मुर्दाड माणसांच्या बोटावरील शाई

मुर्दाड माणसांच्या बोटावरील शाई

नररुंड मोजताहे निर्जीव लोकशाही

 
कुरणात हिरवळीचा ना मागमूस काही

जितका मनुष्य चरतो, चरतील काय गाई?

 
युद्धात जीवनाच्या इतकीच फक्त ग्वाही

राजे खुशाल; पडती मृत्यूमुखी शिपाई

 
लागेल फोडणीला तितकाच हातभारऽ

आश्वासनांत डोंगर अन्‌ पूर्ततेत राई

 
वाढीव किंमतींनी कंठास प्राण आले

सगळेच तंग झाले, उसवू कुठे शिलाई

 
गेला खिशात केव्हा पाठीवरील तो कर?

मी पाहतो अचंबित ही हातची सफाई

 
निवडून कोण आले हा प्रश्न व्यर्थ आहे

बदलेल काय त्याने हा प्रश्न मर्मग्राही

 
डावे वळण असो की उजवीकडील रस्ता

देशोधडीस नेती आम्हा दिशा दहाही

 
हे रोमराज्य चालो की 'राम'राज्य येवो

पण पाचवीस अमुच्या पुजल्येय मोगलाई