शेवटचे पान

(प्रथितयश लेखक ओ'हेन्री यांनी लिहिलेल्या "द लास्ट लिफ" , या कथेचे हे मराठी रुपांतर. या कथेमध्ये वर्णन केलेले प्रसंग, ते प्रसंग जेथे घडतात ते स्थळ, आणि तो प्रसंग साकार करणारी पात्रे, यांचे यथातथ्य चित्रं, ही कथा वाचताना, वाचकाच्या नजरेसमोर उभी राहते. ओ'हेन्री यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांच्या कथा वाचताना त्यांची धारदार कल्पनाशक्ती, अमाप शब्दसंपदा, आणि ते शब्द अचूकपणे वापरण्याची हातोटी याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. )

वॉशिंग्टन चौकाच्या पश्चिमेकडे एक अजब वस्ती वसलेली आहे. नाव आहे ग्रीनविच. 

अतर्क्य वळणे घेत जाणारे रस्ते आणि आणि अनाकलनीय अशा गल्ल्याबोळांनी बनलेली ही वस्ती. इथले रहिवासी देखिल अगदी या वस्तीला साजेसे असेच, कलंदर कलावंत.. या वस्तीत तुम्हाला अनेक जुन्यापुराण्या वस्तू जतन केलेल्या दिसतील. जुन्या काळाशी नाते सांगणार्‍या खिडक्या, कुठल्यातरी प्राचीन संस्कृतीची ओळख मिरविणारे दरवाजे, आणि अतिशय विसंगत पायर्‍या आणि कठडे असणारे वळणावळणाचे  लाकडी जिने तुम्ही इथे बघू शकाल.  तसे इथे अठराविश्वे दारिद्र्यही नांदताना दिसेल.
तर अशा या अनोख्या वस्तीत अनेक कलाकार चहूबाजूंनी आले. त्यांना या जागेचे आकर्षण वाटण्याचे कारण जसे इथे अढळणार्‍या जुन्या संस्कृतीची ओळख मिरविणार्‍या वस्तू होत्या, त्याचप्रमाणे इथल्या जागांच्या कमालीच्या कमी किमती, हे ही एक महत्वाचे कारण होते.  अशा या ग्रीनविच खेड्यामध्ये अनेक कसबी कलाकार येऊन वसले होते आणि त्यांची ही एक अजब "कॉलनी" तयार झाली. याच कॉलनी मध्ये एका अत्यंत स्वस्त, केवळ विटांनीच बनलेल्या एका तीन मजली इमारतीमध्ये, सर्वात वरच्या मजल्यावरच्या एका घरात, दोन मैत्रिणी राहतं होत्या. सुझन आणि जॉन्सी (तिला तिथे राहणारी लोकं जॉना म्हणून ओळखत असत). दोघीजणी कलाकार होत्या. त्यांचे चित्रे काढण्याचे, रंगविण्याचे काम ही तेथेच चाले. तरूण आणि कला जगतामधे नवीन असल्याने, अजूनही त्यांचा म्हणावा तसा जम बसलेला नव्हता. काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या कथांसाठी, चित्र रेखनाचे काम त्या करीत असत. त्यात कला फारशी नसली तरी पैसे मिळत, जे त्यांना ग्रीनविच मध्ये राहण्यासाठी आवश्यक होते.  
तशा त्या दोघीजणी काही बालमैत्रिणी वगैरे नव्हत्या. एकदा एका रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्तरॉ मध्ये योगायोगाने त्यांना एकाच टेबलवर बसणे भाग पडले होते. 
