मानलेले सुख
राबत्या तुझ्या हातांना, मिळो आधाराचा हात,
जीवा सुखद गारवा, मिळो निसर्गाची साथ.
तुझे हात हे पोचले, सर्व्या जगाच्या रे पोटी,
किती देऊ आशीर्वाद, करी ओंजळ ही रिति
असो घरीदारी तुझ्या, गाईगुरांचा राबता,
मिळो सारे काही तुला, तु कधी न मागता.
शेतातून मोट, पाट, वाहो दुथडी भरोन
देती आलिंगन वेली, वृक्षराजा आनंदोन.
गाणी गाती पाखरे ही, तुझ्या नावाचा गजर,
करण्या साथ ही तयांना, मेघराजा हा हजर.
येती दिन ते सुगीचे, वाढे लगबग फार
घे रे पसा हा भरोन, देण्या दाता हा तयार
अशी वेळ, असा काळ, देई सुखाचा दिलासा,
भाग्यवंता!! बळीराजा, तु रे सर्वांना हवासा.
ना मिळती सकला,किती सौख्याचे हे क्षण,
होती कष्ट हे सुसह्य, होई आनंदी हे मन!!!