्या उडत.पण त्यासाठी रंधा अगोदर व्यवस्थित जोडलेला व घासलेला असणे आवश्यक असे.मी सुरवातीला कितीही घासले तरी त्या लाकडाची एकादी कपची निघे बाकी तुकडा तसाच.आमच्या मित्रांना एकाला विचारले कारण त्याच्या लाकडाच्या तो अगदी दणदण चिपा काढत होता. त्याने "अरे रंध्याला धार लावावी लागेल असे म्हणून त्याचे पाते काढून त्याला धार कशी लावायची व त्यानंतर ते पाते त्यात कसे बरोबर बसवायचे ते दाखवले त्यानंतर भराभर त्या लाकडाच्या तुकड्याच्या खपल्या उडु लागल्या त्या आनंदात मी इतके घसाघस घासले की तो तुकडा इन्स्ट्रक्टरना दाखवल्यावर"हे काय केले त्याचा आकार अगदीच कमी करून टाकला" असे म्हणून त्याच्यावर मॅलट(लाकडी हातोडा)चे दोन घाव घालून  माझ्यासमोर त्याचे दोन तुकडे करून पुम्हा दुसरा लाकडाचा तुकडा घेऊन या आणि ड्रॉइंग नीट पाहून त्याप्रमाणे रंधा मारा आणि पुन्हा तुकडा जर नीट केला नाही तर परत तिसरा तुकडा मिळणार नाही "असा दमही दिला. यावेळी मात्र मी काळजीपूर्वक जरा हळू हळूच तासले.कारपेंटरी तशी जमायला अवघड वाटली नाही कारण त्यात श्रम कमी होते व जॉब पूर्ण झाल्यावर आपण काहीतरी तयार केले आहे अशी जाणीव तरी व्हायची.उलट फिटिंगमध्ये मात्र घासघासून फक्त दोन तुकडे अडकवून एक लोखडी छोटाच चौरसच काय तो तयार व्हायचा.
      स्मिथीचा विभाग सगळ्यात शेवटी माझ्या वाट्यास आला.तेथील मिस्त्री फारच मजेदार होते.तेथे भट्ट्या पेटलेल्या असायच्या व आपल्याला लोखंडाच्या सळईचा एक तुकडा मिळायचा त्यापासून कडी किंवा बोल्ट अश्या वस्तू बनवायचे असा जॉब असे.भट्टीमध्ये योग्य तपमानापर्यंत तो तुकडा चिमट्यात धरून लाल होईपर्यंत तापवायचा आणि मग त्याच्यावर जोरजोरात घणाचे घाव घालायचे.आमच्या सारख्या हळूबाईंचा तुकडा आम्ही घाव घालायला लागेपर्यंतच थंड व्हायचा मग आम्ही घातलेल्या घावाचा काहीच उपयोग व्हायचा नाही,मग काय पुन्हा तापवा आणि पुन्हा ठोका,
         सळीचा व्यास वाढवावयाचा असेल तर जंपिंग ही क्रिया करावी लागे त्यात तो तुकडा तापवून उभा धरून त्यावर योग्य दिशेने घाव घातले तर ठीक नाहीतर तो वाकून वाया जायचा. तुकड्यातील काही भाग तोडायचा असल्यास स्लेज हॅमर वापरावा लागे व त्यासाठी दोघांची आवश्यकता भासे.कारण चिझेल एकाने धरून दुसऱ्याने दोन्ही हातांनी स्लेज हॅमर उचलून त्यावर घाव घालावे लागत त्यामुळे एका भट्टीपाशी दोघेजण तरी असतच.
    आमच्यापैकी काहीजण बनेल होती ते जॉब करायला बराच वेळ लावत मग इन्स्ट्रक्टरपैकी एकादा "काय राव,कसले मिळमिळीत ठोके घालताय अस म्हणून त्याच्या हातुन हॅमर हिसकावून घेऊन आणि जॉब चांगला गरम करून दहा बारा ठोके फाड फाड मारून जॉब तयार करून त्याच्यासमोर फेकून देत आणि"जा कर जा सब्मिट " असे म्हणायचे.स्मिथी सेक्शन मला सगळ्यात शेवटी आला.तोपर्यंत वर्कशॉपची संवय झाली होती शिवाय थंडीचे दिवस असल्याने भट्टीसमोर बरे वाटायचे शिवाय इन्स्ट्रक्टर असे मजेदार त्यामुळे स्मिथी सेक्शनचे  वातावरण तप्त असले तरी एकूण ताप कमी वाटला.