म्हणजे त्याचे असे झाले, दोघीजणी शहरात नवीनच आलेल्या, राहण्यासाठी जागा शोधत होत्या. तेव्हा दुपारच्या भोजनासाठी त्या तिथल्याच एका रेस्तरॉ मध्ये आल्या होत्या. पण एकच टेबल रिकामे होते. तशा दोघी एकेकट्याच आलेल्या, आणि दुसरे टेबल रिकामे होण्याची वाट पाहण्याची त्यांची तयारी नव्हती. मग जेवताना गप्पा रंगल्या आणि त्यातून दोघी समानधर्मी.. म्हणजे कलाकार... चित्रकार असल्याचे कळले. आणखी त्यांच्या अनेक आवडी निवडी समान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उदा. चिकोरी सॅलड आणि इतकच नाही तर कपड्याच्या फॅशन बद्दल देखिल त्यांची मते जुळत होती. फरक इतकाच होता की एक मेने  शहरातून आलेली तर दुसरी कॅलीफोर्नियातून. मग त्यांनी भागीदारी मध्ये हे स्वस्तातले घर घेतले. तसे इथे राहणे त्यांच्या पथ्यावरच पडले होते. कारण ती वस्तीच कलाकारांची होती. जुन्यापुराण्या डच पद्धतीची घरे आणि पुराणवस्तु संग्राहकाला आकर्षित करतील अशा अनेक वस्तू इथे होत्या. त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहाने तिथे राहण्यास सुरूवात केली होती. 
 हे सर्व घडले होते मे महिन्यात, आणि आता नोव्हेंबर महिना चालू होता. हिमवृष्टी आणि वादळी वार्‍यांमुळे सारा आसमंत गारठून गेला होता. आणि त्यातच तिथे एका नवीनं पाहुण्याचे आगमन झाले होते. डॉक्टरांनी त्याचे नाव न्युमोनिया असे सांगितले. या पाहुण्याने घराघरामधून भेटी द्यायला सुरूवात केली होती. आणि जणु काही सारी वस्तीच आजारी झाली होती. घरटी एखादातरी न्युमोनियाचा पेशंट होताच. या थंडीच्या आघातापुढे जॉनाने देखिल हार मानली . नेहमी उत्साहाने सळसळणारी  जॉना अगदीच मलूल होऊन गेली होती. अशक्तपणामुळे तिची त्वचा पांढुरकी दिसत होती. आधीच लहानखुरी, नाजुक अशी दिसणारी जॉना, या आजारपणा मुळे आणखीनच लहान दिसू लागली होती. सुझन बिचारी होईल तितकी शुश्रुषा करीत होती. पण जॉनानेच हाय खाल्ली होती. आपण या आजारपणातून काही बर्‍या होणार नाही असे तिच्या मनाने घेतले. आणि त्यात भर घातली ती  त्या डॉक्टरने. तो सुझनला म्हणाला, "ही बरी होण्याची शक्यता फक्त दहास एक इतकीच आहे. कारण तुझ्या मैत्रिणीने स्वत:च ठरविले आहे, की ती यातून बरी होणारच नाही. त्यामुळे मी कितीही गुणकारी औषधे दिली तरी त्यांचे गुण 50% ने कमीच झालेले असणार. हा --  आता तू असे काही करू शकलीस, की ज्यायोगे, तुझी मैत्रीण बाजारात आलेल्या कपड्यांच्या नवीन फॅशन मध्ये काही रस दाखवील ... तर तिची बरी होण्याची शक्यता पाचास एक अशी गृहीत धरू शकतेस. कारण याचा अर्थ असा होतो की तिची जगण्याची इच्छा जागृत आहे." 
सुझनला त्या डॉक्टरचा भयंकर राग आला होता. मारे स्वत:ची विद्वत्ता मिरवतो आहे, पण याला इतकंही कळू नये, की आजारी व्यक्तीसमोर असल्या गोष्टी बोलायच्या नसतात म्हणून? 
पण डॉक्टर बोलून गेला होता, आणि जॉनाने ते नीट ऐकले होते. सततच्या तापामुळे आधीच नाजूक झालेली तिची मन:स्थिती, अजूनच वाईट झाली. आता तर ती काही बोलेनाशी झाली. नुसती तिच्या बिछान्या जवळील खिडकी कडे एकटक बघत राहू लागली. सुझनने किती विनवले तरी तिने केलेले सूप देखिल तिने घेतले नाही. सुझनला तिची अवस्था बघवत नव्हती. "हीच का आपली मैत्रीण, जी कधीकाळी, म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी पर्यंत, चित्रे काढण्यासाठी नेपल्स च्या समुद्रकिनार्‍यावर जाण्याची स्वप्ने बघत होती?"  
