आय एम ब्लँक...

मला माहीत असलेल्या बहुतेक सगळ्या भावना माझ्या मनात भरून राहिल्या आहेत...  डोळ्यात येऊ पाहणारं पाणी नक्की सुखाचं आहे का वेदनेचं? चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा नक्की कुठून आली आणि कशी? या विचारांनी माझं डोकं फुटेल का काय अस वाटत आहे, माझं हृदय आता कोणत्याही क्षणी बंद पडेल...
आज ती खूप आनंदी आहे... आणि मी?
माझ्याबद्दल मलाच खात्री नाही, मी खरंच सुखी आणि समाधानी आहे, का तसं वाटून घेण्याची सवय लागली आहे, माहीत नाही.
मला ना खूप रडायचंय, पण डोळ्यातलं पाणी पापण्यांपर्यंत येऊन तिथूनच आत जातंय, जणू काही डोळ्यावर अदृश्य अशी पट्टी बांधली आहे, बहुधा मी रडणंच विसरलोय, मनातली दुःख अन अश्रू  इतके आत दाबून ठेवायची सवय झालिये की आता ठरवलं तरी रडता येत नाहीये आणि हसणं म्हणजे जणू काही त्या बॅटमॅन मधल्या जोकरसारखं कायमच चेहऱ्याला  चिकटलंय...
हे सगळं निव्वळ तिच्या एका एसएमएस मुळे...
असं काय आहे त्या एसएमएस मध्ये? फक्त २ वाक्य अन त्यात सुद्धा सगळे मिळून ८ शब्द...
"आता विमानात बसले आहे, आता थोड्याच वेळात भुर्र्रर्रर्रर :-)"
या क्षणाला तिच्या इतकं आनंदी दुसरं कुणी नसेल अन माझ्या एवढा कनफ्यूज सुद्धा... ती आनंदी कारण ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन तिने जे कष्ट घेतले आज त्याचं फळ तिला मिळाल आहे... एम. आय. टी. मध्ये एम. एस. साठी ऍडमिशन  मिळणं आणि ते पण पूर्ण स्कॉलरशिप वर हे नक्कीच कौतुकास्पद आहे... तिने घेतलेल्या अपार कष्टांची ती पावतीच आहे.
तसं पाहायला गेलं तर तिची-माझी ओळख काही फार जुनी नाही, गेल्या २-3 वर्षातली. अगदीच अनपेक्षित आणि अचानक, पण कुठल्या जन्माची लय जुळली माहीत नाही अन् अनेकांना हेवा वाटावा अशी मैत्री झाली. माझ्यासाठी ती म्हणजे जणू काही "मैत्री" स्वत:च मानवी देह घेऊन आली होती, तिच्यासाठी मी म्हणजे जणू मैत्रीचं जिवंत उदाहरण, तिला माझ्याबद्दल खूप अभिमान... दोघांना एकमेकांची एवढी ओळख झाली होती की संवाद साधायला कधी शब्दांची गरज पडलीच नाही. एकमेकांच्या मनातल्या भावना नुसत्या डोळ्यांनी टिपून घेऊ शकतो आम्ही, अगदी आजही... एखादा मिस कॉल किंवा कसा आहेस? सारखा मेसेज देखिल त्यात न लिहिलेले बरेच शब्द, न बोललेल्या बऱ्याच भावना आपोआप एकमेकांपर्यंत पोचवतो...
गेले काही दिवस तिच्यासोबत शॉपिंग करताना, तिचे पॅकिंग करून देताना, तिच्यासाठी विमानाची तिकिटं बुक करताना मनामध्ये ही जाणीव सतत जागी होती की आता नेहमीच्या भेटीगाठी नाहीत, विनाकारण मिसकॉल देणं नाही की फालतू मेसेज नाहीत, वीकएंड्सच भटकणं नाही, पावसातून भिजून आल्यावर तिच्या हातची कॉफी नाही, रुसवे-फुगवे अन् भांडणं नाहीत, पण कधी एवढा भावुक नाही झालो, उलट तिचं सिलेक्शन झाल्याचं कळल्यावर आपणच तिला दगडूशेठ ला घेऊन गेलो, अगदी काल तिला मुंबईच्या बसमध्ये बसवून देताना पण अगदी बिनधास्त होतो, मग आजच हा त्रास का? का असं वाटत आहे की तिला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नये, आता ती ज्या विमानात बसली असेल त्यातून तिला काहीही करून परत आणावं अन् मग तिला  आपल्यापासून दूर कुठेच जाऊ देऊ नये...
........ च्यायला आजचा दिवसच बेकार, सकाळी सकाळी दूध नासलं, मग ऑफिस मध्ये त्या टकल्याशी वाजलं, संध्याकाळी येताना गाडी पंक्चर, दोन सिगारेटची पाकिटं अन् ४ लार्ज घेऊन पण पाय अजून जमिनीवरच  आणि लिहायला म्हणून कागद पेन घेतलं तर असलं काहीतरी लिहिलं जातंय...