      मेकॅनिकल डेपार्ट्मेंट आर.टी.ऒ.ऑफीसवरून जाणाऱ्या रस्त्यावर आहे त्यामुळे कार्यालयाकडून गेले तर तो रस्ता ओलांडावा लागे.याउलट वसतीगृहातून निघाल्यावर संचेती हॉस्पिटलशेजारील पुलावरून सरळ यंत्रविभागाकडे जाता येते व आमचे पहिले तास किंवा ड्रॉईंग प्रॅक्टिकल असले तर आम्ही तसेच करत असू.लांबूनही भली मोठी चिमणी नजरेत भरत असे रात्री ती त्यावर प्रकाशझोत टाकून ती प्रकाशमान केलेली असायवी.खाली बॉयलर हाउस होते व त्यात एक लँकेशायर व एक बॅबकॉक्स विलकॉक्स असे दोन बॉयलर होते.पहिल्या हीट एंजिन प्रॅक्टिकलला बॉयलरच्या आत शिरून तो पहाणे हा भाग होता पण त्यासाठी बॉयलर सूट घालावा लागे  प्रयोगशाळेत या बॉयलर्सच्या धुडाबरोबरच मर्लीस डिझेल इंजिन व इतरही इंजिने जुन्या काळीघेतलेली असल्याने धूडच होती. प्रयोग प्रत्यक्ष काही करावे लागतच नव्हते.प्रॅक्टिकल्सच्या वेळी बॉयलर अथवा इंजिने यांचे वर्णन करून त्यांच्या कार्याची व त्यातील निरनिराळ्या भागांची माहिती देत.या विषयाचे जर्नल म्हणजे मागील वर्षीच्या मुलाने काढलेली निरनिराळ्या भागांची ड्रॉंइंग्ज व माहिती,त्यामुळे ते जर्नल एकदा कॉपी केले की झाले असा प्रकार होता. त्या आकृत्या बहुधा डी.ए.लो च्या पुस्तकातल्या असायच्या.
        अगदी उजव्या बाजूला ड्रॉइंग हॉल्स आहेत.त्यामध्ये मशीन ड्रॉइंग काढावयाचे असे.त्यासाठी एकादा यंत्राचा भाग देऊन त्याच्या सर्व भागांचे व संपूर्ण भागाचे असे दोन भागात ड्रॉइंग काढावे लागे.त्या भागाची मोजमापे घेऊन प्रत्येक भाग समोरून बाजूने व वरून कसा दिसेल याचे ड्रॉइंग काढायचे.त्यासाठी प्रथम स्केचबूकमध्ये कच्चे चित्रण मोजमापासह काढून नंतर मोठ्या शीटवर काढावे लागे.त्यावेळी ड्रॉइंग पेपरसुद्धा भारतीय बनावटीचे नसत.स्टेडलर किंवा स्कॉलर पेपर बरेच महाग असत त्यामुळे भारतीय बनावटीचा हॅंडमेड पेपरही काहीजण वापरत पण ते क्वचितच.हे सर्व ड्रॉइंग साहित्य गावात बुधवार पेठेतील पी.डी.ब्रदर्स आणि आणखी एक दुकानातच मिळे.एकदा सक्काळी सक्काळीच ड्रॉइंग प्रॅक्टिकल असताना माझ्याजवळील कागद संपल्याचे कळले तेव्हां बुधवारात गेलो तर सगळी दुकाने बंद. त्यावेळी  पुण्यातले दुकानदार इतक्या लवकर दुकान उघडण्याचे पाप करत नसत अजूनही बरेच दुकानदार त्याच काळात वावरत आहेत. त्यामुळे मला बराच वेळ वाया घालवावा लागला. याच ड्रॉइंगहॉलमध्ये दुसऱ्या वर्षी काम करत असताना "पाणी आले पाणी आले" असा ओरडा झाला आणि आम्ही सगळे कसेबसे बाहेर पडलो कारण पानशेत धरण फुटले होते.त्यानंतर महिनाभर कॉलेज बंदच होते.
        ड्रॉइंग मध्ये पुन्हा सिविल विभागाचे ड्रॉइंग वेगळे असे.ते रेलवे रूळाला लागून असलेल्या सिविल ड्रॉइंग हॉलमध्ये असे पण त्यासाठी अगोदर सर्व्हेइंग व लेवलिंगचे प्रॅक्टिकल करावे लागे,त्यासाठी त्याच इमारतीत इन्स्ट्रूमेन्ट्स मिळण्याची सोय होती व तेथून थिओडो लाइट डंपी लेव्हल वगैरे कुणा एका विद्यार्थ्याच्या नावावर घ्यावा लागे.सुरवातीस काही प्रॅक्टिकल्स आवारातच म्हणजे सिव्हिल डिपार्ट्मेंट व मुख्य कार्यालयाची इमारत यांच्यामधील मोकळ्या जागेत होत म्हणजे तेथे या इन्स्ट्रुमेन्ट्सचा वापर कसा करायचा हे शिकवले जाई व जर्नलमध्ये त्याची आकृतीसह नोंद करावी लागे.त्यानंतर प्रत्यक्ष जागेची मोजमापे घेऊन त्या जागेचे क्षेत्रफळ प्लॅनिमीटरच्या सहाय्याने काढणे वगैरे कामे करावी लागत.  हा विषय प्रॅक्टिकल करूनच बराचसा समजे.