... पण सुझनचाही नाईलाज होता. तिला सर्वकाळ जॉनाशी बोलत रहाणे शक्य नव्हते. काम करणे जरूरी होते. तिने काम केले, तरच ती जॉना साठी थोडी पोर्टवाईन  विकत घेऊ शकली असती, ज्यामुळे या कडाक्याच्या थंडीत तिला थोडीफार उब मिळू शकली असती. तिने काम केले तरच तिला सकाळचा नाश्ता मिळू शकला असता, ज्यामुळे ती स्वत: ताजीतवानी राहून जॉनाची शुश्रुषा करू शकली असती.   तिच्याकडे आत्ता एकच काम होते. एका नवोदित लेखकाने लिहिलेल्या कथेसाठी चित्रे काढून द्यायची होती. ज्या नियतकालिकामध्ये ती कथा प्रसिद्ध होणार होती ते देखिल नवीनंच प्रकाशन होते. त्यामुळे सुझनला मिळणारे मानधनही जेमतेमच होते. पण काहीच नसण्यापेक्षा थोडेफार असणे कधीही चांगले, नाही का? हाच विचार करून तिने ते काम स्वीकारले होते.
 एकाग्र चित्ताने सुझन समोरच्या कॅन्व्हासवर पेन्सिलीने चित्रं रेखाटत होती, तितक्यात तिला अस्पष्टसा आवाज ऐकू आला. बारा, अकरा, दहा नऊ, आठ आणि सात बरोबरच .. ह्म्म.. 
सुझनने आश्चर्याने वळून पाहिले... "जॉना?  काय गं? काय मोजते आहेस?"  
काहीच उत्तर आले नाही, तशी आपल्या हातातील ब्रश, पेन्सिल खाली ठेवून ती जॉनाच्या बिछान्या जवळ गेली. तिच्याकडे बघताना सुझनला कसेसेच झाले. काय अवस्था झाली होती तिच्या मैत्रिणीची? सुझन ने पाहिले जॉना एकटक खिडकीकडे बघत होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. डोळ्यामध्ये अनामिक भय दिसत होते. 
सुझनने हलक्या आवाजात विचारले, "जॉना काय मोजते आहेस?" 
जॉना ने आपली नजर न वळवता खिडकीकडे बोट केले, "ते बघ,ती फांदी..." 
सुझनने कुतूहलाने पाहिले. तिथे डच पद्धतीची एक लहानशी जुनाट खिडकी होती. त्या खिडकीतून बाहेरचे करड्या रंगाचे आवार फक्त दिसत होते. त्यांच्या इमारतीच्या पासून काही अंतरावर असलेली, तशीच विटांनी बांधलेली एक इमारत होती. बाकी काहीच नव्हते. 
"काय आहे तिकडे? मला काहीच दिसत नाहीये." सुझनने विचारले. 
"ती आयव्हीची वेल बघ ना.." जॉनाच्या आवाजात भिती होती.
 सुझन ने पाहिले समोरच्या इमारतीच्या भिंतीला लगटून एक आयव्ही  वर पर्यंत पसरली होती. कधीकाळी भरपूर हिरव्या रंगाच्या पानांनी लगडलेली आयव्ही आता अगदी निष्पर्ण झाली होती. त्यांच्या खिडकीतून जी वेल दिसत होती त्यावर आता फारच थोडी पाने शिल्लक होती.
"ती वेल होय? अगं आताच्या या मोसमात त्याची पाने गळली आहेत. पण वसंत ऋतू मध्ये बघ परत कशी बहरेल ती?" सुझनने हसत हसत म्हणले. 
जॉनाने काहीच उत्तर दिले नाही. काही वेळानंतर अगदी हलक्या आवाजात ती म्हणाली, 
"का कुणास ठाऊक? पण मला वाटते आहे की त्या वेलीवरची सारी पाने जेव्हा गळून जातील तेव्हा माझीपण जाण्याची वेळ आलेली असेल. हा ईश्वराचाच संकेत आहे. बघ ना तीन दिवसांपूर्वी तिथे शंभरच्या पेक्षा जास्तं पाने होती. ती मोजताना माझे डोके दुखायला लागायचे. पण आज 12 च होती आणि आता तर फक्त सहाच.. ते बघ आणखी एक गळलं. आता ही पाने उद्या सकाळी काही राहणार नाहीत, आणि मी सुद्धा.. त्या डॉक्टरांनी सुद्धा असेच सांगितले आहे ना मगाशी?" 