    रेलवे रुळाकडील गेटमधून आत शिरतानाच सिव्हिल विभागातूनच प्रवेश करावा लागे तर आत शिरताच लगेच डाव्या बाजूस इलेक्ट्रिक विभाग होता.त्यात वर व खाली असे दोन वर्ग होते व त्यातील पायऱ्या लाकडी होत्या त्यामुळे न आवडणाऱ्या प्राध्यापकाच्या लेक्चरच्या वेळी त्यांच्या आवाजापेक्षा या पायऱ्यावरील आपटल्या जाणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांच्या चपला बुटांचाच आवाज जास्त जोरात येत असे.त्यावेळी प्रा.एम.व्ही.देशपांडे विभागप्रमुख होते पुढे ते अमरावती कॉलेजला प्राचार्य व शेवटी तंत्रशिक्षण संचालक झाले.त्यावेळी ते नुकतेच ऑस्ट्रेलियाला जाऊन आले असल्याने कधीही एकाद्या प्रसंगी भाषण देण्याची पाळी आली की ते त्याची सुरवात करताना किंवा भाषणाच्या मध्ये केव्हांतरी  "when I was in Australia" हे वाक्य असायचेच.त्यावेळी त्या विभागात प्रा,तोटे विषय फार छान शिकवत असे  मित्राकडून कळले पण आमच्या  तुकडीला मात्र बदलते हुए साथीचा खेळ चालू होता.त्यात कधी पेंडसे तर कधी आठवले असे अतिहुषार लोक येत ते तर गणितेही तोंडीच करत व आमच्या सगळे डोक्यावरून जाई.चौधरी नावाचे नुकतेच अमेरिकेतून m.s.होऊन परत आलेले प्राध्यापकही कधीकधी येत.ते अमेरिकेतून आलेले असल्यामुळे त्यावेळी भारतात न मिळणाऱ्या टेरिलिनची पॅंट व शर्ट घालत पण त्याखाली मात्र स्लिपर्स घालत हे असे का हे मला कधीच कळले नाही.
          सर्व्हेइंग प्रॅक्टिकल्स साठी त्यावेळी लॉ कॉलेज रस्ता अगदी मोकळा असल्याने त्यावर लेव्हलिंग वगैरे करून कंटूर सर्व्हे वगैरे केल्याचे आठवते.एका प्रकारे ती छोटीशी ट्रिपच असायची.त्यासाठी आम्ही कसे जात होतो काही आठवत नाही कारण कॉलेजपासून फार सोयिस्कर बसेस होत्या असे वाटत नाही.कॉलेजची व्हॅन वगैरे असल्याचे आठवत तरी नाही.पण तो परिसर शांत व रमणीय असा असल्याने प्रॅक्टिकल्स आनंददायक वाटत.आता तो परिसर तसा असेल यावर विश्वासच बसत नाही.शिवाय विद्यार्थ्यांची एक पूर्ण तुकडी काम करत असल्याने एकटेपण जाणवत नसे.
     वर्षभरात आणखी जाणवणारे उपक्रम म्हणजे क्लब डे त्यादिवशी क्लबमधील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन काही गंमतीदार खेळ खेळणे,संगीत ऐकणे व मेजवानी व रात्री एकादा पिक्चर असा कार्यक्रम असे.त्यातच मुगले आझम आम्ही पाहिला असे वाटते गॅदरिंगला मात्र मी कधीच हजर राहिलो नाही ती सुट्टी मिळाली की घरी पळायचे असे ठरलेले,त्यामुळे गॅदरिंगसाठी मोठा पेंडॉल घालत तो काही पहायला मिळाला नाही.
  बोटक्लब हे कॉलेजचे भूषण होते व अजूनही आहे.ड्रॉईंगहॉलच्या मागच्याच बाजूस नदी वहात असल्याने त्यावर बोटक्लब बांधण्यात आला आहे.त्यावेळी भरुचा हे त्याचे प्रमुख होते.सुरवातीस पंट या नावाची होडी चालवायला मिळे.बोटक्लबचे आम्ही सभासद झाल्यावर पंट आम्हाला केव्हांही मिळू शके तिच्यात बसून वल्हे कसे मारायचे हे एकदा कळले की ती बोट हळू हळू बराच प्रवास करत असे.बऱ्याच वेळा बहिणीस व तिच्या मैत्रिणीस घेऊनही आम्ही पंट चालवत असू.