सुझन आश्चर्यचकित होऊन ऐकत होती. आजारपणामुळे ही किती हळवी झाली आहे? तिच्या मनात आले. परत एकदा तिला त्या डॉक्टरचा राग आला. पण तिने स्वत:ला सावरले. काहीच्या जरबेच्या आवाजात ती म्हणाली,
"काय हे? काहीच्या काही विचार करत बसू नकोस. आणि डोळे मिटून पडून राहा बरं. त्या तसल्या पानांवर कधी कुणाचे जगणे मरणे अवलंबून असते का? तू तिकडे अजिबात बघू नकोस. मी तुला छानसं गरम सूप देते ते घे, तुला बरं वाटेल. काय?" 
"ठीक आहे मी खिडकीकडे बघत नाही पण मला सूप नकोय ." जॉना हट्टाने म्हणाली.
"मी ती खिडकी बंद करू शकत नाही कारण मला काम करण्यासाठी उजेड हवा आहे. पण तू डोळे मिटून घे." सुझन आता विनवणीच्या स्वरात म्हणाली.
 आज्ञाधारकपणे जॉना ने डोळे मिटले. सुझन परत म्हणाली,
 "आणि हे बघ, मी आत्ता तळमजल्यावर रहाणार्‍या मि. बेर्मन ला बोलवायला जाते आहे. मी करत असलेल्या कथेत एक खाणकामगाराचे पात्रं आहे. त्या साठी मला एका मॉडेल ची जरूरी आहे. मी जास्तं वेळ लावणार नाही." असे म्हणत ती खोलीच्या दाराकडे निघाली. 
 मि.बेर्मेन , हा त्याच इमारती मध्ये राहणारा एक अवलिया कलाकार. तसा लौकिकार्थाने तो अयशस्वीच म्हणायला पाहिजे. काही तुटपुंज्या कामावर तो आपला चरितार्थ चालवत असे. तिथे येणार्‍या नवोदित कलाकारांसाठी मॉडेल सुद्धा बनत असे. तिथल्या कलाकारांना व्यावसायिक मॉडेल्स चे दर परवडत नसत. मग बेर्मन ते काम करत असे. त्याला त्यातून थोडेफार पैसे मिळत. असे असले तरी तो स्वत:ला एक उच्च दर्जाचा चित्रकार समजत असे. तो नेहमी सांगायचा, की एक ना एक दिवस तो एक सर्वोत्कृष्टं कलाकृती निर्माण करेलच. गेली जवळजवळ चाळीस वर्षे तो हेच सांगत  असे. आणि त्याबद्दल तिथले काहीजण त्याची चेष्टाही करत असत.  पण अजूनतरी त्याचा ब्रश काही सुमार दर्जाच्या मासिकातील कथाचित्रे आणि भिंतीवरील जाहिराती, या साठीच वापरला जात होता. त्याचे वय आता जवळजवळ 65 वर्षे झाले होते, पण अजून त्याच्या सर्वोत्कृष्टं कलाकृतीचा योग जमून आला नव्हता.  
असे असले तरी, मि. बेर्मन तसा खूप चांगला माणूस होता. नेहमी बोलताना जरी तो खाष्टं वाटला, तरी नवोदित कलाकारांची तो नेहमीच जमेल तशी मदत करायचा. त्याला जॉना आणी सुझन बद्दल तर फार माया होती. या शहारात, एकट्या रहाणार्‍या मुली, म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी त्याची आहे हे त्यानेच ठरवून टाकले होते. आणि तो त्याप्रमाणे वागायचा देखिल. 