      टब्फोर हा त्याच्या पुढचा होडीचा प्रकार होता.त्यात चार जण वल्ही मारत तर एक जण दिशादर्शन करे त्याला कॉक्स म्हणत.बोटक्लबचा वर्धापन दिन  रिगाटा या नावाने ओळखला जायचा व त्यादिवशी बोटिंगच्या स्पर्धा असत.त्यात टब्फोरचा समावेश असे.त्याच्यापुढे स्कल या नावाचा दोनच जणानी चालवण्याचा प्रकार असे त्याच्याही स्पर्धा असत.पंट सोडून बाकी होड्या चालवण्यासाठी पोहता येणे आवश्यक होते.टब्फोरच्या पुढे माझी मजल गेली नाही.
   त्यावेळी सत्रपद्धत नसल्यामुळे परीक्षा सर्वच्या सर्व म्हणजे आठ विषयांची एकदम असे.त्यात २ गणिते,हीट एंजिन्स १,इलेक्ट्रिकल एंजिनिअरिंग १,मशीन ड्रॉइंग,अप्लाइड मेकॅनिक्स,सर्व्हेइंग ऍंड कन्स्ट्रक्शन,व इंजिनिअरिंग मटीरीअल्स असे आठ विषय होते.ऐन परीक्षेच्या वेळी माझी दाढ दुखू लागली ती इतकी की काही वाचणे अशक्यच झाले म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असा प्रकार झाला.ती परीक्षा मी कशी दिली हेच कळत नाही. मशीन ड्रॉइंग,सर्व्हेइंग व बहुधा हीट एंजिन्स १ या विषयांना तोंडी व प्रॅक्टिकल परीक्षा असे,वर्कशॉपला काहीतरी जॉब करावा लागत असे. परीक्षा आटोपल्यावर मात्र दाढदुखी थांबली व मी घरी जायला तयार झालो.या पद्धतीने अभ्यास व नंतर दाढसुखीने बेजार अवस्थेत परीक्षा दिल्यावर काय निकाल लागणार याची धास्तीच होती.
   सर्वच दृष्टीने हे प्रथम वर्ष अतिशय त्रासदायक गेल्यामुळे निकालातही त्याचे प्रतिबिंब पडणे स्वाभाविकच होते.त्यावेळी एकदम सर्व म्हणजे आठी विषयात पास होणे आवश्यक असे.ए.टी.के.टी.हा प्रकार नव्हता.प्रत्येक विषयात पास होण्यासाठी जरी ३५ च गुण आवश्यक असले तरी सर्व विषयांचे एकत्रित गुण ४५% म्हणजे ११०० पैकी ४९५ मिळणे आवश्यक असे. पण मी कसाबसा सटकलो तेही बरोबर ५१% गुण मिळवून कारण त्या वर्षी राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी कमीतकमी उच्च द्वितीय दर्जा मिळणे आवश्यक असूनही या वर्षीपुरता फक्त द्वितीय वर्ग म्हणजे ५०% च्यावर गुण मिळाले तरी चालेल पण यापुढे मात्र उच्च द्वितीय वर्ग म्हणजे ५५% पेक्षा अधिक गुण मिळालेच पाहिजेत अशी तंबी भरून आमची शिष्यवृत्ती चालू ठेवण्यात आली.त्यावर्षी अभियांत्रिकीचा निकाल पहिल्या वर्षाचा फक्त ३०% लागला होता.त्यामुळे आमचे काही मित्र मागे राहिले.
     त्यावेळी जयकर नियम तेवढाच काय तो आम्हाला आधार होता त्यानुसार एका द्या विषयात किंवा एकूण गुणांसाठी १% कमी पडत असेल तर तेवढी भर मिळालेल्या गुणात घालून उत्तीर्ण म्हणून जाहीर करत.पण त्याच बरोबर प्रथम वर्षास तीनदा नापास झाल्यास अभियांत्रिकीस राम रामच ठोकावा लागे.
       बी.ई.इलेक्ट्रिकल झाल्यावर एका वर्षातच  मेकॅनिकलची डिग्री घेता येत असे  त्यामुळे आमच्याच बी.ई.च्या वर्गात बी.ई.एले.झालेले पंचवीस तीस विद्यार्थी होते त्यामुळे आमच्या वर्गात ९५ विद्यार्थी होते.इतकेच काय आम्ही बी.ई.झाल्यावर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मेटॅलर्जीच्या जागा ६० करण्यात आल्या आणि इतके विद्यार्थी उपलब्ध नसल्यामुळे आमच्याच बरोबर बी.ई.झालेल्यांनी त्या वर्षी  बी.ई.मेटॅलर्जी होण्याचीही संधी घेतली.त्या दिवसांची आठवण होण्याचे मुख्य कारण म्हणजे  १९६३ मध्ये  बी. ई‍ झालेल्या  सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जानेवारी २०१३ या दिवशी  घेण्यात आले आणि ते दिवस आठवले.