तर अशा या बेर्मन कडे सुझन आली होती. जॉना बरोबर बोलताना जरी तिने स्वत:ला वाटणारी काळजी लपविली होती, तरी बेर्मन ला मात्रं तिने सारे काही सांगितले. त्याला सुद्धा तिच्याप्रमाणेच त्या डॉक्टरचा राग आला होता. तो जेव्हा तिसर्‍या मजल्यावरच्या जॉना आणि सुझनच्या घरी आला तेव्हा जॉनाला झोप लागली होती. मग सुझन ने त्या आयव्हीच्या पानांबद्दल सांगितले. आणि जॉनाच्या भितीबद्दल देखिल..  
बेर्मेन रागारागाने म्हणाला, " काय मूर्ख मुलगी आहे ही?  तू तिला चांगले खडसावून सांगायला हवे की असले भलते विचार तिने मनात आणायला नकोत. तिची तू इतकी काळजी घेतेस आणि ती अशी कशी म्हणते?"
सुझनला आश्चर्य वाटले. इतक्या आजारी मुलीला असं कसं बोलणार ती? मग तिला बेर्मनचा पण राग आला.
"काहीही दयामाया नसणारा असा एक दुष्टं म्हातारा आहेस तू." ती रागारागात म्हणाली. आणि मग न बोलता आपले काम करत राहिली.

रात्री बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता. बर्फवृष्टी होत होती. सुझन डोळे मिटून प्रार्थना करत राहिली. 
"आता उद्या सकाळी काय होईल कोण जाणे?" ती विचार करत होती. मग खूप उशीरा कधीतरी तिला झोप लागली. 

सकाळी सुझनला जाग आली तेव्हा सारे वातावरण अगदी बदललेले होते. अनेक दिवसांनी सूर्याची उबदार किरणे घरभर पसरली होती. सुझनला जरा उत्साह वाटला. पण जॉनाकडे बघून तो मावळला. तारवटलेल्या नजरेने ती खिडकीकडे बघत होती. सुझनला आता चिंतेने घेरले होते. कालच्या वादळात त्या आयव्हीवरची उरलीसुरली पाने गळली असणार.
 तिची चाहूल लागताच जॉनाने म्हणले,"खिडकी उघड.." 
काही बोलण्यासाठी म्हणून सुझनने तिच्याकडे पाहिले, पण मग तो विचार सोडून तिने दिला. जॉनाला समजविण्यात काहीच अर्थ नव्हता. मग तिने न बोलताच खिडकी उघडली.. आणि काय आश्चर्य  गर्द हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाच्या काहीशा दुमडलेल्या कडा असलेले एक पान दिमाखात त्या वेलीला लगटून फडफडत होते. दोघींनी आनंदातिशयाने एकमेकांकडे पाहिले. 
   "आ  ss  हा ss अजून एक पान आहे.. म्हणजे मी इतक्यात या जगाचा निरोप घ्यावा अशी त्याची सुद्धा इच्छा नाही तर .." 
खोलीच्या छताकडे बघून हात जोडीत जॉना म्हणाली. मग सुझन कडे पहात म्हणाली, 
"छे ! मी खूपच वाईट मुलगी आहे. दुष्ट आणि स्वार्थी आहे. तू माझी इतकी शुश्रुषा करत असताना, मी मात्रं, मी मरणार -- मी मरणार असा जप करत राहिले. मला क्षमा करशील ना सुझी?"
 निसर्गाच्या या चमत्कराने अचंबित झालेली सुझन भानावर येत म्हणाली, "असू दे गं ! आजारपणात माणसं असं काहीबाही बोलतात. मन:स्थिती नाजूक झालेली असते ना.. म्हणून. पण आता तरी सूप घेशील ना? आता बघ, तो न्युमोनिया इथून काढता पाय घेतो की नाही?" 

आणि त्या लहानशा घरात आता फक्त आनंद भरला होता. गरम ताज्या सूपाचा दरवळ, दोघींच्या हसण्या बोलण्याचा किणकिणाट, आणि सगळीकडे आरामशीर पणे पसरलेली उबदार सूर्यकिरणे.. सारं काही समाधानी,.. हवंहवंसं वाटणारं.
दुसर्‍यादिवशी सुद्धा ते पान अजून तिथेच होतं. ते बघून जॉनाच्या मलूल चेहर्‍यावर हास्य उमटलं होतं. आज डॉक्टर पण येऊन गेला होता. जॉनाला तपासत तो म्हणाला, 
"देवा रे .. काय ही जादू? ही तर बरी होईल असे दिसते आहे. या आधी तर मी आशाच सोडून दिली होती. आता मी म्हणेन,  हिची  बरी होण्याची शक्यता पाचास एक इतकी आहे."
डॉक्टर गेल्यावर नाक उडवत सुझन म्हणाली, "हं .. पाचात एक म्हण, त्याला काही कळत नाही. जॉना 100% बरी होणार आहे." 
आणि मग त्या दोघी खळखळून हसल्या.तिसर्‍या दिवशी सुद्धा ते एकुलतं एक पान तिथेच होतं. आता जॉना तिच्या बिछान्यावर उठून बसली होती. तिचा चेहरा देखिल आता चांगलाच तरतरीत दिसत होता.
 सुझन चे काम चालू होते. तिला परत एका मॉडेल ची जरूर होती म्हणून ती म्हणाली, 
 "जॉना, मी त्या मि बेर्मन ला सांगून येते. त्या दिवशी तो इथे आला होता, तेव्हा तुला झोप लागली होती. तुझी अवस्था पाहून फारच अस्वस्थ झाला होता. तो काळजी करत असेल."
 मग काहीशा अपराधी स्वरात म्हणाली, " ---- आणि मला त्याची माफी मागायला हवी. काय झाले, त्या दिवशी मी आधीच तुझ्या आजारपणाच्या चिंतेने त्रासले होते, आणि तो काहीतरी बोलला. मग  त्या रागात मी पण जरा त्याला लागेल असं बोलले. पण मला खात्री आहे, तो मला माफ करेल.. नक्कीच."  
जिन्याच्या पायऱ्या उतरताना सुझनमध्ये उत्साह जणू काठोकाठ भरलेला होता. तळमजल्यावरच्या बेर्मन च्या घरी ती आली तेव्हा तिथे काही लोकं जमले होते. आपापसात कुजबुजत होते.  घराचे दार उघडेच दिसत होते, आणि आत काही माणसे होती. सुझन ने त्यातल्याच एकाला विचारले की काय झाले आहे. तो तिच्याकडे बघत आश्चर्याने म्हणाला,
 " तुला माहीत नाही? बेर्मन ला पण न्युमोनियाने गाठले, आज सकाळी त्याला हॉस्पिटलचे लोकं घेऊन गेले, पण काही उपयोग झाला नाही.." 
सुझन सुन्न होऊन ऐकत होती. तो पुढे म्हणाला, 
" हा म्हातारा इतक्या रात्रीचा पावसात कुठे गेला होता देव जाणे! दोन दिवसांपूर्वी तो या इमारतीच्या भिंतीला टेकून बसलेला सापडला. त्याचे कपडे भिजले होते, आणि तो बेशुद्धावस्थेत होता.  त्याच्या जवळ एक शिडी होती. काय करत होता कोण जाणे?" 

सुझनला आता राहवले नाही. त्या गर्दीतून वाट काढत तिने बेर्मंच्या घरात प्रवेश केला. तिथे एका कोपर्‍यात त्याचा रिकामा कॅन्व्हास दिसत होता, आणि शेजारी काही रंग, ब्रश आणि कलर पॅलेट मध्ये हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या खूणा ... 
आता तिला गेले दोन तीन दिवस, त्या निष्पर्ण वेलीवर दिमाखात फडफडणार्‍या पानाचे रहस्य उलगडले होते.  सुझन चे डोळे भरून आले. "बेर्मन, शेवटी तू तुझा "मास्टर पीस" रंगवलासच." ती स्वत:शीच म्हणाली.  "तुझं म्हणणं तू खरं केलंस. जग तुझ्या बद्दल काहीही म्हणो, पण मला माहिती आहे.. तू एक उच्चं दर्जाचा चित्रकार होतास.. खरा कलाकार."